Monday, August 24, 2020

चित्रपट

सत्याचा आरसा असावा
चित्रपट हा मनी ठसावा,
पैशांसाठी बीभत्सतेला
इथे कदापि थारा नसावा

✒ K. Satish

 

Saturday, August 15, 2020

उपेक्षित पोशिंदा

     कोरोना या विषाणूची महाभयंकर साथ आली आणि तिने काही काळातच संपूर्ण जगाच्या धकाधकीच्या जीवनाला लाॅकडाऊनचे कुलूप लावून स्तब्ध करून टाकले.
     क्षणाक्षणाला पैसा कमावण्यासाठी, उचित ध्येय गाठण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरू होती. आणि इथून पुढील काळात या अशा धकाधकीच्या जीवनाशिवाय शांततेने जीवन जगता येऊ शकेल ही कल्पनाच कालबाह्य होत चालली होती. परंतु, शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न उद्भवल्यावर सर्वांना नाईलाजाने थांबावेच लागले. कारण हा देह असेल आणि त्यात प्राण असेल तरच या धावपळीला, प्रगतीला, ऐशआरामाच्या वस्तूंना आणि आजकाल सर्वांत जास्त महत्व प्राप्त झालेल्या पैशाला अर्थ आहे. म्हणून मग सगळेजण उद्याची चिंता सोडून स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी किंबहुना पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यप्राण्यांचे जीवन वाचवण्यासाठी घरात बंदिस्त होऊन जगू लागले.
     या अनपेक्षित बंधनाचा उपयोग प्रत्येकजण स्वतःच्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या कलागुणांना वाव देणे, वाचन - लिखाण, बैठे खेळ खेळणे, निरनिराळ्या पाककृती शिकणे, एखादी सुप्त आवड जोपासण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही तिला चालना देणे...अशा निरनिराळ्या मार्गातून करू लागला.
     हे सर्व करताना थोडा फार त्रास सर्वांना सहन करावा लागला. आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. भविष्याचे प्रश्नचिन्ह कित्येकांच्या पुढे उभे राहिले परंंतु तरीही कोणाचे जगणे थांबले नाही. कारण दोन वेळचे, नाहीतर किमान एका वेळेचे जेवण तरी सर्वांना मिळत होते. बाकी व्यवहार थांबले तरी जगण्यासाठी या शरीराला अन्न मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जग थांबले तरी सर्वांना जगवण्यासाठी लागणारे अन्नधान्य, भाजीपाला पिकविणारा शेतकरी हा या मानवजातीला त्यांच्या आयुष्यातील या विलक्षण संकटातदेखील हा मानवी देह टिकवून ठेवण्यासाठी लागणार्‍या अन्नाची सोय करण्यासाठी राबत होता.
     खरंच या संकटाने निसर्ग, शेती आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या या पृथ्वीतलावरील उपयुक्ततेची, आवश्यकतेची सर्वांनाच प्रकर्षाने जाणीव करून दिली आहे. या प्रगतीच्या युगात आपण अनेक अत्याधुनिक उपकरणे, आलिशान गाडी, मोठा बंगला, ऐशआरामातील जीवनशैली यांच्या मोहात पडून वाहवत गेलो होतो. परंतु या दोन अडीच महिन्यात सर्व मानवजातीला या ऐशआरामाच्या जीवनाचा उपभोग घेणे तर दूरच... पण त्याची आठवणदेखील झाली नाही. परंतु पोटाला अन्न मात्र प्रत्येकाला हवे होते. कारण या सर्व आभासी दुनियेतील सुखांचा उपभोग घेण्यासाठी हा देह आणि त्यामध्ये प्राण असणे आवश्यक आहे. आणि हा देह जगवण्यासाठी अन्न आणि पाण्याने त्याचे पोषण करणे जरुरीचे आहे. त्यामुळे पुरेसे अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध असल्याने वेगवान आयुष्याला ब्रेक लागूनही मानवजातीला ब्रेक लागला नाही.
     या परिस्थितीतून एक प्रश्न समोर उभा राहतो की, भरपूर संपत्ती असणार्‍या, उच्च आलिशान जीवनशैली जगणार्‍या (अर्थात हाय-फाय लाईफस्टाईल जगणार्‍या ), असंख्य लोकांच्या लवाजम्यात अनेक अंगरक्षक सोबत घेऊन फिरणार्‍या लोकांना मान देण्याची, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची या जगात प्रथाच पडली होती. परंतु, मानवासाठी सर्वात अत्यावश्यक असलेले अन्नधान्य व भाजीपाल्याची सोय करणार्‍या शेतकरी राजाला मात्र त्याच्या या महान कार्याबद्दल कधी एवढा मानसन्मान दिला गेला नाही.
     आतातरी सध्याच्या परिस्थितीतून सर्वांनी बोध घ्यावा. नुसते शेतीप्रधान देश म्हणून चालणार नाही, तर शेती ही प्रथमस्थानी नजरेसमोर ठेवून शासनानेदेखील पुढील आराखडा तयार करायला हवा. देशाची प्रगती करताना प्रथम शेतीला वैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे. शेतकरी राजाला फक्त नावापुरते राजा म्हणून चालणार नाही, तर त्याच्या कार्याची योग्य दखल घेऊन त्याला यथोचित मानसन्मान दिला गेला पाहिजे.
     मला निश्चित खात्री वाटते की, मानवाने कितीही प्रगती केली तरी भविष्यकाळात जो देश शेतीला प्राधान्य देऊन प्रथम क्रमांकाचा व्यवसाय बनवेल, जास्तीत जास्त तरूणपिढीला शेती करण्यासाठी प्रेरित करेल किंबहुना तरूणपिढी शेतीकडेच आकर्षित होईल अशी अभूतपूर्व क्रांती या व्यवसायात घडवून आणेल. त्या देशासमोर सर्व मानवजातीला नतमस्तक व्हावेच लागेल.

सर्व शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करून 
सर्व मानवजातीतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो...!!!

✒ K. Satish

 

Wednesday, August 12, 2020

शब्दों के सागर - शायरी के बादशाह को भावपूर्ण श्रद्धांजली

दो गज सही ये मेरी मिलकियत तो हैं
ऐ मौत तूने मुझे जमीदार कर दिया ।


दिल को छू गई शायरी आपकी
हर शेर में छलकती थी जिंदादिली आपकी
मौत तो आनी थी इक दिन वो आज आ गयी
उसको भी भा गई हर अदा आपकी ।

शब्दों के सागर - शायरी के बादशाह
जनाब राहत इंदौरी साहब को भावपूर्ण श्रद्धांजली...!!!

🙏🏻 K. Satish



 

Sunday, August 9, 2020

आयुष्याचे पुस्तक

आयुष्याचे पुस्तक हे
वाचतो आहे क्षणाक्षणाला,
प्रत्येक पान असे महत्त्वाचे अन्
महत्त्व असे प्रत्येक शब्दाला

✒ K. Satish

 

Saturday, August 8, 2020

माझी मुलगी...माझी दौलत

तूच माझी प्रतिकृती
तूच माझी सावली,
तुझ्या रूपानं मला जगातील
अनमोल दौलत घावली

                                 K. Satish

Wednesday, August 5, 2020

आला श्रावण

श्रावणमासे रिमझिम बरसे
वारा वाहे जोराने,
मन हे नाचे थुईथुई जणू त्याचा
ठाव घेतला मोराने

 K. Satish




Tuesday, August 4, 2020

सोशल मिडीयाचे गांभीर्य

     आजकाल सोशल मिडीया हे माध्यम म्हणजे नवीन पिढीसाठी खरेतर एक वरदान आहे. परंतु या वरदानाला अतिउत्साही, काही अंशी अहंकारी आणि सामाजिक भान नसणारी मंडळी शापामध्ये परिवर्तित करीत आहेत.
     आजच्या या अतिजलद व धकाधकीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य होत नाहीये. तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येकाला व्यक्त होता येत आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास या माध्यमाद्वारेच त्वरीत मदत पुरवणे शक्य होत आहे. या प्रगतीमुळेच वर्षानुवर्षे दूर असलेल्या मित्रमंडळींची पुन्हा गाठभेट होणे शक्य झाले आहे.
     आपला व्यवसाय वाढवणे, चांगल्या विचारांचा प्रसार करणे, सामाजिक एकात्मतेला जोपासण्यात सुद्धा हिचा महत्वाचा वाटा आहे.
     पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा या माध्यमांचा योग्य आणि चांगल्या मानसिकतेतून उपयोग केला जाईल.
     परंतु दुर्दैवाने काही अपप्रवृत्तींमुळे म्हणा अथवा प्रत्येक गोष्ट ही थट्टेवारी नेऊन त्याची मजा बघणार्‍या व्यक्तींमुळे म्हणा, सोशल मिडीयाचा सध्या सर्रास गैरवापर होताना दिसत आहे. काही लोक तर आपल्या अहंकारी वृत्तीमुळे एकाच पोस्टचा वापर सोयिस्कररित्या आपल्याला आवडणार्‍या महापुरूषांच्या, संतांच्या, नेत्याच्या नावाने तसेच आपल्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या नावाने करताना दिसतात. आणि इतर मंडळीही पूर्णपणे न वाचता अशा पोस्ट व्हायरल करतात. आत्ताच्याच परिस्थितीतील कोरोना व्हायरसविषयी बघितले तर एका चुकीच्या पोस्टने पोल्ट्री व्यवसाय हा काहीही कारण नसताना नेस्तनाबूत होताना दिसला. कित्येक संसार उद्ध्वस्त होताना दिसले.
     हे समाजातील घटक नव्हते का ? अशा चुकीच्या बातम्या पूर्ण गांभीर्याने विचार न करता पुढे पाठवणे हे कुठेतरी आपण सामाजिक भान विसरल्याचे लक्षण नाही का ?
     आजच्या अशा बिकट प्रसंगी सूज्ञ म्हणवणार्‍या लोकांनी भीती पसरवण्याऐवजी सर्वांमध्ये हिम्मत निर्माण करून सर्वांना धीर द्यायला हवा.
     आपण लहानपणी नेहमी एक गोष्ट ऐकत आलोय. ' भीतीचे विष '....जर एखाद्या माणसाला मुंगी चावली आणि त्याच्या समोरून जर साप गेला तर तो माणूस भीतीनेच मरतो. प्रत्यक्षात त्याला साप चावलेला नसतो. आणि दुसरीकडे एखाद्याला एखादा बिनविषारी साप चावून गेलेला असतो. परंतु त्याचे सापाकडे लक्ष न जाता तो मुंगी चावली असेल असे समजून थोडे चोळून आपल्या कामाला लागतो. त्याला काहीच होत नाही.
     सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कुठल्याही आजारापेक्षा त्या आजाराच्या भीतीची तीव्रता जास्त असते. त्यामुळे सूज्ञ समाजाने, सामाजिक जबाबदारी असणार्‍या प्रसारमाध्यमांनी आणि सोशल मिडीयावर कार्यरत असणार्‍या सर्व नागरिकांनी भीती पसरवणे व भीती बाळगणे सोडून या आजाराची लक्षणे असणार्‍या रूग्णांना धीर देण्याची, सावधानता व निगा राखण्याविषयी प्रबोधन करण्याची व संकटाला निर्भीडपणे तोंड देण्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्याची गरज आहे, असे मला वाटते. आणि हे तुम्हा आम्हा, सार्‍यांचे परमकर्तव्य आहे. कारण
     ' सृष्टी आहे तर जीवन आहे.
     जीवन आहे तर मनुष्य आहे.
     आणि मानवजातीला वाचवण्याची ताकदही मनुष्यात आहे.
     व तिला संपवण्याचे अस्त्रही त्याच्याच हातात आहे. '

धन्यवाद...!!!

K. Satish

 

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...