एक गहण सामाजिक प्रश्न..... खरंच मातापित्यांनी मुलांना जन्म देणे हे त्या मुलांवर उपकार असतात का ?, त्यांना या जगात आणून त्यांनी या मुलांवर मोठी मेहेरबानी केलेली असते का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण की, समाजात सर्व स्तरावर मुलांना या गोष्टीची सतत जाणीव करून दिली जाते की, तुझ्या आई वडीलांमुळेच तू हे जग पाहू शकलास आणि ते अजिबात खोटे नाही. निश्चितच त्यांच्या आईवडिलांचे मिलन झालेच नसते तर ही मुले जन्माला खरोखरच आली नसती.
परंतु, मुद्दा हा उरतो की, या मुलांवर उपकार करण्यासाठीच सर्व आई वडीलांनी मुलांना जन्म दिलेला असतो का ?....की, आपल्याला मुलाचे सुख लाभावे, समाजात आपल्याला मूल झाले याचा आनंदोत्सव साजरा करता यावा, ' मूल होत नाही ' अशा समाजातील टोचून बोलणाऱ्या टोमण्यांपासून आपला बचाव व्हावा व सामाजिक स्वास्थ्याच्या हेतूने लग्नबंधनात अडकून आपल्या शारिरीक गरजा भागाव्यात या सर्व गोष्टी त्यामागे नाहीत का ?
माणसाने स्वतःच्या आनंदासाठी मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यावर उपकाराची भाषा करून त्याला या गोष्टीची जाणीव करून देण्याची पद्धत मोडीत निघायला हवी. सर्व सजीवांची उत्पत्ती हे निसर्गचक्र आहे. आपण फक्त निमित्तमात्र असतो. त्यामुळे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांवर फक्त जन्म दिला म्हणून अधिकारवाणीने हक्क गाजवून त्यांना चुकीच्या गोष्टीदेखील करायला भाग पाडणे अथवा त्यांच्यावर अत्याचार करणे हे या निसर्गचक्राचा गैरवापर केल्यासारखेच आहे.
त्यामुळे प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना फक्त जन्म दिला म्हणून अधिकार गाजवणे बंद केले पाहिजे व समाजानेही या विधानाचा ऊहापोह करून मुलांना फक्त ज्ञानाचे डोस पाजून कात्रीत पकडण्याऐवजी या मुलांना जीव लावावा, त्यांना माता पिता या नात्याने तुमचे प्रेम द्यावे, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावेत आणि फक्त जन्म दिला म्हणून नाही तर तुमच्या सुस्वभावाने, चांगल्या वर्तणुकीने, मायेने त्यांची मने जिंकावीत...
माता, पिता हे बनणे सोपे
संदेश सार्यांना कळवावा,
या नात्याचा सन्मान आपल्या
आचरणातून मिळवावा...
✒ K.Satish