Friday, June 25, 2021

ज्ञानरूपी तेल आणि बुद्धीचा दिवा

बुद्धीच्या दिव्यामध्ये ज्ञानाचे तेल ओतून त्याची वात अशी पेटवा की, हा दिवा निरंतर जळत राहून तुमचे जीवन अद्वितीय प्रकाशाने उजळून टाकील.

आणि या प्रकाशामुळे समाजातील इतरही वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात काही प्रकाशाची किरणे पडून त्यांच्या आयुष्याची लय सुधारण्यास मदत मिळेल.

✒ K. Satish








माणसं ओळखण्याची कला

चांगल्या माणसांच्या रागावण्याचा राग मानायचा नसतो...

कारण,

त्यामागे आपला मार्ग चुकू नये हाच उद्देश असतो.


गोड बोलून घात करणार्‍या स्वार्थी लोकांपेक्षा....

तोंडावर रागावणारे परंतु मनातून आपले हित पाहणारे हितचिंतक बरे


माणसं ओळखणे ही देखील एक कला आहे.

आणि ज्याला ती जमली तो नकळत होणाऱ्या मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवू शकतो.

✒ K. Satish



Tuesday, June 22, 2021

कर्तव्याची जाणीव ठेवा

 नमस्कार,
    आज एक संवेदनशील, सामाजिक पण दुर्दैवी विषय आपणा सर्वांसमोर मांडत आहे.
     आज कायद्याचे संरक्षण असल्याने सामान्य जनता सुखाने श्वास घेऊन जगण्याचे वेडे स्वप्न बाळगून आहे. खरेतर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत बर्‍याच लोकांना कळतंच नाही की, हा सामान्य जनतेसाठी असलेला कायदा व कायद्याने जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले पोलिस बांधव यांना धनदांडग्यांनी पैसा, सत्ता आणि ताकदीच्या जोरावर सामान्य जनतेच्या विरूद्ध त्यांची पिळवणूक करणारे हत्यार बनवले आहे.
     दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजातील विविध समस्या हाताळताना ज्या ज्या वेळी पोलीस खात्यातील लोकांशी संबंध आला त्या त्या वेळी पोलिसांची भूमिका ही फसवणूक अथवा छळवणूक करणार्‍या पैसेवाल्यांच्या बाजूनेच दिसली व सामान्य परंतु पैशाची लाच देऊ न शकणार्‍या अथवा लाच देण्याच्या विरूद्ध असणाऱ्या सरळमार्गी माणसांना पोलिस दमदाटी करताना दिसले. अनेकदा तर आत टाकण्याची भिती दाखवून त्यांना तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जाते. आयुष्यात फक्त दोनदाच प्रामाणिकपणाने पोलिसांनी सामान्य व्यक्तीस सहकार्य करतानाचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ते ही खात्यातील लोकांपासून दूर राहून.
     माझेही अनेक मित्र पोलिस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. पण पोलिस खात्याचे जे सामान्य लोकांसाठी असलेले संरक्षक कवच आहे ते इतके पोखरलेले आहे की, आज एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य नीट बजावले नाही तर त्याची तक्रार घेऊन वरिष्ठांकडे गेल्यास तिथे त्याहूनही जबर धक्का बसण्याची शक्यता असते कारण ही वाळवी वरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे माझ्या मित्रमंडळींनादेखील या समस्यांसाठी मदत मागायचे धाडस होत नाही. कारण तेदेखील याच सिस्टीमचा एक भाग आहेत.
    आज मीदेखील एकेकाळी सैन्यभरतीसाठी पात्र ठरलेला युवक होतो. शेवटच्या क्षणी काही घरगुती कारणांस्तव मला तो निर्णय बदलून औद्योगिक क्षेत्रात यावे लागले. कालांतराने मला ओळखणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी मला MPSC करून पोलिस खाते जाॅईन करण्याचा सल्ला दिला. तुमच्या सारख्या लोकांची पोलिस खात्याला गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते. परंतु माझे ग्रॅज्युएशन पूर्ण नसून वयदेखील पुढे निघून गेल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
    देशाच्या विकासासाठी, सामान्य लोकांच्या हक्कांसाठी तळमळ असलेला मी, पोलिस खाते जाॅईन करू शकलो नाही हे माझे भाग्यच समजतो. कारण पोलिसांचा जो भयानक चेहरा दिवसेंदिवस समोर येतोय तो पाहता माझी या खात्यात खूप घुसमट झाली असती आणि प्रामाणिकपणे कर्तव्य न बजावता येण्याचा मानसिक ताण वाढून मी कदाचित संपून गेलो असतो.
     आज पोलिस सामान्यांना धमकावून पैसेवाल्यांचे आदेश मानत असतील, तर त्यांनी एक विचार करावा की जर सीमेवर आमच्यासोबत तुमचेही रक्षण करणारे सैन्याचे जवान यांच्या हातात आपल्या स्वातंत्र्याची व जिवाची दोरी आहे. जर दुश्मन राष्ट्रांनी त्यांना सात पिढ्या बसून खातील इतका पैसा दिला आणि तुम्हा आम्हासारख्या सर्वांवरच अन्याय करायला सांगितला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल ? जर तुम्ही त्यांच्याकडून देशभक्तीची आणि प्राण पणाला लावून देशातील सर्व जनतेचे संरक्षण करण्याची अपेक्षा बाळगता तर मग तुम्हाला वैयक्तिक स्वार्थ सोडून धनदांडग्यांपासून न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य जनतेच्या बाजूने थांबण्यास काय हरकत आहे. पैसेवाल्या मस्तवाल लोकांना योग्य न्यायिक निर्णय घेण्यास भाग पाडण्यात तुमचे योगदान असूद्यात की.
    प्रत्येक पोलिस हा अंगावरची वर्दी काढून ठेवल्यावर आमच्यासारखा सामान्य माणूसच असतो, त्यालाही आमच्यासारख्या प्रापंचिक अडचणी असतात. त्यावेळी माणुसकीच्या नात्याने आमच्यासारखी सामान्य जनताच तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यात धडाडीने पुढे असते. मग वर्दी अंगावर आल्यावरच तुम्ही सामान्य जनतेला विसरून धनिकांच्या म्हणण्यानुसार वागायला का सुरूवात करता ?
    आज सामान्य जनता कायदा व पोलिसांच्या वर्दीचा मान राखते म्हणून पोलिसांचा प्रतिकार करत नाही म्हणून पोलिसांनी वर्दीच्या आडून सामान्यांचा छळ करणे कितपत योग्य आहे ?
     आज धनाढ्य शाळा प्रशासन पोलिसांचा धाक दाखवून त्याआडून पालकांना गुलामाची वागणूक देत असेल तर त्यातील पन्नास टक्के पापाचे भागीदार हे पोलिस प्रशासन आहे.
    एकूण परिस्थिती पाहता देशाची वाटचाल अधोगतीकडेच जाण्याची चिन्हे आहेत.
    खरंच देशभक्तीने प्रेरित होऊन पोलिस खाते जाॅईन केले असेल तर तुम्हाला आमचा सलाम... पण ती देशभक्ती तुमच्या कृतीतून दाखवून द्या. पैसा आज आहे आणि उद्या नाही. पैसेवाले पैशाच्या जोरावर तुम्हाला वापरून घेतील व विसरूनही जातील. ज्यावेळी तुम्ही पैशावर विकले जाता त्यावेळी त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. परंतु, सामान्य जनतेचा तळतळाट संपूर्ण कमावलेल्या पैशाला क्षणात मातीमोल करू शकतो.
    पोलिस मित्रांनो आणि बांधवांनो,
  ज्यावेळी कोरोनाच्या काळात तुम्ही तुमची ड्युटी बजावत होतात, त्यावेळी हीच सामान्य जनता तुम्हाला सलाम करत होती.
  ज्यावेळी गणेशोत्सव अथवा इतर सणांच्यावेळी तुम्ही रात्रंदिवस सेवा देता तेव्हा हीच सामान्य जनता तुमचा आदर करते आणि तुमचा ताण कमी करण्याहेतूने पोलिस मित्र व स्वयंसेवकांच्या रूपाने हिरीरीने सहभागी होते. आणि अशा अनेक प्रसंगी तुमच्या कार्याला सलाम करते.
  परंतु, याच सामान्य जनतेला ज्यावेळी त्यांच्या न्यायिक हक्कांसाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता असते त्यावेळी मात्र तुम्ही त्यांना कायद्याचा धाकदपटशा दाखवता. व त्यांना 
त्यांच्या न्यायिक हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ आणता. ही तुमची कृती मनाला अतिशय वेदना देऊन जाते.
     आज पोलिस खात्यावर जो 10 टक्के विश्वास उरला होता तो ही मातीमोल झाला. पोलिसांनी आपणही या लोकशाही राष्ट्रातील एक सामान्य नागरिक आहोत याची जाणीव ठेवून सत्याच्या बाजूने उभे राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे ही सर्व पोलिस प्रशासनाला नम्र विनंती......🙏🏻
✒ K. Satish






Sunday, June 20, 2021

बाप

वरून असे तो कणखर

मुलांना शिस्त लावे भयंकर,

म्हणूनच जीवन घडते मुलांचे

आणि होते सुखकर

✒ K. Satish



 

सुमधुर सूर

चोहीकडे घन दाटून आले

मन हे माझे अधीर जाहले,

नभातूनी मग सरी बरसूनी

सुंदर गोड असे सूर निघाले

✒ K. Satish



Friday, June 18, 2021

परीक्षेची तयारी

नियमित वाचन करूनी द्यावी

अचूक उत्तरे प्रश्नांची,

उत्तीर्ण होण्यासाठी न घ्यावी

साथ कधीही नकलांची

✒ K. Satish



Tuesday, June 15, 2021

वर्षा ॠतू

वर्षा ऋतू हा आला बरसत

नयनांत प्रेम हे साठले,

मनातं उठती मधुर भावना

मनी प्रेम हे दाटले

✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...