आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून तिच्याविषयी गुणगान गाण्याचा अहंकारी आणि स्वतःबरोबरच इतरांचेही नुकसान करण्याचा बालिश प्रकार वाढीस लागला आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपण घेतलेले कपडे, आपण घेतलेली गाडी, आपण घेतलेले घर, आपण जेथे जेवायला गेलो ते हाॅटेल, आपण खरेदी केलेले दागिने...इत्यादी अनेक गोष्टी ज्या आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा आपण स्वतः निर्णय घेऊन उपभोग घेत आहोत. या सर्व गोष्टी प्रत्येकात असलेल्या अहंकारी स्वभावामुळे माझी वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्याच्या नादात बहुतांशी वेळा लोक आपलेच नुकसान करून बसतात. आणि स्वतःचा चुकलेला निर्णय इतरांसमोर मान्य करण्यात कमीपणा वाटत असल्याने आतल्या आत घुसमटत राहून त्या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत राहतात. व त्यांच्या या चुकीच्या वृत्तीमुळे इतर लोकांनी त्यांच्या एखाद्या निर्णयाचे अनुकरण केल्यास ते सुद्धा आपसूकच खड्डयात पडतात. आणि मग त्यांनी याविषयी चर्चा केल्यानंतर ही मंडळी त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाविषयी बोलून दाखवतात, परंतु तोपर्यंत त्याने स्वतःचे नुकसान केलेलेच असते त्याबरोबरच इतरांच्या नुकसानालाही तो कारणीभूत ठरलेला असतो.असाच अहंकार शाळा, काॅलेज निवडण्याच्या बाबतीत सुरू झालाय. माझा मुलगा, माझी मुलगी अमूक शाळेत, अमूक काॅलेजला आहे हे पालकवर्ग अतिशय अभिमानाने सांगताना दिसतात. मोठी मोठी नावे सांगताना, त्या संस्थेची ख्याती सांगताना पालकवर्ग थकत नाही. कारण हा त्यांनी घेतलेला निर्णय असतो. आणि आपण घेतलेला निर्णय इतरांसमोर वाईट किंवा चुकीचा ठरणे हा पालकांना आपला अपमान झाल्यासारखे वाटते. म्हणून ही केविलवाणी धडपड.
परंतु या सर्व खटाटोपात पालक हेच विसरून चाललेत की, काही बोटावर मोजण्याइतक्या शिक्षणसंस्था सोडल्या तर सर्व शिक्षणसंस्थांचे कामकाज हे शेअर मार्केटमधील दुय्यम दर्जाच्या बनावट कंपन्यांसारखे झाले आहे. आपल्या शाळेचा भाव वाढवण्यासाठी खोटे चित्र निर्माण करून मोठमोठ्या बढाया मारणे, पालकांना मोठी स्वप्न दाखवणे, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशाचेतरी आमिष देऊन त्याच्याद्वारेही शाळेची बनावट प्रसिद्धी करणे, विविध ॲक्टीव्हीटीजचे प्रेझेंटेशन करून आम्ही किती प्रमाणात मुलांना घडवण्यासाठी कार्यरत असणार आहोत हे दाखवले जाते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात यातील १० ते २० टक्केच चित्र खरे असते बाकी सर्व दिखावा. तुम्ही त्यांच्यासाठी फक्त पैसे छापण्याचे एक साधन असता. आणि या भ्रमातून जागे होईपर्यंत तुमचा आणि तुमच्या पाल्याचा आयुष्यातील कधीही परत मिळू न शकणारा बहुमूल्य वेळ वाया गेलेला असतो.
नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् ,
नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता ।
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ।।
खूप कष्ट करून गेलेली संपत्ती मिळवता येते.
विसरल्यामुळे गेलेली विद्या अभ्यास करून पुन्हा मिळवता येते. बिघडलेली तब्येत चांगले उपचार करून ती सुधारता येते. पण वेळ वाया घालवला तर तो गेला तो गेलाच.
म्हणून वेळेचं नुकसान कधीही भरून काढता येत नसल्याने वेळीच भ्रमातून जागे होऊन आपली खोटी फुशारकी मारणे थांबवायला हवे.
आपला पाल्य ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतोय त्या संस्थेचे गुणगान नक्कीच गावे परंतु संस्थेने निर्माण केलेल्या भ्रमाला पाहून, त्यांच्या दिखाव्याला भाळून नाही तर त्यांचे कामकाज प्रामाणिकपणे मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी होते आहे का ?, फक्त पैशाच्या बाजारात गुरफटून संस्था आपल्या नीतिमूल्यांना आणि मुलांचे भवितव्य घडवण्यासारख्या महान कार्याच्या मूळ उद्दिष्टाला मूठमाती तर देत नाहीये ना ? या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून.
आज एखाद्या निवासी सैनिकी शाळेत मुलांना दाखल केल्यानंतर पालक निर्धास्त राहून आता आपल्या पाल्याचा अगदी उत्तमप्रकारे सर्वांगीण विकास होणार या भ्रमात जगत राहतात. अनेकांना तर आपले काम पैसे भरणे एवढेच राहिले आहे असे वाटू लागते. बहुतांशी निवासी शाळा या त्यांच्या भरमसाठ फी स्ट्रक्चरच्या अनुषंगाने पालकांची आर्थिक कुवत पाहूनच विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करतात. परंतु, फक्त फी भरून आपल्याच विश्वात रममाण होण्याचे व शालेय संस्थांच्या खोट्या आश्वासनांना भुलून स्वतःचे मानसिक समाधान करून घेण्याचे धोरण पालकांनी अवलंबिल्यास ते त्यांच्याबरोबरच त्यांच्या पाल्याच्या, इतर विद्यार्थ्यांच्या व इतर पालकांच्याही नुकसानास कारणीभूत ठरू शकतात.
वेळीच पालकांनी भ्रमातून जागे होऊन शालेय संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी, मुलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी, निवासी सैनिकी शाळा असल्यास त्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाविषयी शालेय व्यवस्थापनाने वरवर दाखवलेल्या सुंदर चित्राला न भुलता वेळोवेळी गांभीर्याने पाठपुरावा करून शाळा व्यवस्थापनाचे काही चुकत असेल तर वेळीच निदर्शनास आणायला हवे. व त्यावर योग्य निर्णय वेळीच घ्यायला हवा.
कोणतीही संस्था असो वा व्यक्ती तो आपली जमेची बाजूच समोर मांडत असतो, आपल्या कार्याचे कौतुकच सांगत असतो. आपल्या चुकीचे प्रदर्शन मांडत नाही. कारण हा सर्व आता पैशाचा खेळ होऊन बसलाय.
आज आपण पैसे भरूनही मुलांच्या अधोगतीस हातभार लावतोय अशीच अनेक पालकांची अवस्था झालीय. पालकांचा हा भ्रम वेळीच तुटला नाही तर हळूहळू वेळ पुढे निघून जाते व आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पालकांना पर्यायच उरत नाही. पण या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया जाऊन कधीही न भरणारे नुकसान होऊन जाते.
हे सर्व सुधारावयाचे असेल तर प्रत्येक पालकाने शालेय प्रशासनाकडून मांडल्या जाणाऱ्या भ्रमित व दिशाभूल करणार्या चित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवणे थांबवायला हवे. आणि शालेय प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा वेळोवेळी एक सुजाण पालक ( फक्त पैसे भरणारी मशीन नव्हे ) म्हणून पाठपुरावा करून शाळेने दिलेल्या आश्वासनांची खरंच पूर्तता होत आहे ना याची योग्यप्रकारे खातरजमा करायला हवी.
लक्षात ठेवा, कोणतीही संस्था अगदी योग्यपद्धतीनेच काम करत असेल असे समजणे साफ चुकीचे आहे. आणि त्यांना वेळीच चुकीच्या कार्यपद्धतीविषयी जाब विचारला नाही तर त्यांचेही चुकीचे कामकाज करण्याचे धाडस वाढत जाऊन हळूहळू तिथे कर्तव्य विसरून पैसे छापण्याचा घाणेरडा खेळ सुरू होतो. आणि मग या खेळातून निर्माण झालेला भ्रष्टाचाररूपी राक्षस पालकांचे पैसे व विद्यार्थ्यांमधील विविध गुणांसोबतच त्यांच्या भवितव्यालाही गिळंकृत करून टाकतो.
म्हणून सर्वांनी वेळीच जागे व्हा व आपल्या योग्य हक्कांसाठी प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासा. मग समोर शालेय संस्था असली तरी डगमगू नये. कारण चुकीची कृती ही आपल्या प्रिय व्यक्तीकडूनही होऊ शकते. म्हणून काय आपण त्याला जाब न विचारता चुका करण्यासाठी प्रोत्साहन देतो का ?
बलात्कार करणे, लूटमार करून खून करणे हे अक्षम्य गुन्हे आहेत. अशा गुन्हेगारांना शासन करण्यासाठी लढणे ही खूप प्रशंसनीय गोष्ट आहे. परंतु हाच अपराध आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्यास त्याला जाब न विचारता त्याच्या या कृतीचे समर्थन करून त्याला पाठीशी घालणे ही अतिशय चुकीची भूमिका असे मी मानतो.
मग शाळेसारख्या वंदनीय संस्थेकडून चुकीची कार्यपद्धती अवलंबली जात असेल तर पालकांनी त्या चुका सुधारण्याची मागणी करायला का घाबरावे. बदल एका दिवसात घडत नाही हे मान्य. परंतु योग्य - अयोग्याची जाण ठेवून स्वतःच्या हक्कांसाठी प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर बदल कधीच घडणार नाही...
बघा विचार करून.......🙏🏻