Showing posts with label दुर्दैवी ( sad ). Show all posts
Showing posts with label दुर्दैवी ( sad ). Show all posts

Wednesday, July 5, 2023

लोकशाही नक्की कुणाची ?

लोकशाहीमध्ये लोकांना

किंमत उरली नाही कवडीची,

आपली सुंदर लोकशाही आता

उरली आहे फक्त नेत्यांची

✒ K. Satish




Friday, May 5, 2023

छुपे षडयंत्र

   एका गावात एक दबंग व्यक्ती रहात असतो. त्याच्याकडे पैसा, संपत्ती अफाट असल्याने आणि त्याचे स्थानिक राजकारणात वजन असल्याने त्याचा त्या गावात बराच दबदबा असतो. कोणीही त्याच्याविरुद्ध एक शब्दही काढत नसतो. हा व्यक्ती राजकारणात सक्रिय असल्याने त्याला सर्व स्तरातील लोकांशी जुळवून घ्यावे लागत असे. परंतु त्याच्या मनात मात्र जातीव्यवस्थेचे, वर्णव्यवस्थेचे विष काठोकाठ भरलेले असते.
   त्यातच गावातील एक दलित स्त्री उच्चशिक्षण घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि गावाच्या विकासासाठी लढत असते. एका कनिष्ठ जातीतील महिला असूनही तिची वाढत चाललेली लोकप्रियता ही त्या प्रतिष्ठित राजकारण्याला खटकू लागते. तो दिवसरात्र त्या महिलेला कसे नामोहरम करता येईल व तिचे कसे मानसिक खच्चीकरण करता येईल याचाच विचार करत असतो. परंतु असे करताना त्याला स्वतःला तर या प्रकरणापासून दूर ठेवायचे असतेच, पण त्या महिलेला त्रास झाल्यास तिला सहानुभूती मिळून हे प्रकरण चिघळू नये व जागीच शांत व्हावे असे काहीतरी करण्याची त्याची इच्छा असते.
   विचार करता करता त्याला एक धूर्त कल्पना सुचते व तो त्याच्या अंमलबजावणीच्या तयारीला लागतो.
    त्या गावात एक ठार वेडा मनुष्य रहात असतो. त्याला गोंजारून, आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. १५ - २० दिवसांच्या प्रयत्नानंतर तो वेडा पूर्णपणे त्याच्या अधिपत्याखाली येतो. तो धनाढ्य व्यक्ती जे सांगेल ते करणे येवढेच तो करू लागतो.
    एके दिवशी ठरलेल्या कारस्थानानुसार तो त्या महिलेविषयी काही गोष्टी त्या वेड्याच्या मनात पेरतो व त्या वेड्याकरवी त्या महिलेचा विनयभंग करण्याचे षडयंत्र रचतो.
     ठरल्याप्रमाणे ती महिला गावातून जात असताना ज्यावेळी लोकांची जास्त वर्दळ नसेल हे हेरून त्या वेड्याला त्या महिलेच्या आसपास पोहोचविले जाते. अर्थात या सर्व कामात त्या राजकारण्याचे इतर कार्यकर्तेदेखील मदत करत असतात व सर्व परिस्थितीवर नजर ठेवून असतात. त्या वेड्याला अशाप्रकारे तयार केलेले असते की, ती महिला समोर दिसताच क्षणार्धात तो तिच्यावर झडप घालतो. त्या महिलेला काहीच सुचत नाही. आजूबाजूला काही लहान मुले खेळत असतात. बाकी मोठी माणसे क्षणार्धात पोहोचू शकतील अशा टप्प्यात नसतात. तो राजकारणी व त्याचे चमचे मात्र लपून सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात. आणि त्या वेड्याने केलेला हल्ला इतका जबरदस्त असतो की, काही सुचायला उसंतच मिळत नाही. तो मिनिटाच्या आत त्या महिलेचे सर्व कपडे फाडून तिला जवळजवळ विवस्त्रच करून सोडतो. महिला जीवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते परंतु तो मनुष्य वेडा असतोच पण शरीराने आडदांडही असतो. त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न असफल ठरतात. त्यातच अचानक घडलेल्या या भयंकर प्रसंगाने ती हादरून जाते. ती आरडाओरड करते परंतु लोक जमा होईपर्यंत खूप उशीर होतो. लोक जमा होईपर्यंत तो वेडा तिच्या कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या करून टाकतो. नंतर आवाज ऐकून काही लोक तेथे पळत येतात व ते त्या वेड्याला बाजूला नेऊन मारायला सुरुवात करतात. या गडबडीत त्या महिलेला आधार देऊन तिची अब्रू झाकण्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. हळूहळू लहान मोठे, स्त्री पुरूष, आबालवृद्ध साऱ्यांची आजूबाजूला गर्दी वाढू लागते. त्या सर्वांसमोर त्या अवस्थेत थांबताना त्या महिलेच्या आत्मसन्मानाची अक्षरशः अंत्ययात्राच निघते. काही महिलांच्या लक्षात ही बाब येऊन त्या काही वस्रांच्या सहाय्याने तिची लाज झाकतात. परंतु त्याला खूप उशीर झालेला असतो. त्या महिलेचे विवस्त्र दृश्य सर्व गावकऱ्यांच्या नजरेत साठून गेलेले असते, तिचे मानसिक खच्चीकरण झालेले असते, तिच्या आत्मसन्मानाला खूप मोठा धक्का पोहोचलेला असतो. त्या राजकारण्याचा डाव साधला गेलेला असतो.
   आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे प्रकरण सहानुभूतीपूर्वक त्या महिलेच्या बाजूने वळू न देता त्याला पूर्णविराम देण्याचा. त्या कार्याला आकार देण्यास आता सुरूवात होते. त्या वेड्याला गावकऱ्यांनी पकडून चोप द्यायला सुरुवात केल्यावर तेथे त्या नेत्याचे व त्याच्या चमच्याचे आगमन होते. व ते त्या वेड्याला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवतात. गावकऱ्यांना शांत करत तो नालायक धनी मनुष्य त्यांची समजूत काढण्याच्या सुरात बोलू लागतो, " अरेरे, झाला प्रकार खूप वाईट झाला. असे घडायला नको होते. परंतु हा मनुष्य तर ठार वेडा आहे. त्याला त्याच्या अंगावर कपडे आहे की नाही याचेही भान नसते. लाज - अब्रू काय असते याची त्याला काहीच कल्पना नाही त्यामुळे हे काही त्याने जाणीवपूर्वक केलेले नसणार. त्याने केलेले कृत्य नक्कीच चुकीचे असले तरी तो ठार वेडा आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे त्याला मारून काहीच उपयोग होणार नाही. त्याला सोडून देणेच उचित ठरेल. "
   हळूहळू त्याचे म्हणणे लोकांना पटू लागते. लोकांचा राग कमी होऊ लागतो व अखेर सर्व शांत होते. त्या व्यक्तीने वेड्याकरवी हे कृत्य घडवून एका दगडात अनेक पक्षी मारलेले असतात.
   त्याने त्याच्या जातीविषयक घाणेरड्या मानसिकतेचा विजय केलेला असतो, त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मानसिक धैर्याचे खच्चीकरण केलेले असते, स्वतःवर या प्रकरणाचा एकही शिंतोडा उडू न देता हे सर्व त्याने साध्य केलेले असते. व अपराधी हा वेडा असल्याचे कारण देऊन प्रकरण तेथेच मोडीत काढलेले असते. त्यातच त्याच गावातील मनातून जातव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या, इतर कनिष्ठ जातीला तुच्छ समजणार्‍या परंतु उघडपणे बोलू न शकणार्‍या काही दुटप्पी लोकांचे या प्रकाराला मूक समर्थनच असते. वरवर समतेचा दिखावा करताना जातीय द्वेषाचे बीज त्यांनी उरी बाळगलेले असते. त्यामुळे आता त्या महिलेच्या खर्‍या यातना समजून घेणारे, तिला मानसिक धैर्य देऊन खर्‍या अर्थाने आधार देणारे कोणीच नसते. फारफार तर खोट्या सहानुभूतीचे दोन शब्द बोलण्यापलीकडे तिच्यासाठी कोणी काहीही करणार नसते. कदाचित यापुढे त्या महिलेसोबत घडलेला प्रसंग पाहून इतर कोणी पुन्हा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्याच्या भानगडीत पडणार नसते.
    समाजात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात घडणारे हे ज्वलंत वास्तव आहे. अनेक धर्मांध प्रवृत्तीचे लोक, अनेक धूर्त राजकारणी आपला कपटी डाव साधण्याकरिता अनेकदा अशा वेड्यांना पुढे करतात फक्त हे खरे वेडे नसून जातीव्यवस्थेचा पगडा असलेले, राजकारण्यांची - धनदांडग्यांची अंधभक्ती करणारे घाणेरड्या विचारांनी वेडी झालेली मंडळी असतात. आणि अशा व्यक्तींच्या विचित्र वागण्यावर, विचित्र बोलण्यावर काही सुज्ञ लोकांनी आक्षेप घेतल्यास, ' अरे तो वेडा आहे...तुम्हीतर शहाणे आहात ना ? त्याच्याकडे लक्ष देऊ नका ' अशी कावेबाज समजूत ही धूर्त मंडळी समाजातील या सूज्ञ मंडळींची काढतात. व त्यांच्या या शब्दछलामध्ये फसून समाजातील वैचारिक लोकसुद्धा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत राहतात. व अन्यायाची ही मालिका अशीच अविरत सुरू राहते.
    समाजात वर्चस्व असणाऱ्या वर्गातील वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या अभ्यासू लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अशा अपप्रवृत्तींवर वेळीच आळा घालून (अजूनही उघडपणे न दिसणार्‍या) समाजातील सामाजिक असमानतेची झळ सोसणाऱ्या पीडित समाजाचे दुःख समजून घ्यायला हवे. व त्यांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे. असे झाल्यास आपला देश एकसंघ होऊन खर्‍या अर्थाने जगाला मानवतेचा संदेश देत प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचणे हे दिवास्वप्न न राहता एक सुखद सत्य ठरेल.
   धन्यवाद...!!! 🙏🏻
✒ K. Satish






    

Thursday, May 4, 2023

घोटाळे

घोटाळ्यावर घोटाळे

कोटींचे घोटाळे,

मतलबी नेत्यांनी

केले देशाचे वाटोळे

✒ K. Satish




Saturday, February 25, 2023

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली

पैशाच्या पावसात जनता न्हावू लागली,

घरोघरी जाऊन पैसे हाती देऊन

लोकशाहीची विटंबना होऊ लागली


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

 खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

✒ K. Satish

 

Monday, October 10, 2022

स्वअधःपतन

दुसर्‍याची पाहूनी अधोगती

सुखावतो जो मनोमनी,

स्वतःच्याच अधोगतीची तो

सुरूवात करतो त्याचक्षणी

✒ K.Satish





Sunday, July 24, 2022

अंदरूनी दुश्मन

दुश्मनो मे इतना दम नही

के हमे बदनाम कर दे ।

हमारा सुख चैन छिन के

हमे परेशान कर दे ।

पर कमबख्त

अपनों ने दो पल में ही वो कसर पूरी कर दी।

✒ K. Satish




Thursday, June 30, 2022

लोकशाही राष्ट्रातील दुर्दैवी शोकांतिका

   या देशात ताजसारख्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये जेवायला जाण्याचे स्वप्न पाहता पाहता कित्येकांची हयात निघून जाते, पण ते या स्वप्नाची पूर्तता करू शकत नाहीत.

   परंतु, याच देशातील नेते मंडळींच्या मिटींगावर मिटींगा ताजसारख्या पंचतारांकित हाॅटेलमध्ये होणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे.

   आणि पैसा त्याच जनताजनार्दनांचा की, ज्यांना स्वतःच्या गरजा भागवता भागवता उभ्या हयातीत अशा हाॅटेलमध्ये एक दिवस कुटुंबासहित जेवायला जाण्याचे स्वप्नदेखील पूर्ण करता येत नाही.

✒ K. Satish





Tuesday, May 3, 2022

आचरण महत्त्वाचे

      समाजात काही नाती ही अतिशय आदरणीय असतात. परंतु त्याला अपवाद असणाऱ्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणेही याच समाजात आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळेच तर जन्मदात्या पित्याकडूनच स्वतःच्या मुलीवरच अत्याचार करण्याच्या घटना असो, स्वतःच्या स्वार्थापोटी व व्यभिचारापोटी स्वतःच्याच मुलांची हत्या करणारी माता असो वा आर्थिक लोभ किंवा वासनेपोटी आपल्या शिष्यांचे शोषण करणारे गुरूजन असो ...अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसे या महान नात्यांच्या आडून आपल्या वाईट मनसुब्यांना पूर्णत्वास नेत असतात.

     समाजात नेहमी माता, पिता, गुरूतुल्य व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती यांना नात्याच्या आधारे अथवा समाजातील आदरणीय स्थानाच्या आधारे झुकते माप दिले जाते. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा अशी नात्यांच्या आड दडलेली काही अपप्रवृत्तींची मंडळी घेतात व आपल्या दुष्कृत्यांना अंमलात आणून अनेक निष्पापांचे आयुष्य उध्वस्त करून टाकतात. आणि त्यामुळेच अनेकदा नकळतपणे समाजाची भूमिकादेखील अशा चुकीच्या गोष्टी घडण्याला बळ देणारी ठरते.

     अतिशय खालच्या पातळीवर घसरून नात्यांना काळिमा फासणाऱ्या व्यक्तींना केवळ नात्यांचा मान राखण्याची पारंपारिक औपचारिकता पूर्ण करण्याहेतूने मान देण्याचा अट्टाहास करण्याची समाजातील मानसिकता ही मानवता व माणुसकीचा गळा दाबून हत्या करण्यासमान आहे.अशामुळेच अनेक अपप्रवृत्तींच्या व्यक्ती केवळ नात्याचा आधार घेऊन व समाजाची सहानुभूती मिळवून इतर निष्पापांच्या आयुष्याशी खेळण्यात यशस्वी होतात.

     म्हणूनच म्हणतो की,

प्रवृत्ती ही दुष्टच ज्याची
त्याला नाते कळेल कसे,
ढोंगी, कपटी या लोकांना
मानवतेचे भान नसे

वय अन् नाते दुय्यम ठरती
षडयंत्री मन ज्याच्या ठायी,
स्वार्थ, वासना, व्यभिचार हे
त्याच्या नसानसांमध्ये वाही

याच समाजामध्ये दिसतो 
बलात्कारी पिता,
आणि कुकर्मापायी मुलांचा
बळी घेणारी माता

माता, पिता, गुरू बनणे सोपे
संदेश सार्‍यांना कळवावा,
या नात्याचा सन्मान आपल्या
आचरणातून मिळवावा...

✒ K. Satish





Monday, January 10, 2022

क्षणभंगुर आनंद

काही व्यक्तींना सतत दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कपट कारस्थान करण्याची सवय असते. त्याअन्वये इतरांना दुःखी करण्याचा त्यांचा मानस असतो.

परंतु , अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच आनंदाची खरी परीभाषा उमजू शकत नाही. कारण ते स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखातच जास्त आनंदी होत असतात.

आणि अशा आनंदाचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते.

✒ K. SATISH





Wednesday, January 5, 2022

निस्वार्थ जनसेवेचे मूर्तिमंत उदाहरण...'अनाथांची माय'

अनाथांची माय
थोर समाजसेविका, पद्मश्री
वंदनीय सिंधुताई सपकाळ यांना
सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

'स्वतःसाठी सगळेच जगतात पण जीवनातील खरा आनंद आणि त्याचा खरा मतितार्थ लपला आहे इतरांसाठी झिजण्यात'
जीवनाच्या या सत्वचनाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या, सर्वांना वंदनीय व 'अनाथांची माय' अशी सर्व जनमानसांत ओळख असलेल्या.....खऱ्या अर्थाने सर्व विश्वाच्या माय असलेल्या थोर समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!!

काळाचे सोसले घाव
तरी हिम्मत ना हारली जिने,
झळा सोसूनी दुःखाच्या
इतरांना तारले तिने

जीवन वाहिले इतरांसाठी
लाखो वासरांची झाली गाय, 
अनंतात ती विलीन जाहली
अनाथांची हो माय

✒ K. Satish





Friday, September 24, 2021

लढा कुणाच्या हक्कांसाठी ?

   आत्ताच्या काळात क्रांतिकारी विचाराच्या व्यक्तीने मानसिक व वैचारिकरित्या मृत पावलेल्या स्वयंकेंद्रित लोकांचे प्रतिनिधित्व करून अन्यायाविरूद्ध लढणे म्हणजे आपल्या क्रांतीकारी विचारांचा, स्वाभिमानी बाण्याचा व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीचा स्वतःच्याच हाताने खून केल्यासारखे आहे.

   कारण सध्याच्या काळात लोकांना आपल्या महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या महान कार्याची प्रकर्षाने आठवण येते. अगदी अभिमानाने ते त्यांच्या कार्याचे गोडवे गात असतात. हे महापुरूष, क्रांतिकारक पुन्हा जन्माला यावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते. परंतु या महान व्यक्तींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान पाहता त्यांचा जन्म आपल्या घरात न होता इतरांच्या घरात व्हावा व पुन्हा त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन इतरांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय घरबसल्या मिळवून द्यावेत अशी काहीशी सर्वांची मानसिकता झाली आहे.

   त्यामुळेच मी हा प्रश्न मांडत आहे.....लढा कुणाच्या हक्कांसाठी ?

   मानसिक व वैचारिकरित्या पूर्णपणे मृतावस्थेत जाऊन आपल्यामध्ये असलेल्या थोड्या का होईना स्वाभिमानी वृत्तीला पूर्णपणे तिलांजली देण्याअगोदर माझ्या या प्रश्नाचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा.

    खरंच, लढा कुणाच्या हक्कांसाठी ?

कारण क्रांतिकारक व महापुरूष पुन्हा पुन्हा जन्माला येणार नाहीत. त्यामुळे स्वतःच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी, न्यायासाठी प्रत्येकामध्ये लढण्याची वृत्ती आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कारण इतर कोणीतरी स्वतःच्या सुखांचा त्याग करून, स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला घरबसल्या आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढा उभारून न्याय मिळवून देण्याची प्रतिक्षा करत राहिलात तर तुम्ही आत्ता अनुभवत असलेली स्वतःची स्वयंकेंद्रित आरामदायी जीवनशैली संपुष्टात येऊन तुम्ही कधी पूर्णपणे गुलामगिरीत ढकलले जाताल हे तुम्हाला पूर्णपणे गुलाम होईपर्यंत कळणारदेखील नाही.

        नीट विचार करा.....
✒ K. Satish










Monday, July 26, 2021

समतोल निसर्गाचा

पृथ्वी गोल आहे.

अंतराळात तिचे खूप मोल आहे.

तिच्यात निसर्गाचा महत्त्वपूर्ण रोल आहे.

पण माणसाच्या चुकीने निसर्गाचा बिघडतोय समतोल आहे.

✒ K. Satish



Tuesday, June 22, 2021

कर्तव्याची जाणीव ठेवा

 नमस्कार,
    आज एक संवेदनशील, सामाजिक पण दुर्दैवी विषय आपणा सर्वांसमोर मांडत आहे.
     आज कायद्याचे संरक्षण असल्याने सामान्य जनता सुखाने श्वास घेऊन जगण्याचे वेडे स्वप्न बाळगून आहे. खरेतर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत बर्‍याच लोकांना कळतंच नाही की, हा सामान्य जनतेसाठी असलेला कायदा व कायद्याने जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले पोलिस बांधव यांना धनदांडग्यांनी पैसा, सत्ता आणि ताकदीच्या जोरावर सामान्य जनतेच्या विरूद्ध त्यांची पिळवणूक करणारे हत्यार बनवले आहे.
     दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजातील विविध समस्या हाताळताना ज्या ज्या वेळी पोलीस खात्यातील लोकांशी संबंध आला त्या त्या वेळी पोलिसांची भूमिका ही फसवणूक अथवा छळवणूक करणार्‍या पैसेवाल्यांच्या बाजूनेच दिसली व सामान्य परंतु पैशाची लाच देऊ न शकणार्‍या अथवा लाच देण्याच्या विरूद्ध असणाऱ्या सरळमार्गी माणसांना पोलिस दमदाटी करताना दिसले. अनेकदा तर आत टाकण्याची भिती दाखवून त्यांना तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जाते. आयुष्यात फक्त दोनदाच प्रामाणिकपणाने पोलिसांनी सामान्य व्यक्तीस सहकार्य करतानाचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ते ही खात्यातील लोकांपासून दूर राहून.
     माझेही अनेक मित्र पोलिस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. पण पोलिस खात्याचे जे सामान्य लोकांसाठी असलेले संरक्षक कवच आहे ते इतके पोखरलेले आहे की, आज एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य नीट बजावले नाही तर त्याची तक्रार घेऊन वरिष्ठांकडे गेल्यास तिथे त्याहूनही जबर धक्का बसण्याची शक्यता असते कारण ही वाळवी वरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे माझ्या मित्रमंडळींनादेखील या समस्यांसाठी मदत मागायचे धाडस होत नाही. कारण तेदेखील याच सिस्टीमचा एक भाग आहेत.
    आज मीदेखील एकेकाळी सैन्यभरतीसाठी पात्र ठरलेला युवक होतो. शेवटच्या क्षणी काही घरगुती कारणांस्तव मला तो निर्णय बदलून औद्योगिक क्षेत्रात यावे लागले. कालांतराने मला ओळखणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी मला MPSC करून पोलिस खाते जाॅईन करण्याचा सल्ला दिला. तुमच्या सारख्या लोकांची पोलिस खात्याला गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते. परंतु माझे ग्रॅज्युएशन पूर्ण नसून वयदेखील पुढे निघून गेल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
    देशाच्या विकासासाठी, सामान्य लोकांच्या हक्कांसाठी तळमळ असलेला मी, पोलिस खाते जाॅईन करू शकलो नाही हे माझे भाग्यच समजतो. कारण पोलिसांचा जो भयानक चेहरा दिवसेंदिवस समोर येतोय तो पाहता माझी या खात्यात खूप घुसमट झाली असती आणि प्रामाणिकपणे कर्तव्य न बजावता येण्याचा मानसिक ताण वाढून मी कदाचित संपून गेलो असतो.
     आज पोलिस सामान्यांना धमकावून पैसेवाल्यांचे आदेश मानत असतील, तर त्यांनी एक विचार करावा की जर सीमेवर आमच्यासोबत तुमचेही रक्षण करणारे सैन्याचे जवान यांच्या हातात आपल्या स्वातंत्र्याची व जिवाची दोरी आहे. जर दुश्मन राष्ट्रांनी त्यांना सात पिढ्या बसून खातील इतका पैसा दिला आणि तुम्हा आम्हासारख्या सर्वांवरच अन्याय करायला सांगितला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल ? जर तुम्ही त्यांच्याकडून देशभक्तीची आणि प्राण पणाला लावून देशातील सर्व जनतेचे संरक्षण करण्याची अपेक्षा बाळगता तर मग तुम्हाला वैयक्तिक स्वार्थ सोडून धनदांडग्यांपासून न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य जनतेच्या बाजूने थांबण्यास काय हरकत आहे. पैसेवाल्या मस्तवाल लोकांना योग्य न्यायिक निर्णय घेण्यास भाग पाडण्यात तुमचे योगदान असूद्यात की.
    प्रत्येक पोलिस हा अंगावरची वर्दी काढून ठेवल्यावर आमच्यासारखा सामान्य माणूसच असतो, त्यालाही आमच्यासारख्या प्रापंचिक अडचणी असतात. त्यावेळी माणुसकीच्या नात्याने आमच्यासारखी सामान्य जनताच तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यात धडाडीने पुढे असते. मग वर्दी अंगावर आल्यावरच तुम्ही सामान्य जनतेला विसरून धनिकांच्या म्हणण्यानुसार वागायला का सुरूवात करता ?
    आज सामान्य जनता कायदा व पोलिसांच्या वर्दीचा मान राखते म्हणून पोलिसांचा प्रतिकार करत नाही म्हणून पोलिसांनी वर्दीच्या आडून सामान्यांचा छळ करणे कितपत योग्य आहे ?
     आज धनाढ्य शाळा प्रशासन पोलिसांचा धाक दाखवून त्याआडून पालकांना गुलामाची वागणूक देत असेल तर त्यातील पन्नास टक्के पापाचे भागीदार हे पोलिस प्रशासन आहे.
    एकूण परिस्थिती पाहता देशाची वाटचाल अधोगतीकडेच जाण्याची चिन्हे आहेत.
    खरंच देशभक्तीने प्रेरित होऊन पोलिस खाते जाॅईन केले असेल तर तुम्हाला आमचा सलाम... पण ती देशभक्ती तुमच्या कृतीतून दाखवून द्या. पैसा आज आहे आणि उद्या नाही. पैसेवाले पैशाच्या जोरावर तुम्हाला वापरून घेतील व विसरूनही जातील. ज्यावेळी तुम्ही पैशावर विकले जाता त्यावेळी त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. परंतु, सामान्य जनतेचा तळतळाट संपूर्ण कमावलेल्या पैशाला क्षणात मातीमोल करू शकतो.
    पोलिस मित्रांनो आणि बांधवांनो,
  ज्यावेळी कोरोनाच्या काळात तुम्ही तुमची ड्युटी बजावत होतात, त्यावेळी हीच सामान्य जनता तुम्हाला सलाम करत होती.
  ज्यावेळी गणेशोत्सव अथवा इतर सणांच्यावेळी तुम्ही रात्रंदिवस सेवा देता तेव्हा हीच सामान्य जनता तुमचा आदर करते आणि तुमचा ताण कमी करण्याहेतूने पोलिस मित्र व स्वयंसेवकांच्या रूपाने हिरीरीने सहभागी होते. आणि अशा अनेक प्रसंगी तुमच्या कार्याला सलाम करते.
  परंतु, याच सामान्य जनतेला ज्यावेळी त्यांच्या न्यायिक हक्कांसाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता असते त्यावेळी मात्र तुम्ही त्यांना कायद्याचा धाकदपटशा दाखवता. व त्यांना 
त्यांच्या न्यायिक हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ आणता. ही तुमची कृती मनाला अतिशय वेदना देऊन जाते.
     आज पोलिस खात्यावर जो 10 टक्के विश्वास उरला होता तो ही मातीमोल झाला. पोलिसांनी आपणही या लोकशाही राष्ट्रातील एक सामान्य नागरिक आहोत याची जाणीव ठेवून सत्याच्या बाजूने उभे राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे ही सर्व पोलिस प्रशासनाला नम्र विनंती......🙏🏻
✒ K. Satish






Wednesday, May 12, 2021

प्रेक्षागृह

पूर्वी माणसांची मनेही मोठी होती

आणि तशीच मोठी प्रेक्षागृहेही होती.

हळूहळू संकुचित झालेल्या मनांप्रमाणेच

प्रेक्षागृहेदेखील छोटी होत गेली.

✒ K. Satish



Tuesday, May 11, 2021

विश्वासघाताचा खंजीर

आपल्या विरोधी शत्रूपासून सावध असूनही

आपल्याला दगाफटका होतोच....

कारण आपला घात करणारा

विश्वासघाताचा खंजीर

आपल्या विरोधकाकडे नसून

आपल्याच एखाद्या निकटवर्तीयाकडे असतो.

✒ K. Satish



Sunday, April 11, 2021

थांबवा रे...

      कोरोना खोटा आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. कारण त्याचा त्रास मी स्वतः अनुभवला आहे. परंतु , त्याच्या नावाखाली अनेकजण आपली पोळी भाजण्याचा जो काही घाणेरडा प्रकार करीत आहेत त्याचा निषेध करावा तितका कमी.

     पण मरणाऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांकडून चांगल्याची अपेक्षा कशी करता येईल ?

     मूठभर राजकारण्यांच्या हाती देश चालवायला दिलेल्या सामान्य नागरिकांना मात्र या राजकारण्यांच्या राजकीय कुरघोड्यांचे शिकार होऊन या देशाचे खरे वारसदार असतानाही गुलामगिरीचे आयुष्य जगावे लागते.

     याहून मोठी धक्कादायक व दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असेल ? ? ?

✒ K. Satish



Saturday, March 27, 2021

अन्न

पक्वान्नांची रास कुणापुढे

कुणास एकही घास मिळेना,

विरोधाभास हा या जगतातील

संपणार कधी मज हे कळेना

K. Satish





Thursday, March 25, 2021

कपटवृत्तीची वीण सुटावी

     कोरोनाच्या संकटाने भल्याभल्यांच्या अहंकारी आणि कपटी वृत्तीला धूळ चारली आहे. परंतु अजूनही असे बरेच महाभाग शिल्लक आहेत की जे आपल्या या दोषाला घट्ट पकडूनच पुढील आयुष्य जगण्याच्या मानसिकतेत आहेत.

     अशा भ्रमित लोकांना भविष्यातील त्यांच्या आयुष्यात कोरोनापेक्षाही जास्त धोका त्यांच्या या अपप्रवृत्तीपासून असेल.

     कारण दुसर्‍याचे सुख पाहिल्यावर यांच्या मनाला अतोनात यातना होतात आणि त्यामुळे दुसर्‍याच्या आयुष्यात दुःखाचा शिडकाव करण्यासाठी कटकारस्थान करण्याच्या नादात हे लोक आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ आणि आनंदी क्षणांचा उपभोग घेण्यास पुरते विसरून जातात. मात्र त्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही समोरील व्यक्तीच्या वाट्याला दुःख न आल्यास अशा व्यक्ती सैरभैर होऊन आपले पुढील आयुष्य नकळतपणे दुःखाच्या खाईत लोटण्यास स्वतःच जबाबदार ठरतात.


' काळाच्या आघाताने तरी

कपटवृत्तीला त्यागावे,

ज्याला नाही जमले त्याने

परिणाम त्याचे मग भोगावे '

K. Satish



Wednesday, March 3, 2021

वन्यजीवन

नावाखाली प्रगतीच्या कुणी

जंगलतोड ती करू नये,

पशुपक्ष्यांचा हक्क वनावरी

घर त्यांचे ते मोडू नये

✒ K. Satish



Sunday, January 10, 2021

अरे स्वार्थी माणसा

गाडी हवीय पण प्रदूषण नको

फळे हवीत पण झाडे नको

पैसा हवाय पण कष्ट नको

संपत्ती हवीय पण म्हातारे आई वडील नको

स्वास्थ्य हवंय पण व्यायाम करणे नको

फक्त सुख हवंय पण दुःख अजिबात नको


किती स्वार्थी झालास रे माणसा,

तुला उपभोग तर हवाय

पण कशाचीही जपणूक मात्र करायला नको...

✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...