Friday, August 23, 2024
बदल घडावा...पण सुरूवात कोठून ?
Wednesday, July 5, 2023
Monday, May 8, 2023
महाराष्ट्र शाहीर
मराठी चित्रपट
महाराष्ट्र शाहीर ✒🎙🎼
( शाहीर साबळेंचा जीवनपट )
कलेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याची लोककलावंतांची धडपड सुरू असते, परंतु हे सर्व करताना त्याला वैयक्तिक जीवनात किती तडजोडी कराव्या लागतात, किती अडचणींना सामोरे जावे लागते त्याचे उत्तम चित्र रेखाटले आहे. सर्वांनी नक्कीच पहावा असा चित्रपट...आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्यांनी तर पहायलाच हवा व आपल्या मुलांनादेखील अवश्य दाखवायला हवा. हा चित्रपट अतिरंजित चित्रपटांसारखा तुमच्या हृदयाचे ठोके बिघडवणार नाही, उलट हृदय संवेदनशील बनवून तुमच्यात नवी ऊर्जा नक्कीच भरेन...
सर्व स्तरावर प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा उत्तम चित्रपट....👍🏻👌🏻
@ के. सतीश ( कवी, गीतकार ) पुणे
Friday, May 5, 2023
छुपे षडयंत्र
त्यातच गावातील एक दलित स्त्री उच्चशिक्षण घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि गावाच्या विकासासाठी लढत असते. एका कनिष्ठ जातीतील महिला असूनही तिची वाढत चाललेली लोकप्रियता ही त्या प्रतिष्ठित राजकारण्याला खटकू लागते. तो दिवसरात्र त्या महिलेला कसे नामोहरम करता येईल व तिचे कसे मानसिक खच्चीकरण करता येईल याचाच विचार करत असतो. परंतु असे करताना त्याला स्वतःला तर या प्रकरणापासून दूर ठेवायचे असतेच, पण त्या महिलेला त्रास झाल्यास तिला सहानुभूती मिळून हे प्रकरण चिघळू नये व जागीच शांत व्हावे असे काहीतरी करण्याची त्याची इच्छा असते.
विचार करता करता त्याला एक धूर्त कल्पना सुचते व तो त्याच्या अंमलबजावणीच्या तयारीला लागतो.
त्या गावात एक ठार वेडा मनुष्य रहात असतो. त्याला गोंजारून, आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. १५ - २० दिवसांच्या प्रयत्नानंतर तो वेडा पूर्णपणे त्याच्या अधिपत्याखाली येतो. तो धनाढ्य व्यक्ती जे सांगेल ते करणे येवढेच तो करू लागतो.
एके दिवशी ठरलेल्या कारस्थानानुसार तो त्या महिलेविषयी काही गोष्टी त्या वेड्याच्या मनात पेरतो व त्या वेड्याकरवी त्या महिलेचा विनयभंग करण्याचे षडयंत्र रचतो.
ठरल्याप्रमाणे ती महिला गावातून जात असताना ज्यावेळी लोकांची जास्त वर्दळ नसेल हे हेरून त्या वेड्याला त्या महिलेच्या आसपास पोहोचविले जाते. अर्थात या सर्व कामात त्या राजकारण्याचे इतर कार्यकर्तेदेखील मदत करत असतात व सर्व परिस्थितीवर नजर ठेवून असतात. त्या वेड्याला अशाप्रकारे तयार केलेले असते की, ती महिला समोर दिसताच क्षणार्धात तो तिच्यावर झडप घालतो. त्या महिलेला काहीच सुचत नाही. आजूबाजूला काही लहान मुले खेळत असतात. बाकी मोठी माणसे क्षणार्धात पोहोचू शकतील अशा टप्प्यात नसतात. तो राजकारणी व त्याचे चमचे मात्र लपून सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात. आणि त्या वेड्याने केलेला हल्ला इतका जबरदस्त असतो की, काही सुचायला उसंतच मिळत नाही. तो मिनिटाच्या आत त्या महिलेचे सर्व कपडे फाडून तिला जवळजवळ विवस्त्रच करून सोडतो. महिला जीवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते परंतु तो मनुष्य वेडा असतोच पण शरीराने आडदांडही असतो. त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न असफल ठरतात. त्यातच अचानक घडलेल्या या भयंकर प्रसंगाने ती हादरून जाते. ती आरडाओरड करते परंतु लोक जमा होईपर्यंत खूप उशीर होतो. लोक जमा होईपर्यंत तो वेडा तिच्या कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या करून टाकतो. नंतर आवाज ऐकून काही लोक तेथे पळत येतात व ते त्या वेड्याला बाजूला नेऊन मारायला सुरुवात करतात. या गडबडीत त्या महिलेला आधार देऊन तिची अब्रू झाकण्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. हळूहळू लहान मोठे, स्त्री पुरूष, आबालवृद्ध साऱ्यांची आजूबाजूला गर्दी वाढू लागते. त्या सर्वांसमोर त्या अवस्थेत थांबताना त्या महिलेच्या आत्मसन्मानाची अक्षरशः अंत्ययात्राच निघते. काही महिलांच्या लक्षात ही बाब येऊन त्या काही वस्रांच्या सहाय्याने तिची लाज झाकतात. परंतु त्याला खूप उशीर झालेला असतो. त्या महिलेचे विवस्त्र दृश्य सर्व गावकऱ्यांच्या नजरेत साठून गेलेले असते, तिचे मानसिक खच्चीकरण झालेले असते, तिच्या आत्मसन्मानाला खूप मोठा धक्का पोहोचलेला असतो. त्या राजकारण्याचा डाव साधला गेलेला असतो.
आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे प्रकरण सहानुभूतीपूर्वक त्या महिलेच्या बाजूने वळू न देता त्याला पूर्णविराम देण्याचा. त्या कार्याला आकार देण्यास आता सुरूवात होते. त्या वेड्याला गावकऱ्यांनी पकडून चोप द्यायला सुरुवात केल्यावर तेथे त्या नेत्याचे व त्याच्या चमच्याचे आगमन होते. व ते त्या वेड्याला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवतात. गावकऱ्यांना शांत करत तो नालायक धनी मनुष्य त्यांची समजूत काढण्याच्या सुरात बोलू लागतो, " अरेरे, झाला प्रकार खूप वाईट झाला. असे घडायला नको होते. परंतु हा मनुष्य तर ठार वेडा आहे. त्याला त्याच्या अंगावर कपडे आहे की नाही याचेही भान नसते. लाज - अब्रू काय असते याची त्याला काहीच कल्पना नाही त्यामुळे हे काही त्याने जाणीवपूर्वक केलेले नसणार. त्याने केलेले कृत्य नक्कीच चुकीचे असले तरी तो ठार वेडा आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे त्याला मारून काहीच उपयोग होणार नाही. त्याला सोडून देणेच उचित ठरेल. "
हळूहळू त्याचे म्हणणे लोकांना पटू लागते. लोकांचा राग कमी होऊ लागतो व अखेर सर्व शांत होते. त्या व्यक्तीने वेड्याकरवी हे कृत्य घडवून एका दगडात अनेक पक्षी मारलेले असतात.
त्याने त्याच्या जातीविषयक घाणेरड्या मानसिकतेचा विजय केलेला असतो, त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मानसिक धैर्याचे खच्चीकरण केलेले असते, स्वतःवर या प्रकरणाचा एकही शिंतोडा उडू न देता हे सर्व त्याने साध्य केलेले असते. व अपराधी हा वेडा असल्याचे कारण देऊन प्रकरण तेथेच मोडीत काढलेले असते. त्यातच त्याच गावातील मनातून जातव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या, इतर कनिष्ठ जातीला तुच्छ समजणार्या परंतु उघडपणे बोलू न शकणार्या काही दुटप्पी लोकांचे या प्रकाराला मूक समर्थनच असते. वरवर समतेचा दिखावा करताना जातीय द्वेषाचे बीज त्यांनी उरी बाळगलेले असते. त्यामुळे आता त्या महिलेच्या खर्या यातना समजून घेणारे, तिला मानसिक धैर्य देऊन खर्या अर्थाने आधार देणारे कोणीच नसते. फारफार तर खोट्या सहानुभूतीचे दोन शब्द बोलण्यापलीकडे तिच्यासाठी कोणी काहीही करणार नसते. कदाचित यापुढे त्या महिलेसोबत घडलेला प्रसंग पाहून इतर कोणी पुन्हा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्याच्या भानगडीत पडणार नसते.
समाजात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात घडणारे हे ज्वलंत वास्तव आहे. अनेक धर्मांध प्रवृत्तीचे लोक, अनेक धूर्त राजकारणी आपला कपटी डाव साधण्याकरिता अनेकदा अशा वेड्यांना पुढे करतात फक्त हे खरे वेडे नसून जातीव्यवस्थेचा पगडा असलेले, राजकारण्यांची - धनदांडग्यांची अंधभक्ती करणारे घाणेरड्या विचारांनी वेडी झालेली मंडळी असतात. आणि अशा व्यक्तींच्या विचित्र वागण्यावर, विचित्र बोलण्यावर काही सुज्ञ लोकांनी आक्षेप घेतल्यास, ' अरे तो वेडा आहे...तुम्हीतर शहाणे आहात ना ? त्याच्याकडे लक्ष देऊ नका ' अशी कावेबाज समजूत ही धूर्त मंडळी समाजातील या सूज्ञ मंडळींची काढतात. व त्यांच्या या शब्दछलामध्ये फसून समाजातील वैचारिक लोकसुद्धा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत राहतात. व अन्यायाची ही मालिका अशीच अविरत सुरू राहते.
समाजात वर्चस्व असणाऱ्या वर्गातील वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या अभ्यासू लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अशा अपप्रवृत्तींवर वेळीच आळा घालून (अजूनही उघडपणे न दिसणार्या) समाजातील सामाजिक असमानतेची झळ सोसणाऱ्या पीडित समाजाचे दुःख समजून घ्यायला हवे. व त्यांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे. असे झाल्यास आपला देश एकसंघ होऊन खर्या अर्थाने जगाला मानवतेचा संदेश देत प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचणे हे दिवास्वप्न न राहता एक सुखद सत्य ठरेल.
धन्यवाद...!!! 🙏🏻
Saturday, March 11, 2023
असेल पत तर मिळेल किंमत
एखादा साधा कागद जर रस्त्यात पडला असेल, तर लोक एकतर त्याला दुर्लक्षित करतात किंवा त्याला लाथाडून, तुडवून पुढे निघून जातात.
परंतु , तोच कागद एखाद्या 100, 200, 500, 2000 च्या नोटेचं स्वरूप प्राप्त झाल्यावर पडलेला दिसला तर त्याला आपलेसे करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागते.
मनुष्याच्या बाबतीतही असेच घडते.......
✒ K. Satish
Tuesday, February 28, 2023
Tuesday, February 14, 2023
कुटुंब
जग हे सारे कुटुंब आमुचे
हितचिंतक किती इथे भेटती,
रक्तांच्या नात्यांहूनी श्रेष्ठ
आपुलकीचे नाते जोडती
✒ K.Satish
Monday, January 9, 2023
आदर
लोक आपल्याला केवळ दोन कारणांसाठी
आदर , मानसन्मान देतात...
एकतर आपल्याकडे पैसा , सत्ता, ताकद असेल तर..
अथवा....
आपल्याकडे इतरांना मनापासून मदत करण्याची प्रवृत्ती असेल तर...
पहिल्या प्रकारचा आदर हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो...
परंतु , दुसर्या प्रकारातील आदर हा कायमस्वरूपीचा आणि चिरकाल टिकून राहणारा असतो...
✒ K. Satish
Saturday, July 23, 2022
एक सामाजिक कटुसत्य
एक गहण सामाजिक प्रश्न..... खरंच मातापित्यांनी मुलांना जन्म देणे हे त्या मुलांवर उपकार असतात का ?, त्यांना या जगात आणून त्यांनी या मुलांवर मोठी मेहेरबानी केलेली असते का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण की, समाजात सर्व स्तरावर मुलांना या गोष्टीची सतत जाणीव करून दिली जाते की, तुझ्या आई वडीलांमुळेच तू हे जग पाहू शकलास आणि ते अजिबात खोटे नाही. निश्चितच त्यांच्या आईवडिलांचे मिलन झालेच नसते तर ही मुले जन्माला खरोखरच आली नसती.
परंतु, मुद्दा हा उरतो की, या मुलांवर उपकार करण्यासाठीच सर्व आई वडीलांनी मुलांना जन्म दिलेला असतो का ?....की, आपल्याला मुलाचे सुख लाभावे, समाजात आपल्याला मूल झाले याचा आनंदोत्सव साजरा करता यावा, ' मूल होत नाही ' अशा समाजातील टोचून बोलणाऱ्या टोमण्यांपासून आपला बचाव व्हावा व सामाजिक स्वास्थ्याच्या हेतूने लग्नबंधनात अडकून आपल्या शारिरीक गरजा भागाव्यात या सर्व गोष्टी त्यामागे नाहीत का ?
माणसाने स्वतःच्या आनंदासाठी मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यावर उपकाराची भाषा करून त्याला या गोष्टीची जाणीव करून देण्याची पद्धत मोडीत निघायला हवी. सर्व सजीवांची उत्पत्ती हे निसर्गचक्र आहे. आपण फक्त निमित्तमात्र असतो. त्यामुळे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांवर फक्त जन्म दिला म्हणून अधिकारवाणीने हक्क गाजवून त्यांना चुकीच्या गोष्टीदेखील करायला भाग पाडणे अथवा त्यांच्यावर अत्याचार करणे हे या निसर्गचक्राचा गैरवापर केल्यासारखेच आहे.
त्यामुळे प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना फक्त जन्म दिला म्हणून अधिकार गाजवणे बंद केले पाहिजे व समाजानेही या विधानाचा ऊहापोह करून मुलांना फक्त ज्ञानाचे डोस पाजून कात्रीत पकडण्याऐवजी या मुलांना जीव लावावा, त्यांना माता पिता या नात्याने तुमचे प्रेम द्यावे, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावेत आणि फक्त जन्म दिला म्हणून नाही तर तुमच्या सुस्वभावाने, चांगल्या वर्तणुकीने, मायेने त्यांची मने जिंकावीत...
संदेश सार्यांना कळवावा,
या नात्याचा सन्मान आपल्या
आचरणातून मिळवावा...
✒ K.Satish
Thursday, June 30, 2022
लोकशाही राष्ट्रातील दुर्दैवी शोकांतिका
या देशात ताजसारख्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये जेवायला जाण्याचे स्वप्न पाहता पाहता कित्येकांची हयात निघून जाते, पण ते या स्वप्नाची पूर्तता करू शकत नाहीत.
परंतु, याच देशातील नेते मंडळींच्या मिटींगावर मिटींगा ताजसारख्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये होणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे.
आणि पैसा त्याच जनताजनार्दनांचा की, ज्यांना स्वतःच्या गरजा भागवता भागवता उभ्या हयातीत अशा हाॅटेलमध्ये एक दिवस कुटुंबासहित जेवायला जाण्याचे स्वप्नदेखील पूर्ण करता येत नाही.
✒ K. Satish
Friday, June 24, 2022
सगळा गोंधळ
हिकडंबी झाला धिंगाणा
आन् तिकडंबी झाला धिंगाणा,
कोण कुणाच्या मागं लागलं
काहीचं आता समजंना,
हातातं देतो हातं कुणी
पाय अचानक वढतो,
गोंधळं गोंधळं गोंधळं
सगळा गोंधळं गोंधळं गोंधळं
गोंधळं गोंधळं गोंधळं
सगळा गोंधळं गोंधळं गोंधळं
✒ K. Satish
Monday, January 10, 2022
क्षणभंगुर आनंद
काही व्यक्तींना सतत दुसर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कपट कारस्थान करण्याची सवय असते. त्याअन्वये इतरांना दुःखी करण्याचा त्यांचा मानस असतो.
परंतु , अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच आनंदाची खरी परीभाषा उमजू शकत नाही. कारण ते स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखातच जास्त आनंदी होत असतात.
आणि अशा आनंदाचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते.
✒ K. SATISH
Friday, October 22, 2021
विचारांची गुणवत्ता
आणि
आपल्या विचारांची गुणवत्ता आपल्या संपर्कातील लोकांवर अवलंबून असते.
म्हणून नेहमी उत्तम विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा व आपल्या विचारांच्या गुणवत्तेची उंची वाढवा...
असे करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनस्वास्थ्याबरोबरच समाजस्वास्थ्यदेखील सुखमय व आनंदी बनवू शकता....
✒ K. Satish
Wednesday, October 6, 2021
Wednesday, September 29, 2021
श्रेष्ठ दान
जो मनुष्य सुदृढ आहे त्याने जसे जमेल तसे रक्तदान अवश्य करावेत.
कोरोनाच्या दुष्टचक्राने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खूप दिवसांनंतर टाटा मोटर्स, कार प्लान्ट, पुणे येथे आज २९ सप्टेंबर २०२१ रोजी रक्तदान करण्याचा योग आला. खूप समाधान वाटले.
Friday, September 24, 2021
लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
आत्ताच्या काळात क्रांतिकारी विचाराच्या व्यक्तीने मानसिक व वैचारिकरित्या मृत पावलेल्या स्वयंकेंद्रित लोकांचे प्रतिनिधित्व करून अन्यायाविरूद्ध लढणे म्हणजे आपल्या क्रांतीकारी विचारांचा, स्वाभिमानी बाण्याचा व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीचा स्वतःच्याच हाताने खून केल्यासारखे आहे.
कारण सध्याच्या काळात लोकांना आपल्या महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या महान कार्याची प्रकर्षाने आठवण येते. अगदी अभिमानाने ते त्यांच्या कार्याचे गोडवे गात असतात. हे महापुरूष, क्रांतिकारक पुन्हा जन्माला यावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते. परंतु या महान व्यक्तींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान पाहता त्यांचा जन्म आपल्या घरात न होता इतरांच्या घरात व्हावा व पुन्हा त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन इतरांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय घरबसल्या मिळवून द्यावेत अशी काहीशी सर्वांची मानसिकता झाली आहे.
त्यामुळेच मी हा प्रश्न मांडत आहे.....लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
खरंच, लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
कारण क्रांतिकारक व महापुरूष पुन्हा पुन्हा जन्माला येणार नाहीत. त्यामुळे स्वतःच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी, न्यायासाठी प्रत्येकामध्ये लढण्याची वृत्ती आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कारण इतर कोणीतरी स्वतःच्या सुखांचा त्याग करून, स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला घरबसल्या आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढा उभारून न्याय मिळवून देण्याची प्रतिक्षा करत राहिलात तर तुम्ही आत्ता अनुभवत असलेली स्वतःची स्वयंकेंद्रित आरामदायी जीवनशैली संपुष्टात येऊन तुम्ही कधी पूर्णपणे गुलामगिरीत ढकलले जाताल हे तुम्हाला पूर्णपणे गुलाम होईपर्यंत कळणारदेखील नाही.
नीट विचार करा.....
Tuesday, August 17, 2021
मन निर्मळ तू कर स्वतःचे
' जीवन '... प्रत्येकाला जीवनात अंधारमय क्षणांना तोंड द्यावे लागते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अशा क्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज करावे लागते. या अंधारमय क्षणांवर मात करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याकरिता सतत प्रयत्नांचे प्रकाशमय दिवे तेवत ठेवण्याची आवश्यकता असते.
परंतु , बहुतांशी लोक हे दुसर्याच्या जीवनातील अंधार पाहून खुश होत असतात. किंबहुना हा अंधार अजून गडद कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. पण दुसर्याच्या जीवनातील अंधाराचा आनंद घेण्याच्या आणि तो अजून काळाकुट्ट करण्याच्या नादात असे लोक आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी लागणारे पुरेसे प्रयत्न करण्यास विसरूनच जातात. व दुसर्याचे आयुष्य अंधारमय बनवण्याच्या नादात स्वतःच कधी अंधाराच्या गर्द छायेत स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला ढकलून देण्यास कारणीभूत ठरतात हे त्यांना कळतच नाही.
अंधार दुसर्याच्या जीवनातला
पाहूनी होतो आनंद का ?,
कपट मनामध्ये ठेवून असा रे
आयुष्यामध्ये जगतो का ?
वृत्ती नाही चांगली ही तर
घातक ठरेल तुलाच रे,
मन तू निर्मळ कर स्वतःचे
दिशा नवी जीवनाला दे
✒ K. Satish
Monday, July 26, 2021
समतोल निसर्गाचा
पृथ्वी गोल आहे.
अंतराळात तिचे खूप मोल आहे.
तिच्यात निसर्गाचा महत्त्वपूर्ण रोल आहे.
पण माणसाच्या चुकीने निसर्गाचा बिघडतोय समतोल आहे.
✒ K. Satish
Saturday, June 26, 2021
सामर्थ्य युवा पिढीचे
नमस्कार,
आजकाल शिक्षणाची स्पर्धा इतकी वाढली आहे, की सध्याची पिढी ही अभ्यास एके अभ्यास व मार्कांची शर्यत यांच्यातच गुरफटून गेली आहे. आणि अतिमहत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन पालकच नकळत मुलांना या शर्यतीत ढकलत असतात.
आणि मग बहुतांशी मुलांना सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाची जपणूक करायचे फक्त धडेच दिले जातात. परंतु प्राधान्याने या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पाडून त्यांच्या कृतीत उतरवायला पालक कमी पडतात.
भविष्यात ही गोष्ट मानवी जीवनासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. कारण युवा पिढीमधील धडाडी आणि कोणतेही काम तडीस न्यावयाचा जोश इतर सर्व पिढ्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे युवा पिढीस योग्य मार्गदर्शन करून योग्य समाजोपयोगी कृती त्यांच्याकडून घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे.
श्रीयश आणि त्याचा मित्रपरिवार यांचे हे दहावीचे वर्ष, आणि तेही ICSE बोर्डाचे. तरीही तो व त्याचा मित्रपरिवार नित्याने दररोज पुण्यातील विविध भागात सायकलिंग करीत असतात. कधी सिंहगड, तर कधी हनुमान टेकडी, कधी पर्वती तर कधी बाणेर हिल्स.
अशाच गप्पा मारता मारता पावसाळा नजीक आल्यामुळे टेकडीवर वृक्षारोपण करण्याच्या विषयावर शिक्कामोर्तब झाले. मग या सर्व मित्रमंडळींनी पुण्यात सायकलवर जाऊन विविध प्रकारची अकरा रोपे वृक्षारोपणासाठी आणली. ( ताम्हण, करंज, टेंभुर्णी, धावडा, कांचन, करमळ, रोहितक, मुचकुंद, जांभुळ, चिंच ).
रोपे आणायला गेलेले हे चौघेच...श्रीयश, अनुज, प्रतिक आणि रोहित. आणि वृक्षारोपण करतेवेळी देखील रोहितला वैयक्तिक कारणास्तव जाणे शक्य न झाल्यामुळे वृक्षारोपण करायची जबाबदारी उरलेल्या तिघांवर येऊन ठेपली. तरीही नियोजित वेळापत्रकानुसार आज श्रीयश, अनुज व प्रतीक यांनी वृक्षारोपणाची जबाबदारी पार पाडली. इतरही पर्यावरणप्रेमी तिथे वृक्षारोपण करून जात असताना त्यांची या तिघांशी गाठ पडली व त्यांनीही यांचे कौतुक करून यांना प्रोत्साहन देऊन यांचा उत्साह वाढवला.
सध्या आपला अभ्यास सांभाळून अशा स्तुत्य समाजोपयोगी कामांमध्ये योगदान देण्याचे महत्वपूर्ण पाऊल या चौघांनी टाकले असले तरी भविष्यात त्यांचा इतर मित्रपरिवारदेखील अशा कामांमध्ये त्यांना जोडला जाईल. अर्थातच त्यात सर्वात मोठी जबाबदारी पालकांची आहे. पालकांनी सतत शालेय अभ्यासाचा रेटा मुलांच्या मागे न लावता मुलांना इतर समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमांमध्ये आपले योगदान देण्यासाठी प्रेरित करायला हवे.
निसर्गाची आणि देशाची विस्कळीत झालेली घडी सुरळीत करण्याचे सामर्थ्य जर कोणात असेल तर ती म्हणजे आपली युवा पिढी.
चला तर मग या युवा पिढीला योग्य मार्ग दाखवून त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि नव्या उमेदीचा उपयोग करून आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदी बनवूया...
धन्यवाद.....!!! 🙏🏻
✒ K. Satish
Friday, June 25, 2021
ज्ञानरूपी तेल आणि बुद्धीचा दिवा
बुद्धीच्या दिव्यामध्ये ज्ञानाचे तेल ओतून त्याची वात अशी पेटवा की, हा दिवा निरंतर जळत राहून तुमचे जीवन अद्वितीय प्रकाशाने उजळून टाकील.
आणि या प्रकाशामुळे समाजातील इतरही वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात काही प्रकाशाची किरणे पडून त्यांच्या आयुष्याची लय सुधारण्यास मदत मिळेल.
✒ K. Satish
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अडचणींचा तो विशाल डोंगर अदम्य जिद्दीने करूनी पार, शिक्षित करूनी स्त्री जातीला केला अज्ञानावरी वार स्त्री शिक्...
-
वेळेला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. वेळ चांगलीही नसते आणि वाईटही नसते, वेळ ही वेळ असते. माणसाच्या मनाप्रमाणे घडल्यास वेळेला चांगलं म्ह...
-
आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून ...
-
ना थांबे ही वेळ कधीही कटू समयही जाईल टळूनी, झुंजावे संकटाशी हिमतीने योग यशाचा येईल जुळूनी ✒ K. Satish
-
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी को...
कर्तृत्व
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...