किती ही गुलामी...किती ही लाचारी...
पैशाच्या मोहापायी, प्रस्थापितांच्या भीतीपोटी आणि भावनांच्या जंजाळात अडकून किती दिवस असे गुलामगिरीचे आयुष्य जगत राहणार ?
मृत्यू हे अटळ सत्य आहे. आणि प्रत्येकाला हे काही चुकले नाही.
मग पावलोपावली गुलामगिरीचे घाव सोसत, आपला स्वाभिमान विकून आपल्या विचारांची आहुती देऊन दुसर्याच्या मर्जीने...किंबहुना त्याच्या अन्यायकारक आदेशाने जगणे म्हणजे जिवंत देहाला आलेला मृत्यूच नाही का ?
आणि हा मृत्यू आपल्याला या जगातून कायमचे घेऊन जाणार्या मृत्यूपेक्षा महाभयंकर व अतिकष्टदायी असतो. त्यामुळे गुलामगिरीचे आणि लाचारीचे वस्त्र पांघरूण जगणार्यांना खर्या अर्थाने जगताच येत नाही.
अन्यायाविरूद्ध बंड पुकारणार्यांची संख्या दिवसेंदिवस या देशात घटत गेली आणि स्वयंकेंद्रित, स्वार्थी, अप्पलपोट्या, चमचेगिरी करणार्या गुलामांची संख्या वाढत गेली. आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सामान्य जनतेला छळणार्यांच्या अशा हस्तकांमुळे उर्वरित सर्व नागरिकांवर त्यांच्या मनाविरुद्ध गुलामगिरीचे जीवन जगण्याची वेळ आली. किंबहुना जगणे हे असेच असते अशीच काहीशी धारणा या सर्व लोकांची होऊन बसली आहे.
नीट विचार करून पहा...यासाठीच आपणा सर्वांना मानवी जन्म लाभला आहे का ?
आज दुसर्यावर अन्याय झालेला पाहून काही लोक आनंदित होतात. तर काही लोक तो अन्याय पाहून मनातून भयभीत होऊन स्वतःवर ही परिस्थिती ओढवू नये म्हणून पीडितांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याऐवजी अन्याय करणार्याची गुलामगिरी पत्करून पीडितच कसा अपराधी आहे हे समाजात सांगत फिरत अन्याय करणार्यांचे वकीलपत्रच स्वतःच्या हाती घेतल्यासारखी कृती करतात.
अन्यायाला बळ मिळते ते कशामुळे ? अशाच लोकांमुळे आणि त्यांच्या अशा असंवेदनशील कृत्यांमुळे.
अन्याय करणार्याला फक्त गुलाम हवे असतात. कारण त्याला त्याची हुकूमत गाजवायची असते. आणि भविष्यात त्याच्या हस्तकांनी त्याच्या मनाविरुद्ध एखादे जरी कृत्य केले तर मग तो त्यांना क्षणात त्याच्या नजरेत त्यांची लायकी काय आहे हे दाखवून देतो. आणि त्यानंतर मग या मंडळींच्या मनात उठणार्या वादळाचे वर्णन न केलेलेच बरे.
त्यामुळेच आपण नेहमी ऐकत आलेले एक सत्य, ' अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. ' या सत्यवचनाचा नीट गांभीर्याने विचार करून सर्वांनी एकतर अन्याय निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवावा. अन्यथा अन्यायाविरूद्ध आवाज उठवणार्या क्रांतीकारी विचारांच्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.
मृत्यू अटळ आहे. तो कुणाला चुकला नाही. सगळे ऐश्वर्य इथेच सोडून जायचे आहे. मग आपल्याला मिळालेले मानवी जीवन असे रडत रडत गुलामगिरीत, अन्याय सहन करत जगण्यात काय अर्थ आहे ?
सर्वांनी याचा नीट विचार करावा, आत्मचिंतन करावे. व मी म्हणतो म्हणून नाही...तर तुम्हाला खर्या अर्थाने आत्मसुख मिळण्याकरिता या विषयाकडे गांभीर्याने पहावे.
कारण स्वाभिमान टिकवून जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्याग करावा लागतो, प्रसंगी प्रस्थापितांशी-धनदांडग्यांशी-हुकूमशाही गाजवणार्यांशी वैर पत्करावे लागते. हे जरी खरे असले तरी स्वाभिमानाने जगण्यात आणि स्वाभिमान टिकवून मरण्यातदेखील जे सुख जे समाधान आहे, ते करोडो रुपयांच्या संपत्तीमध्ये नाही.
लाचारीचे व्यर्थ ते जीवन
स्वाभिमान टिकवूनी जगावे,
अन्यायाशी लढताना
मृत्यूलाही सामोरे जावे
पाहूनी तुमचा निर्भीड बाणा
सच्ची तळमळ, स्वाभिमानी मन,
कदाचित मृत्यूही जाईल
परतूनी तुम्हांस करूनी वंदन
✒ K. Satish