Wednesday, March 10, 2021

पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


अडचणींचा तो विशाल डोंगर

अदम्य जिद्दीने करूनी पार,

शिक्षित करूनी स्त्री जातीला

केला अज्ञानावरी वार


स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्‍या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसेविका

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

यांच्या पावन स्मृतीस त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish



Monday, March 8, 2021

स्वाभिमानी बाणा

     किती ही गुलामी...किती ही लाचारी...

     पैशाच्या मोहापायी, प्रस्थापितांच्या भीतीपोटी आणि भावनांच्या जंजाळात अडकून किती दिवस असे गुलामगिरीचे आयुष्य जगत राहणार ?

     मृत्यू हे अटळ सत्य आहे. आणि प्रत्येकाला हे काही चुकले नाही.

     मग पावलोपावली गुलामगिरीचे घाव सोसत, आपला स्वाभिमान विकून आपल्या विचारांची आहुती देऊन दुसर्‍याच्या मर्जीने...किंबहुना त्याच्या अन्यायकारक आदेशाने जगणे म्हणजे जिवंत देहाला आलेला मृत्यूच नाही का ?

     आणि हा मृत्यू आपल्याला या जगातून कायमचे घेऊन जाणार्‍या मृत्यूपेक्षा महाभयंकर व अतिकष्टदायी असतो. त्यामुळे गुलामगिरीचे आणि लाचारीचे वस्त्र पांघरूण जगणार्‍यांना खर्‍या अर्थाने जगताच येत नाही.

     अन्यायाविरूद्ध बंड पुकारणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस या देशात घटत गेली आणि स्वयंकेंद्रित, स्वार्थी, अप्पलपोट्या, चमचेगिरी करणार्‍या गुलामांची संख्या वाढत गेली. आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सामान्य जनतेला छळणार्‍यांच्या अशा हस्तकांमुळे उर्वरित सर्व नागरिकांवर त्यांच्या मनाविरुद्ध गुलामगिरीचे जीवन जगण्याची वेळ आली. किंबहुना जगणे हे असेच असते अशीच काहीशी धारणा या सर्व लोकांची होऊन बसली आहे.

     नीट विचार करून पहा...यासाठीच आपणा सर्वांना मानवी जन्म लाभला आहे का ?

आज दुसर्‍यावर अन्याय झालेला पाहून काही लोक आनंदित होतात. तर काही लोक तो अन्याय पाहून मनातून भयभीत होऊन स्वतःवर ही परिस्थिती ओढवू नये म्हणून पीडितांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याऐवजी अन्याय करणार्‍याची गुलामगिरी पत्करून पीडितच कसा अपराधी आहे हे समाजात सांगत फिरत अन्याय करणार्‍यांचे वकीलपत्रच स्वतःच्या हाती घेतल्यासारखी कृती करतात.

     अन्यायाला बळ मिळते ते कशामुळे ? अशाच लोकांमुळे आणि त्यांच्या अशा असंवेदनशील कृत्यांमुळे.

     अन्याय करणार्‍याला फक्त गुलाम हवे असतात. कारण त्याला त्याची हुकूमत गाजवायची असते. आणि भविष्यात त्याच्या हस्तकांनी त्याच्या मनाविरुद्ध एखादे जरी कृत्य केले तर मग तो त्यांना क्षणात त्याच्या नजरेत त्यांची लायकी काय आहे हे दाखवून देतो. आणि त्यानंतर मग या मंडळींच्या मनात उठणार्‍या वादळाचे वर्णन न केलेलेच बरे.

      त्यामुळेच आपण नेहमी ऐकत आलेले एक सत्य, ' अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. ' या सत्यवचनाचा नीट गांभीर्याने विचार करून सर्वांनी एकतर अन्याय निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवावा. अन्यथा अन्यायाविरूद्ध आवाज उठवणार्‍या क्रांतीकारी विचारांच्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.

     मृत्यू अटळ आहे. तो कुणाला चुकला नाही. सगळे ऐश्वर्य इथेच सोडून जायचे आहे. मग आपल्याला मिळालेले मानवी जीवन असे रडत रडत गुलामगिरीत, अन्याय सहन करत जगण्यात काय अर्थ आहे ?

     सर्वांनी याचा नीट विचार करावा, आत्मचिंतन करावे. व मी म्हणतो म्हणून नाही...तर तुम्हाला खर्‍या अर्थाने आत्मसुख मिळण्याकरिता या विषयाकडे गांभीर्याने पहावे.

     कारण स्वाभिमान टिकवून जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्याग करावा लागतो, प्रसंगी प्रस्थापितांशी-धनदांडग्यांशी-हुकूमशाही गाजवणार्‍यांशी वैर पत्करावे लागते. हे जरी खरे असले तरी स्वाभिमानाने जगण्यात आणि स्वाभिमान टिकवून मरण्यातदेखील जे सुख जे समाधान आहे, ते करोडो रुपयांच्या संपत्तीमध्ये नाही.

लाचारीचे व्यर्थ ते जीवन
स्वाभिमान टिकवूनी जगावे,
अन्यायाशी लढताना
मृत्यूलाही सामोरे जावे


पाहूनी तुमचा निर्भीड बाणा
सच्ची तळमळ, स्वाभिमानी मन,
कदाचित मृत्यूही जाईल
परतूनी तुम्हांस करूनी वंदन

✒ K. Satish






Wednesday, March 3, 2021

वन्यजीवन

नावाखाली प्रगतीच्या कुणी

जंगलतोड ती करू नये,

पशुपक्ष्यांचा हक्क वनावरी

घर त्यांचे ते मोडू नये

✒ K. Satish



Sunday, February 28, 2021

गरज राजकीय प्लास्टिक सर्जरीची

     आपल्या देशात आजतागायत चालत आलेल्या राजकारणाविषयी माझं मत काही चांगलं नाहीच. त्यामुळे मी राजकारणाचा सतत तिरस्कारच करत आलोय.

     परंतु काळाच्या ओघात हे कळून चुकलंय की, राजकारणाचा तिरस्कार करून दुर्लक्षित करणारी ही बाब नाहीये. कारण राजकारणाशिवाय देश चालूच शकत नाही. देशातील समस्यांचे, जनतेच्या अडीअडचणींचे निराकरण करणे शक्य होणार नाही. आणि म्हणूनच माझे असे मत झाले आहे की, इथून पुढे जर का देशातील जनतेला सुखी ठेवून, सर्व देशात शांतता, बंधुभाव आणि समतेचे राज्य प्रस्थापित करून आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर राजकीय क्षेत्रात चांगल्या विचारांनी प्रेरित झालेल्या... तोडा, फोडा आणि राज्य करा या  जुन्या राजकीय पद्धतीला फाटा देणार्‍या सुविचारी तरूण तरुणींनी सहभाग घ्यायला हवा.आणि अशा असंख्य तरूण- तरुणींची एक मोठी फळी तयार होणे गरजेचे आहे.

     फक्त दुर्दैवाने हे नमूद करावेसे वाटते की, चांगल्या विचारांच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळावावयाचे असेल तर सध्याच्या प्रस्थापितांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे सुदृढ बलवान शरीर आणि पैसा यांची साथ असणे आवश्यक झाले आहे. कारण सत्ता, पैसा आणि ताकद यांच्या प्रभावाखाली दबून देशातील जनता स्वाभिमानाने जगणेच विसरून गेली आहे. व त्याचबरोबर राजकीय भक्तीला उधाण येऊन जनतेला या गोष्टीचा विसर पडलाय की, आपला भारत देश म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राष्ट्र आहे. आणि राजकीय पुढारी हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन देशाचा कारभार चालवणारे आणि त्याअनुषंगाने जनतेच्या सामाजिक आणि मूलभूत समस्या सोडवून त्यांना चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे एक जनसेवक आहेत.

     आणि म्हणूनच या सर्व जनतेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करावयाचे असेल तर आत्ताच वर सांगितल्याप्रमाणे बदल घडायला सुरूवात होणे आवश्यक आहे.

     आणि हे अवघड आहे परंतु अशक्य मुळीच नाही.

     वेळ आणि परिस्थितीनुसार अशक्यदेखील शक्य होते.

     आत्ता जर सुरूवात झाली तर कदाचित आत्ताच्या पिढीला त्याचे पाहिजे तसे परिणाम पहावयास मिळणार नाहीत. परंतु, पुढील पिढीस मात्र नक्कीच खर्‍या अर्थाने आपण जनतेच्या राज्यात, खर्‍या लोकशाहीसंपन्न देशात राहत असल्याची अनुभूती येईल.....!!!


धन्यवाद...!!!

✒ K. Satish



Wednesday, February 24, 2021

प्रवास

आयुष्याचा प्रवास हा

अडथळे रस्त्यामध्ये अगणित,

पार करूनी त्यांना अलगद

पुढे निघालो मीही ऐटीत

✒ K. Satish





Tuesday, February 23, 2021

वंदन थोर समाजसुधारकांना

थोर समाजसुधारक - संत गाडगेबाबा


पैशाची चणचण असेल तर जेवणाची भांडी विका.

दागदागिने खरेदी करू नका. तुटक्या फुटक्या घरात रहा. पण मुलांना शिक्षण अवश्य द्या.


शिक्षणाविषयी अतिशय मार्मिक टिप्पणी करणारे,

शिक्षणाला अतिशय महत्त्व देणारे, शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून सांगणारे,

मानवतावादी विचारांचा प्रसार करून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला चढवणारे,

स्वच्छतेचे महत्त्व लोकांना आपल्या कृतीद्वारे पटवून सांगणारे अखंड भारतातील महान संत - थोर समाजसुधारक

' संत गाडगेबाबा '

यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish



Monday, February 22, 2021

लाडक्या लेकीस वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या लेकीस, सिद्धीस

जन्मदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा...


आनंदाचा क्षण हा आला

जन्मदिन हा तुझा गं आला,

धकाधकीच्या जीवनात या

आनंदाचा वर्षाव झाला 


प्रगतीपथावर जावे तू गं

स्वतःस घडवत न्यावे तू गं,

येथील अडथळे अगणित तरीही

अद्वितीय कार्य करावे तू गं 


क्षमता आहे तुझ्यात मोठी

जिद्द, चिकाटीदेखील मोठी,

आकार देऊन जीवनास तू

कार्य करावे देशासाठी

✒ K. Satish





कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...