Tuesday, June 1, 2021

असे जगावे

आलो रडतंच जगात या मग

जीवनभर का बरे रडावे,

दुःखी क्षणांना सुखात बदलून

आनंदाने हसत जगावे.

✒ K. Satish



Monday, May 24, 2021

वाढदिवस म्हणजे काय ?

वाढदिवस म्हणजे काय?


आपण ह्या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या दिवसाची आठवण...


आपल्या अस्तित्वाने प्रफुल्लित होणाऱ्या लोकांकडून व्यक्त होणार्‍या प्रेमरूपी सागरात डुंबणे...


जीवनयात्रेत पुढे पुढे मार्गक्रमण करताना दिवसागणिक आलेल्या अनुभवांच्या वृद्धिंगत झालेल्या साठ्यामुळे आपल्या परिपक्वतेत वाढ झाल्याचा अनुभव...


आयुष्यामध्ये आपल्या सुस्वभावामुळे, सहकार्याच्या भुमिकेमुळे, मधुर वाणीमुळे, बुद्धीचातुर्यामुळे, आणि चांगल्या कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये आपल्यासाठी छोटीशी जागा निर्माण करण्यात यश आले असेल त्या सर्वांकडून प्रेमभावनेतून मिळालेल्या शुभेच्छांचा स्वीकार करणे...

✒ K. Satish





Wednesday, May 12, 2021

प्रेक्षागृह

पूर्वी माणसांची मनेही मोठी होती

आणि तशीच मोठी प्रेक्षागृहेही होती.

हळूहळू संकुचित झालेल्या मनांप्रमाणेच

प्रेक्षागृहेदेखील छोटी होत गेली.

✒ K. Satish



Tuesday, May 11, 2021

विश्वासघाताचा खंजीर

आपल्या विरोधी शत्रूपासून सावध असूनही

आपल्याला दगाफटका होतोच....

कारण आपला घात करणारा

विश्वासघाताचा खंजीर

आपल्या विरोधकाकडे नसून

आपल्याच एखाद्या निकटवर्तीयाकडे असतो.

✒ K. Satish



Thursday, April 29, 2021

सत्याचा सामना

परिस्थिती ही आहे गंभीर

खंबीरपणाने लढायचे,

कधीतरी मृत्यू येणारच हो

मग का झुरून मरायचे ?

✒ K. Satish



Sunday, April 11, 2021

थांबवा रे...

      कोरोना खोटा आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. कारण त्याचा त्रास मी स्वतः अनुभवला आहे. परंतु , त्याच्या नावाखाली अनेकजण आपली पोळी भाजण्याचा जो काही घाणेरडा प्रकार करीत आहेत त्याचा निषेध करावा तितका कमी.

     पण मरणाऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांकडून चांगल्याची अपेक्षा कशी करता येईल ?

     मूठभर राजकारण्यांच्या हाती देश चालवायला दिलेल्या सामान्य नागरिकांना मात्र या राजकारण्यांच्या राजकीय कुरघोड्यांचे शिकार होऊन या देशाचे खरे वारसदार असतानाही गुलामगिरीचे आयुष्य जगावे लागते.

     याहून मोठी धक्कादायक व दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असेल ? ? ?

✒ K. Satish



Wednesday, April 7, 2021

योग्य संगत महत्वाची

     सोन्या पासून निरनिराळे दागिने तयार होतात. परंतु प्रत्येक दागिना हा नजरेत भरतोच असे नाही. कारण त्याची सुंदरता ही तो दागिना घडविणाऱ्या कारागिराच्या कौशल्यावर व कामाप्रती असलेल्या निष्ठेवर अवलंबून असते.

     सुंदर घडलेल्या दागिन्याचे सर्वच जण कौतुक करतात व प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो. आणि तो दागिना ज्याच्याजवळ असेल त्याचीही प्रशंसा होते.

     आपल्या जीवनातही असेच आहे. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी त्या बुद्धीचा वापर योग्यरितीने व योग्य ठिकाणी कशाप्रकारे करावयाचा याचे ज्ञान येण्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन लाभणे तसेच चांगल्या लोकांच्या सहवासात राहणे गरजेचे असते.

     चुकीचे मार्गदर्शन अथवा चुकीच्या लोकांची संगत लाभल्यास बुद्धिमान व्यक्तीचेही चातुर्य कुमार्गासाठी वापरले जाऊन त्याची वाटचाल अधोगतीकडे जाते.

     त्यामुळे नेहमी चांगल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली व चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास आपली प्रगती होऊन जनमानसांत आपली प्रशंसा झाल्याशिवाय राहणार नाही.

✒ K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...