Monday, January 10, 2022

क्षणभंगुर आनंद

काही व्यक्तींना सतत दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कपट कारस्थान करण्याची सवय असते. त्याअन्वये इतरांना दुःखी करण्याचा त्यांचा मानस असतो.

परंतु , अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच आनंदाची खरी परीभाषा उमजू शकत नाही. कारण ते स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखातच जास्त आनंदी होत असतात.

आणि अशा आनंदाचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते.

✒ K. SATISH





Wednesday, January 5, 2022

निस्वार्थ जनसेवेचे मूर्तिमंत उदाहरण...'अनाथांची माय'

अनाथांची माय
थोर समाजसेविका, पद्मश्री
वंदनीय सिंधुताई सपकाळ यांना
सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

'स्वतःसाठी सगळेच जगतात पण जीवनातील खरा आनंद आणि त्याचा खरा मतितार्थ लपला आहे इतरांसाठी झिजण्यात'
जीवनाच्या या सत्वचनाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या, सर्वांना वंदनीय व 'अनाथांची माय' अशी सर्व जनमानसांत ओळख असलेल्या.....खऱ्या अर्थाने सर्व विश्वाच्या माय असलेल्या थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!!

काळाचे सोसले घाव
तरी हिम्मत ना हारली जिने,
झळा सोसूनी दुःखाच्या
इतरांना तारले तिने

जीवन वाहिले इतरांसाठी
लाखो वासरांची झाली गाय, 
अनंतात ती विलीन जाहली
अनाथांची हो माय

✒ K. Satish





Wednesday, December 29, 2021

यश

स्वप्नांना प्रयत्नांची जोड

अन् प्रयत्नांना परिश्रमांची,

कठोर परिश्रमानंतरच येते

चव ही सफल यशाची

✒ K. Satish




Monday, November 15, 2021

महाराष्ट्राची लोककला दुबईच्या धरतीवर

   सर्व रसिकजनांस कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात आपल्या शब्दांची व आवाजाची जादू ओतणारे, 'मस्का' चित्रपटातील 'बया' या गाण्याचे पार्श्वगायक,  'डॅडी', 'बाॅईज २'  या चित्रपटांचे गायक, दोस्तीगीरी चित्रपटाचे गीतकार, 'चौर्य' चित्रपटाचे कोरियोग्राफर तसेच लोककलेचे गाढे अभ्यासक व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची लोककला १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयोजित केलेल्या 'दि वर्ल्ड एक्स्पो २०२०' या महोत्सवात झळकणार आहे.

   त्यातही अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे यात आमचे बंधू व आमच्या लोकगीतांना श्रवणीय करण्यासाठी ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे असे 'बालगंधर्व परिवार पुरस्कार' विजेते, महाराष्ट्रातील उत्कृष्ट ढोलकीवादक श्री. नितीन प्रधान हे आपल्या वादनकलेचे योगदान देणार आहेत.

   या महोत्सवात आपली कला सादर करून आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन सातासमुद्रापार असलेल्या रसिकजनांना घडवून देण्यासाठी सज्ज झालेल्या या सर्व गुणी कलावंतांस मनःपूर्वक शुभेच्छा...!!! 💐

✒ K. Satish



Sunday, November 7, 2021

७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस

   ७ नोव्हेंबर १९०० रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये ( सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल ) पहिल्यांदाच इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. याच दिवसापासून त्यांच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात झाली. या ठिकाणी ते १९०४ पर्यंत म्हणजेच इयत्ता ४थी पर्यंत शिकले.
  
   ज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण व सर्व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच घटनेच्या स्मरणार्थ व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीशील वाटचालीकरिता शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कठीण परिश्रमाची जाणीव करून देण्याहेतूने संपूर्ण महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

✒ K. Satish


Sunday, October 31, 2021

शरीर, मन व बुद्धी यांना बळ देणारी उत्साहवर्धक भ्रमंती

   लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे शिक्षण व्यवस्थेचा उडालेला बोजवारा व त्यामुळे दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांवरच आलेला अतिरिक्त ताण या दिव्यातून सध्या श्रीयश आणि त्याची मित्रमंडळीदेखील जात आहे. परंतु त्यातूनही वेळ काढून श्रीयश छान स्केचेस काढणे, सायकलिंग करणे हे त्याचे छंद जोपासत आहे.
    शैक्षणिक अभ्यासाच्या वेळापत्रकातून पाहिजे तसा वेळ मिळत नसल्याने श्रीयश आणि त्याच्या मित्रांना सायकलिंगची दूर पल्याची भ्रमंती करण्याचा योग बरेच दिवस जुळून येत नव्हता.
   आज रविवार (३१ ऑक्टोबर २०२१) आणि दिवाळी सुट्टीचे औचित्य साधून श्रीयश आणि प्रतिक यांनी सांगवी ते तिकोना किल्ला व पुन्हा सांगवी अशी शरीर व मनाला बळ देणारी व आपल्या गड किल्ल्यांच्या माहितीचा साठा वाढवणारी उत्साहवर्धक भ्रमंती पूर्ण केली.
   आजच्या आधुनिक युगातदेखील अशापद्धतीने वेळ सत्कारणी लावण्याच्या श्रीयश व प्रतिक या दोघांच्याही मानसिकतेला, सकारात्मक विचारसरणीला व त्याबरोबरच अभ्यासातही कधी कमी न पडण्याच्या जिद्दीला सलाम व त्यांचे कौतुक...!!! 👍🏻👌🏻💐
   त्यांच्या सकारात्मक कार्यात त्यांना सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे ही माझीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे व ती पार पाडण्यात मला नेहमी आनंदच वाटेल...!!! 🙏🏻
✒ K. Satish
































Wednesday, October 27, 2021

अयोग्य मदत

 कर्तृत्वशून्य माणूस हा छिद्र पडलेल्या इंधनाच्या टाकीसारखा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही मदतरूपी इंधन भरले तरी तो त्याच्या कर्तृत्वशून्यतेमुळे थोड्या कालावधीतच पुन्हा तुमच्या मदतीची अपेक्षा बाळगतो.

आणि अशा व्यक्तीला मदतीचा आधार देण्याच्या नादात तुमच्या यशाची गाडी चुकल्याशिवाय राहत नाही.

✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...