Friday, May 5, 2023

छुपे षडयंत्र

   एका गावात एक दबंग व्यक्ती रहात असतो. त्याच्याकडे पैसा, संपत्ती अफाट असल्याने आणि त्याचे स्थानिक राजकारणात वजन असल्याने त्याचा त्या गावात बराच दबदबा असतो. कोणीही त्याच्याविरुद्ध एक शब्दही काढत नसतो. हा व्यक्ती राजकारणात सक्रिय असल्याने त्याला सर्व स्तरातील लोकांशी जुळवून घ्यावे लागत असे. परंतु त्याच्या मनात मात्र जातीव्यवस्थेचे, वर्णव्यवस्थेचे विष काठोकाठ भरलेले असते.
   त्यातच गावातील एक दलित स्त्री उच्चशिक्षण घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि गावाच्या विकासासाठी लढत असते. एका कनिष्ठ जातीतील महिला असूनही तिची वाढत चाललेली लोकप्रियता ही त्या प्रतिष्ठित राजकारण्याला खटकू लागते. तो दिवसरात्र त्या महिलेला कसे नामोहरम करता येईल व तिचे कसे मानसिक खच्चीकरण करता येईल याचाच विचार करत असतो. परंतु असे करताना त्याला स्वतःला तर या प्रकरणापासून दूर ठेवायचे असतेच, पण त्या महिलेला त्रास झाल्यास तिला सहानुभूती मिळून हे प्रकरण चिघळू नये व जागीच शांत व्हावे असे काहीतरी करण्याची त्याची इच्छा असते.
   विचार करता करता त्याला एक धूर्त कल्पना सुचते व तो त्याच्या अंमलबजावणीच्या तयारीला लागतो.
    त्या गावात एक ठार वेडा मनुष्य रहात असतो. त्याला गोंजारून, आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. १५ - २० दिवसांच्या प्रयत्नानंतर तो वेडा पूर्णपणे त्याच्या अधिपत्याखाली येतो. तो धनाढ्य व्यक्ती जे सांगेल ते करणे येवढेच तो करू लागतो.
    एके दिवशी ठरलेल्या कारस्थानानुसार तो त्या महिलेविषयी काही गोष्टी त्या वेड्याच्या मनात पेरतो व त्या वेड्याकरवी त्या महिलेचा विनयभंग करण्याचे षडयंत्र रचतो.
     ठरल्याप्रमाणे ती महिला गावातून जात असताना ज्यावेळी लोकांची जास्त वर्दळ नसेल हे हेरून त्या वेड्याला त्या महिलेच्या आसपास पोहोचविले जाते. अर्थात या सर्व कामात त्या राजकारण्याचे इतर कार्यकर्तेदेखील मदत करत असतात व सर्व परिस्थितीवर नजर ठेवून असतात. त्या वेड्याला अशाप्रकारे तयार केलेले असते की, ती महिला समोर दिसताच क्षणार्धात तो तिच्यावर झडप घालतो. त्या महिलेला काहीच सुचत नाही. आजूबाजूला काही लहान मुले खेळत असतात. बाकी मोठी माणसे क्षणार्धात पोहोचू शकतील अशा टप्प्यात नसतात. तो राजकारणी व त्याचे चमचे मात्र लपून सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात. आणि त्या वेड्याने केलेला हल्ला इतका जबरदस्त असतो की, काही सुचायला उसंतच मिळत नाही. तो मिनिटाच्या आत त्या महिलेचे सर्व कपडे फाडून तिला जवळजवळ विवस्त्रच करून सोडतो. महिला जीवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते परंतु तो मनुष्य वेडा असतोच पण शरीराने आडदांडही असतो. त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न असफल ठरतात. त्यातच अचानक घडलेल्या या भयंकर प्रसंगाने ती हादरून जाते. ती आरडाओरड करते परंतु लोक जमा होईपर्यंत खूप उशीर होतो. लोक जमा होईपर्यंत तो वेडा तिच्या कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या करून टाकतो. नंतर आवाज ऐकून काही लोक तेथे पळत येतात व ते त्या वेड्याला बाजूला नेऊन मारायला सुरुवात करतात. या गडबडीत त्या महिलेला आधार देऊन तिची अब्रू झाकण्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. हळूहळू लहान मोठे, स्त्री पुरूष, आबालवृद्ध साऱ्यांची आजूबाजूला गर्दी वाढू लागते. त्या सर्वांसमोर त्या अवस्थेत थांबताना त्या महिलेच्या आत्मसन्मानाची अक्षरशः अंत्ययात्राच निघते. काही महिलांच्या लक्षात ही बाब येऊन त्या काही वस्रांच्या सहाय्याने तिची लाज झाकतात. परंतु त्याला खूप उशीर झालेला असतो. त्या महिलेचे विवस्त्र दृश्य सर्व गावकऱ्यांच्या नजरेत साठून गेलेले असते, तिचे मानसिक खच्चीकरण झालेले असते, तिच्या आत्मसन्मानाला खूप मोठा धक्का पोहोचलेला असतो. त्या राजकारण्याचा डाव साधला गेलेला असतो.
   आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे प्रकरण सहानुभूतीपूर्वक त्या महिलेच्या बाजूने वळू न देता त्याला पूर्णविराम देण्याचा. त्या कार्याला आकार देण्यास आता सुरूवात होते. त्या वेड्याला गावकऱ्यांनी पकडून चोप द्यायला सुरुवात केल्यावर तेथे त्या नेत्याचे व त्याच्या चमच्याचे आगमन होते. व ते त्या वेड्याला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवतात. गावकऱ्यांना शांत करत तो नालायक धनी मनुष्य त्यांची समजूत काढण्याच्या सुरात बोलू लागतो, " अरेरे, झाला प्रकार खूप वाईट झाला. असे घडायला नको होते. परंतु हा मनुष्य तर ठार वेडा आहे. त्याला त्याच्या अंगावर कपडे आहे की नाही याचेही भान नसते. लाज - अब्रू काय असते याची त्याला काहीच कल्पना नाही त्यामुळे हे काही त्याने जाणीवपूर्वक केलेले नसणार. त्याने केलेले कृत्य नक्कीच चुकीचे असले तरी तो ठार वेडा आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे त्याला मारून काहीच उपयोग होणार नाही. त्याला सोडून देणेच उचित ठरेल. "
   हळूहळू त्याचे म्हणणे लोकांना पटू लागते. लोकांचा राग कमी होऊ लागतो व अखेर सर्व शांत होते. त्या व्यक्तीने वेड्याकरवी हे कृत्य घडवून एका दगडात अनेक पक्षी मारलेले असतात.
   त्याने त्याच्या जातीविषयक घाणेरड्या मानसिकतेचा विजय केलेला असतो, त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मानसिक धैर्याचे खच्चीकरण केलेले असते, स्वतःवर या प्रकरणाचा एकही शिंतोडा उडू न देता हे सर्व त्याने साध्य केलेले असते. व अपराधी हा वेडा असल्याचे कारण देऊन प्रकरण तेथेच मोडीत काढलेले असते. त्यातच त्याच गावातील मनातून जातव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या, इतर कनिष्ठ जातीला तुच्छ समजणार्‍या परंतु उघडपणे बोलू न शकणार्‍या काही दुटप्पी लोकांचे या प्रकाराला मूक समर्थनच असते. वरवर समतेचा दिखावा करताना जातीय द्वेषाचे बीज त्यांनी उरी बाळगलेले असते. त्यामुळे आता त्या महिलेच्या खर्‍या यातना समजून घेणारे, तिला मानसिक धैर्य देऊन खर्‍या अर्थाने आधार देणारे कोणीच नसते. फारफार तर खोट्या सहानुभूतीचे दोन शब्द बोलण्यापलीकडे तिच्यासाठी कोणी काहीही करणार नसते. कदाचित यापुढे त्या महिलेसोबत घडलेला प्रसंग पाहून इतर कोणी पुन्हा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्याच्या भानगडीत पडणार नसते.
    समाजात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात घडणारे हे ज्वलंत वास्तव आहे. अनेक धर्मांध प्रवृत्तीचे लोक, अनेक धूर्त राजकारणी आपला कपटी डाव साधण्याकरिता अनेकदा अशा वेड्यांना पुढे करतात फक्त हे खरे वेडे नसून जातीव्यवस्थेचा पगडा असलेले, राजकारण्यांची - धनदांडग्यांची अंधभक्ती करणारे घाणेरड्या विचारांनी वेडी झालेली मंडळी असतात. आणि अशा व्यक्तींच्या विचित्र वागण्यावर, विचित्र बोलण्यावर काही सुज्ञ लोकांनी आक्षेप घेतल्यास, ' अरे तो वेडा आहे...तुम्हीतर शहाणे आहात ना ? त्याच्याकडे लक्ष देऊ नका ' अशी कावेबाज समजूत ही धूर्त मंडळी समाजातील या सूज्ञ मंडळींची काढतात. व त्यांच्या या शब्दछलामध्ये फसून समाजातील वैचारिक लोकसुद्धा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत राहतात. व अन्यायाची ही मालिका अशीच अविरत सुरू राहते.
    समाजात वर्चस्व असणाऱ्या वर्गातील वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या अभ्यासू लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अशा अपप्रवृत्तींवर वेळीच आळा घालून (अजूनही उघडपणे न दिसणार्‍या) समाजातील सामाजिक असमानतेची झळ सोसणाऱ्या पीडित समाजाचे दुःख समजून घ्यायला हवे. व त्यांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे. असे झाल्यास आपला देश एकसंघ होऊन खर्‍या अर्थाने जगाला मानवतेचा संदेश देत प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचणे हे दिवास्वप्न न राहता एक सुखद सत्य ठरेल.
   धन्यवाद...!!! 🙏🏻
✒ K. Satish






    

Thursday, May 4, 2023

घोटाळे

घोटाळ्यावर घोटाळे

कोटींचे घोटाळे,

मतलबी नेत्यांनी

केले देशाचे वाटोळे

✒ K. Satish




Sunday, April 23, 2023

ध्यास गीतांचा

शांत झोप येईलच कशी मज

ध्यास गीतांचा हो जडला,

शब्दांचा तो अमूल्य खजिना

समोर माझ्या येऊनी पडला

✒ K. Satish



Tuesday, April 11, 2023

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले

 समाजसेवा म्हणजे नक्की काय असते ?

   पृथ्वीतलावरील प्रत्येक मानव हा मानव म्हणूनंच जन्माला आला आहे, त्यामुळे प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला माणसाप्रमाणे वागवले पाहिजे. या विचारधारेवर लढताना स्वतः त्रास सहन करून लोकांसाठी झिजणे काय असते ?
   

स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी स्वतःची ऐहिक सुखे बाजूला ठेवून प्रस्थापितांविरूद्ध बंड उभारून, प्रसंगी अतिशय कष्टदायक हालअपेष्टा सहन करून स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळवून देताना किती जिद्द, सहनशक्ती आणि सामाजिक समतेसाठीची तळमळ लागते ?

   या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना एका महापुरुषाचे नाव समोर येते......ते म्हणजे

   क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले.


अशा महापुरुषांनी या भारत देशात जन्म घेतला, आपल्या अभूतपूर्व कार्याने या देशाचा मान वाढविला आणि महत्वाचे म्हणजे या देशात समतेची बीजे रोवली. त्यामुळे अशा भारत देशात जन्माला येणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

आज 11 एप्रिल रोजी या महान समाजसुधारकांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish




Sunday, March 26, 2023

जीवनगाणे

जीवनाच्या वाटेवरती

अडथळे खूप पाहिले,

तरीही जीवनगाणे मी

हसत हसत गायिले...

✒ K. Satish





Saturday, March 11, 2023

असेल पत तर मिळेल किंमत

 एखादा साधा कागद जर रस्त्यात पडला असेल, तर लोक एकतर त्याला दुर्लक्षित करतात किंवा त्याला लाथाडून, तुडवून पुढे निघून जातात.

परंतु , तोच कागद एखाद्या 100, 200, 500, 2000 च्या नोटेचं स्वरूप प्राप्त झाल्यावर पडलेला दिसला तर त्याला आपलेसे करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागते.

मनुष्याच्या बाबतीतही असेच घडते.......

✒ K. Satish



 

Tuesday, February 28, 2023

अंधश्रद्धेचे भूत

प्रगतीपथावर गेलो आम्ही

केली चंद्रावर स्वारी,

तरीही अंधश्रद्धेचे भूत हे

बाळगले अंतरी

✒ K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...