Showing posts with label दिशादर्शक ( directions ). Show all posts
Showing posts with label दिशादर्शक ( directions ). Show all posts

Friday, August 23, 2024

बदल घडावा...पण सुरूवात कोठून ?

   एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्चे...निदर्शने...फाशीची मागणी...राजकीय द्वंद्व....आणि अखेर काही दिवसांनी या सर्वांवर पडदा पडतो व सर्व शांत होतं, जोपर्यंत दुसरी एखादी अत्याचाराची हृदयद्रावक घटना उघडकीस येत नाही तोवर.
   अशा घटनांनी खरंच काळीज पिळवटून जाते. परंतु, नीट विचार केलाय का की, या घटना का घडतात व कोण करतं ते. कदाचित आज अशा घटनांवर हळहळ व्यक्त करणारा किंवा आंदोलन करणाराच एखाद दिवशी व्यसनाच्या धुंदीत अथवा अश्लील साहित्याच्या आहारी गेल्याने वासनांध होऊन स्वतःदेखील अशा घटनेस कारणीभूत ठरू शकतो.
   हे सर्व आंदोलन, मोर्चा किंवा एखाद्या केसमध्ये शिक्षा करून थांबणार नाही. यासाठी सर्वांना आपले विचार शुद्ध करणे आवश्यक आहे आणि शुद्ध विचारांप्रमाणेच आपले आचरण ठेवणे गरजेचे आहे. सर्व तरुणांनी, आबालवृद्धांनी महापुरूषांचे पौरूषत्व समजून घेणे गरजेचे आहे. हे पौरूषत्व स्त्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात नसून दुर्बल व पीडितांचे रक्षण करण्यात असते.
   आज प्रत्येकाने चांगले साहित्य वाचले, अश्लील साहित्य...अश्लील सिनेमे...अश्लील वेबसिरीज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवले, कोणतीही स्त्री समोर आल्यास तिच्याविषयीची आपली दृष्टी साफ ठेवली तरच अशा घटनांना आळा घालता येईल.
   यासाठी प्रत्येक पुरूषाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. कारण ज्याच्याकडून हा घृणास्पद अपराध घडतो त्यालाही आई, बहीण बहीण, बायको, मुलगी यापैकी कोणतेतरी नातेसंबंध असतातच ना ? आज एखाद्या दुसर्‍या स्त्रीसोबत त्याच्याहातून जे घाणेरडे पाप घडेल तेच पाप कदाचित दुसरा नीच वृत्तीचा व्यक्ती त्याच्याही कुटुंबियांसमवेत करू शकतो याचा विचार करण्याची वैचारिक पातळी प्रत्येकामध्ये यायला हवीय.
   प्रत्येकाने स्वतःला सुमार्गावर नेण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले तरच अशा घटना घडण्याला आळा बसेल. अन्यथा कितीही आंदोलने, उद्रेक, चिडचिड केली तरीही काही दिवसांनी पुन्हा दुसरी घटना घडल्याशिवाय राहणार नाही आणि तीदेखील लोकांसमोर उघड होईलच असे नाही.
   त्यामुळे अशा घटनांनी ज्या ज्या पुरूषांच्या हृदयाला तीव्र वेदना होत असतील त्या सर्वांनी स्वतःचे आचरण व विचार शुद्ध करून स्वतःला व्यभिचारापासून अलिप्त ठेवण्यासाठी सक्षम बनवल्यास खर्‍या अर्थाने समाज सुधारण्यास मदत होईल. नाहीतर स्वतःचे विचार अशुद्ध ठेवून इतर घटनांमध्ये भावनांचा उद्रेक दाखवणे हा दुटप्पीपणाच ठरेल...नाही का ?
   पहा पटतंय का ?
✒ K. Satish





Saturday, February 25, 2023

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

साम दाम दंड भेदाचे सहाय्य घेऊनी

भ्रष्ट राजकारणी ते येतील मग निवडूनी,

म्हणून स्वाभिमान मनी सगळ्यांनी जागवा

सुंदर ह्या लोकशाहीस अतिसुंदर बनवा


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

 खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

✒ K. Satish

 

Friday, February 24, 2023

परीक्षेची तयारी

नियमित वाचन करूनी द्यावी

अचूक उत्तरे प्रश्नांची,

उत्तीर्ण होण्यासाठी न घ्यावी

साथ कधीही नकलांची

✒ K. Satish




Friday, February 17, 2023

झरा वाहूद्या प्रयत्नांचा

एका जागी साठलेले पाणी स्वतःही घाण होते आणि आजूबाजूलाही दुर्गंधी, रोगराई पसरविते. परंतु, वाहणाऱ्या पाण्याला मात्र वाट सापडतच जाते.

तसेच, प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलादेखील यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. त्यामुळे तो स्वतःही आनंदी राहतो आणि इतरांच्या जीवनात देखील यशाचा प्रकाश टाकण्यास निमित्त ठरतो.

म्हणून नेहमी प्रयत्नशील रहा व स्वतःसोबत इतरांचेही जीवन आनंदमयी बनवा.

✒ K.Satish




Friday, December 2, 2022

आनंदाच्या वाटेने

आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की, त्यामुळे आपला मानसिक त्रास वाढून चेहर्‍यावरील हास्य हरवून जाते.
परंतु ,
अशा प्रसंगांचा सामना हसमुखाने व शांतचित्ताने केल्यास त्यातून योग्य तो मार्ग अवश्य सापडतो...

म्हणून नेहमी हसत रहा...आनंदी रहा.

✒ K. Satish




Tuesday, November 22, 2022

अहंकार आणि हट्टीपणा

   अहंकार आणि हट्टीपणा सद्सद्विवेक बुद्धीला मारून टाकतात. आणि मग मनुष्याची वाटचाल अधोगतीकडे होण्यास सुरुवात होते. अशावेळी मनुष्य आपल्या वागण्याने आपले हित जोपासणार्‍या व्यक्तींना सुद्धा किंमत देणे बंद करतो, किंबहुना त्यांचा अपमान करणेही सोडत नाही.
   आणि मग मोठ्या नशीबाने त्याच्या आयुष्यात आलेली ही बोटावर मोजण्याइतकी चांगली माणसेही अगदी नाईलाजाने त्याच्या आयुष्यातून दूर निघून जातात.
   मग कधीतरी जीवनातील एखाद्या कठीण समयी त्याला ह्या व्यक्तींची प्रकर्षाने उणीव भासते. त्यावेळी मात्र त्याच्या हाती हळहळ आणि पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही.
   म्हणूनच आपल्यातील अहंकार आणि हट्टीपणाला वेळीच आवर घालायला शिकले पाहिजे, नाहीतर या सुंदर जगामध्ये अगदी नशीबाने तुमच्या आयुष्यात आलेल्या थोड्या थोडक्या चांगल्या माणसांनाही तुम्ही गमावून बसाल.
   आणि मग ह्या स्वार्थाने भरलेल्या दुनियेत अनेक अडचणींना सामोरे जाताना व्यथित होऊन तुमचे आयुष्य कधी संपून जाईल हे तुम्हाला कळणार देखील नाही...
✒ K. Satish




Tuesday, November 15, 2022

खरा अपराध

आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असताना रस्ता चुकणे हा अपराध नव्हे. 

परंतु ,

चूक कळल्यानंतरही योग्य मार्गाची निवड न करता चुकीच्या वाटेवर जाऊन मध्येच थांबणे हा नक्कीच अपराध आहे.

✒ K.Satish






Thursday, July 21, 2022

नाते

नाते टिकवण्यासाठी कमीपणा घेणे ही चांगली बाब आहे. परंतु, प्रत्येक वेळी जर का तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर निश्चितच त्यावर विचार करण्याची गरज आहे.

नाते असावे प्रेमाचे , जिव्हाळ्याचे आणि सन्मानाचे...
गुलाम बनवू पाहणारे नाते असते काय कामाचे ?
✒ K. Satish




Saturday, April 23, 2022

जागतिक पुस्तक दिन

वृक्षांपासूनी बनतो कागद

कागदापासूनी पुस्तक,

त्यातून मिळते ज्ञान असे की

तल्लख होते मस्तक


जागतिक पुस्तकदिनाच्या

सर्व आबालवृद्ध नागरिकांना

हार्दिक शुभेच्छा...!!!


झाडे लावा

झाडे जगवा...!!!

✒ K. Satish





Saturday, March 12, 2022

अडचणींच्या डोंगरावरती वसले शिखर यशाचे

     आयुष्यात पुढे पुढे जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पुढे जाऊन जर काही चांगले घडणार असेल तर अगोदर अनेक वाईट घटना आपल्या आयुष्यात घडत जातात.
     पूर्वी हे घडत असताना खूप त्रास व्हायचा. वाटायचे आपण तर काही चुकीची कृती करीत नाही, तरी आपल्यावर असे आघात का होत असावेत ?....त्यामुळे मन सतत नकारात्मक चक्रात गुरफटले जायचे.
     परंतु, जीवनातील सर्व चढउतारांनी, घडत गेलेल्या घटनाक्रमांनी आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर वाईट घटनांकडे पुढील आयुष्यात चालून येणाऱ्या सुखाची नांदी म्हणून पाहायला शिकवले. त्यामुळे वाईट घटना घडल्यास त्याचे दुःख हे लगेच विरून जाते व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक न राहून सकारात्मक होतो.
     ही मानसिकता लगेच तयार होणे अशक्य आहे. पण असंख्य आघात झेलल्यानंतर जेव्हा त्यातून चांगल्या घटना घडण्याची अनुभूती यायला लागते, तेव्हा आपसूक आपली विचारसरणी सकारात्मक बनू लागते.
     परंतु, अनेकांमध्ये ही प्रगल्भता येण्याआधीच त्यांच्याकडून आत्महत्येचे पाऊल उचलले जाते, अथवा सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची मानसिकता अधिक मोठ्या प्रमाणात विकसित होते.
     आणि याच मानसिकतेमुळे त्यांना या वाईट घटनाचक्राच्या दाट धुक्यांच्या थोडे पुढे सुखद यशाची सोनेरी किरणे पंख पसरून त्यांच्यासाठी उभी असल्याची आणि त्रासाची ही मालिका संपून सुखाचे क्षण उपभोगण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ते पोहोचले असल्याची जाणीवच होत नाही.
     त्यामुळे ज्यांना आपल्या आयुष्यात अजूनही अशा घटनाक्रमांना सामोरे जावे लागले नसेल त्यांनी ( मुख्यत्वेकरून तरूण पिढीने ) येणाऱ्या प्रत्येक वाईट प्रसंगाला, त्रासाला कंटाळून न जाता पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी नक्कीच चांगले घडणार आहे, एखादा चांगला बदल घडून एखादी सुवर्णसंधी आपली वाट पाहत असावी म्हणूनच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही आपली कठोर परीक्षा तर नाही ना ? हा विचार केल्यास घडणाऱ्या कोणत्याही वाईट घटनांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर जास्त काळ राहणार नाही. आणि नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवणारी व्यक्ती सहसा अपयश पदरात पाडून घेत नाही. आणि काही कारणास्तव अपयश आलेच तरीही त्यातून यशाच्या नवीन मार्गाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. व अशा व्यक्तीसाठी यशाचे मार्ग हे आपसूकच खुले होतात.

✒ K. Satish



Wednesday, December 29, 2021

यश

स्वप्नांना प्रयत्नांची जोड

अन् प्रयत्नांना परिश्रमांची,

कठोर परिश्रमानंतरच येते

चव ही सफल यशाची

✒ K. Satish




Sunday, November 7, 2021

७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस

   ७ नोव्हेंबर १९०० रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये ( सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल ) पहिल्यांदाच इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. याच दिवसापासून त्यांच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात झाली. या ठिकाणी ते १९०४ पर्यंत म्हणजेच इयत्ता ४थी पर्यंत शिकले.
  
   ज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण व सर्व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच घटनेच्या स्मरणार्थ व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीशील वाटचालीकरिता शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कठीण परिश्रमाची जाणीव करून देण्याहेतूने संपूर्ण महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

✒ K. Satish


Wednesday, October 27, 2021

अयोग्य मदत

 कर्तृत्वशून्य माणूस हा छिद्र पडलेल्या इंधनाच्या टाकीसारखा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही मदतरूपी इंधन भरले तरी तो त्याच्या कर्तृत्वशून्यतेमुळे थोड्या कालावधीतच पुन्हा तुमच्या मदतीची अपेक्षा बाळगतो.

आणि अशा व्यक्तीला मदतीचा आधार देण्याच्या नादात तुमच्या यशाची गाडी चुकल्याशिवाय राहत नाही.

✒ K. Satish



Friday, October 22, 2021

विचारांची गुणवत्ता

आपल्या आयुष्याचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे ....
आणि
आपल्या विचारांची गुणवत्ता आपल्या संपर्कातील लोकांवर अवलंबून असते.

म्हणून नेहमी उत्तम विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा व आपल्या विचारांच्या गुणवत्तेची उंची वाढवा...
असे करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनस्वास्थ्याबरोबरच समाजस्वास्थ्यदेखील सुखमय व आनंदी बनवू शकता....

✒ K. Satish



Wednesday, September 29, 2021

श्रेष्ठ दान

   अन्नदान, विद्यादान त्याबरोबरच रक्तदान यांची श्रेष्ठदानामध्ये गणना होते. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरूच असतो. एकदा मृत्यू आला की मग त्या शरीरातील रक्ताचे महत्त्व शून्य होऊन बसते. मनुष्य जिवंत असेपर्यंत शरीरात रक्त तयार होण्यास सुदृढ मनुष्यास कधीही अडथळा निर्माण होत नाही. मग हे विनामूल्य शरीरात तयार होणारे रक्त जर इतर गरजू, पीडित रुग्णांचे प्राण वाचवू शकत असेल तर जमेल त्याप्रमाणे रक्तदान का करू नये ?
जो मनुष्य सुदृढ आहे त्याने जसे जमेल तसे रक्तदान अवश्य करावेत.
   सकारात्मक विचार केल्यास सामाजिक बांधिलकीच्याही पुढे जाऊन असा विचारही करू शकता की, ज्याप्रमाणे काळाच्या ओघात मनुष्यामध्ये काही नकारात्मक विचारसरणीने शिरकाव केला असेल तर आध्यात्माने, सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करून तिला नष्ट करता येते. तिला आपल्या मनातून, मेंदूतून, देहातून बाहेर काढता येते. त्याप्रमाणेच काही नकारात्मकता रक्तात उतरली असेल तर त्याच त्याच रक्ताचा शरीरात सतत संचार ठेवून फुफ्फुसावरील व हृदयावरील ताण का वाढवायचा. जाऊद्याना थोडे रक्त शरीराबाहेर... सकारात्मक विचारसरणीच्या सहाय्याने होऊद्या नव्या रक्ताचा संचार तुमच्या शरीरात. तुमचीही ऊर्जा वाढेल आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवजातीला वाचवण्याचे सत्कार्यही तुमच्या हातून घडेल.
   कोरोनाच्या दुष्टचक्राने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खूप दिवसांनंतर टाटा मोटर्स, कार प्लान्ट, पुणे येथे आज २९ सप्टेंबर २०२१ रोजी रक्तदान करण्याचा योग आला. खूप समाधान वाटले.
✒ K. Satish






Sunday, September 26, 2021

बदल घडत नाही, घडवावा लागतो...

 आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून तिच्याविषयी गुणगान गाण्याचा अहंकारी आणि स्वतःबरोबरच इतरांचेही नुकसान करण्याचा बालिश प्रकार वाढीस लागला आहे.

   उदाहरणच द्यायचे झाले तर आपण घेतलेले कपडे, आपण घेतलेली गाडी, आपण घेतलेले घर, आपण जेथे जेवायला गेलो ते हाॅटेल, आपण खरेदी केलेले दागिने...इत्यादी अनेक गोष्टी ज्या आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा आपण स्वतः निर्णय घेऊन उपभोग घेत आहोत. या सर्व गोष्टी प्रत्येकात असलेल्या अहंकारी स्वभावामुळे माझी वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्याच्या नादात बहुतांशी वेळा लोक आपलेच नुकसान करून बसतात. आणि स्वतःचा चुकलेला निर्णय इतरांसमोर मान्य करण्यात कमीपणा वाटत असल्याने आतल्या आत घुसमटत राहून त्या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत राहतात. व त्यांच्या या चुकीच्या वृत्तीमुळे इतर लोकांनी त्यांच्या एखाद्या निर्णयाचे अनुकरण केल्यास ते सुद्धा आपसूकच खड्डयात पडतात. आणि मग त्यांनी याविषयी चर्चा केल्यानंतर ही मंडळी त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाविषयी बोलून दाखवतात, परंतु तोपर्यंत त्याने स्वतःचे नुकसान केलेलेच असते त्याबरोबरच इतरांच्या नुकसानालाही तो कारणीभूत ठरलेला असतो.
   असाच अहंकार शाळा, काॅलेज निवडण्याच्या बाबतीत सुरू झालाय. माझा मुलगा, माझी मुलगी अमूक शाळेत, अमूक काॅलेजला आहे हे पालकवर्ग अतिशय अभिमानाने सांगताना दिसतात. मोठी मोठी नावे सांगताना, त्या संस्थेची ख्याती सांगताना पालकवर्ग थकत नाही. कारण हा त्यांनी घेतलेला निर्णय असतो. आणि आपण घेतलेला निर्णय इतरांसमोर वाईट किंवा चुकीचा ठरणे हा पालकांना आपला अपमान झाल्यासारखे वाटते. म्हणून ही केविलवाणी धडपड.
    परंतु या सर्व खटाटोपात पालक हेच विसरून चाललेत की, काही बोटावर मोजण्याइतक्या शिक्षणसंस्था सोडल्या तर सर्व शिक्षणसंस्थांचे कामकाज हे शेअर मार्केटमधील दुय्यम दर्जाच्या बनावट कंपन्यांसारखे झाले आहे. आपल्या शाळेचा भाव वाढवण्यासाठी खोटे चित्र निर्माण करून मोठमोठ्या बढाया मारणे, पालकांना मोठी स्वप्न दाखवणे, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशाचेतरी आमिष देऊन त्याच्याद्वारेही शाळेची बनावट प्रसिद्धी करणे, विविध ॲक्टीव्हीटीजचे प्रेझेंटेशन करून आम्ही किती प्रमाणात मुलांना घडवण्यासाठी कार्यरत असणार आहोत हे दाखवले जाते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात यातील १० ते २० टक्केच चित्र खरे असते बाकी सर्व दिखावा. तुम्ही त्यांच्यासाठी फक्त पैसे छापण्याचे एक साधन असता. आणि या भ्रमातून जागे होईपर्यंत तुमचा आणि तुमच्या पाल्याचा आयुष्यातील कधीही परत मिळू न शकणारा बहुमूल्य वेळ वाया गेलेला असतो.
   नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् ,
   नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता ।
   नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
   नष्टा वेला या गता सा गतैव ।।
खूप कष्ट करून गेलेली संपत्ती मिळवता येते.
विसरल्यामुळे गेलेली विद्या अभ्यास करून पुन्हा मिळवता येते. बिघडलेली तब्येत चांगले उपचार करून ती सुधारता येते. पण वेळ वाया घालवला तर तो गेला तो गेलाच.
   म्हणून वेळेचं नुकसान कधीही भरून काढता येत नसल्याने वेळीच भ्रमातून जागे होऊन आपली खोटी फुशारकी मारणे थांबवायला हवे.
   आपला पाल्य ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतोय त्या संस्थेचे गुणगान नक्कीच गावे परंतु संस्थेने निर्माण केलेल्या भ्रमाला पाहून, त्यांच्या दिखाव्याला भाळून नाही तर त्यांचे कामकाज प्रामाणिकपणे मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी होते आहे का ?, फक्त पैशाच्या बाजारात गुरफटून संस्था आपल्या नीतिमूल्यांना आणि मुलांचे भवितव्य घडवण्यासारख्या महान कार्याच्या मूळ उद्दिष्टाला मूठमाती तर देत नाहीये ना ? या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून.
   आज एखाद्या निवासी सैनिकी शाळेत मुलांना दाखल केल्यानंतर पालक निर्धास्त राहून आता आपल्या पाल्याचा अगदी उत्तमप्रकारे सर्वांगीण विकास होणार या भ्रमात जगत राहतात. अनेकांना तर आपले काम पैसे भरणे एवढेच राहिले आहे असे वाटू लागते. बहुतांशी निवासी शाळा या त्यांच्या भरमसाठ फी स्ट्रक्चरच्या अनुषंगाने पालकांची आर्थिक कुवत पाहूनच विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करतात. परंतु, फक्त फी भरून आपल्याच विश्वात रममाण होण्याचे व शालेय संस्थांच्या खोट्या आश्वासनांना भुलून स्वतःचे मानसिक समाधान करून घेण्याचे धोरण पालकांनी अवलंबिल्यास ते त्यांच्याबरोबरच त्यांच्या पाल्याच्या, इतर विद्यार्थ्यांच्या व इतर पालकांच्याही नुकसानास कारणीभूत ठरू शकतात.
   वेळीच पालकांनी भ्रमातून जागे होऊन शालेय संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी, मुलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी, निवासी सैनिकी शाळा असल्यास त्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाविषयी शालेय व्यवस्थापनाने वरवर दाखवलेल्या सुंदर चित्राला न भुलता वेळोवेळी गांभीर्याने पाठपुरावा करून शाळा व्यवस्थापनाचे काही चुकत असेल तर वेळीच निदर्शनास आणायला हवे. व त्यावर योग्य निर्णय वेळीच घ्यायला हवा.
   कोणतीही संस्था असो वा व्यक्ती तो आपली जमेची बाजूच समोर मांडत असतो, आपल्या कार्याचे कौतुकच सांगत असतो. आपल्या चुकीचे प्रदर्शन मांडत नाही. कारण हा सर्व आता पैशाचा खेळ होऊन बसलाय.
आज आपण पैसे भरूनही मुलांच्या अधोगतीस हातभार लावतोय अशीच अनेक पालकांची अवस्था झालीय. पालकांचा हा भ्रम वेळीच तुटला नाही तर हळूहळू वेळ पुढे निघून जाते व आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पालकांना पर्यायच उरत नाही. पण या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया जाऊन कधीही न भरणारे नुकसान होऊन जाते.
   हे सर्व सुधारावयाचे असेल तर प्रत्येक पालकाने शालेय प्रशासनाकडून मांडल्या जाणाऱ्या भ्रमित व दिशाभूल करणार्‍या चित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवणे थांबवायला हवे. आणि शालेय प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा वेळोवेळी एक सुजाण पालक ( फक्त पैसे भरणारी मशीन नव्हे ) म्हणून पाठपुरावा करून शाळेने दिलेल्या आश्वासनांची खरंच पूर्तता होत आहे ना याची योग्यप्रकारे खातरजमा करायला हवी.
    लक्षात ठेवा, कोणतीही संस्था अगदी योग्यपद्धतीनेच काम करत असेल असे समजणे साफ चुकीचे आहे. आणि त्यांना वेळीच चुकीच्या कार्यपद्धतीविषयी जाब विचारला नाही तर त्यांचेही चुकीचे कामकाज करण्याचे धाडस वाढत जाऊन हळूहळू तिथे कर्तव्य विसरून पैसे छापण्याचा घाणेरडा खेळ सुरू होतो. आणि मग या खेळातून निर्माण झालेला भ्रष्टाचाररूपी राक्षस पालकांचे पैसे व विद्यार्थ्यांमधील विविध गुणांसोबतच त्यांच्या भवितव्यालाही गिळंकृत करून टाकतो.
   म्हणून सर्वांनी वेळीच जागे व्हा व आपल्या योग्य हक्कांसाठी प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासा. मग समोर शालेय संस्था असली तरी डगमगू नये. कारण चुकीची कृती ही आपल्या प्रिय व्यक्तीकडूनही होऊ शकते. म्हणून काय आपण त्याला जाब न विचारता चुका करण्यासाठी प्रोत्साहन देतो का ?
   बलात्कार करणे, लूटमार करून खून करणे हे अक्षम्य गुन्हे आहेत. अशा गुन्हेगारांना शासन करण्यासाठी लढणे ही खूप प्रशंसनीय गोष्ट आहे. परंतु हाच अपराध आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्यास त्याला जाब न विचारता त्याच्या या कृतीचे समर्थन करून त्याला पाठीशी घालणे ही अतिशय चुकीची भूमिका असे मी मानतो.
    मग शाळेसारख्या वंदनीय संस्थेकडून चुकीची कार्यपद्धती अवलंबली जात असेल तर पालकांनी त्या चुका सुधारण्याची मागणी करायला का घाबरावे. बदल एका दिवसात घडत नाही हे मान्य. परंतु योग्य - अयोग्याची जाण ठेवून स्वतःच्या हक्कांसाठी प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर बदल कधीच घडणार नाही...
   बघा विचार करून.......🙏🏻

✒ K. Satish


Friday, September 24, 2021

लढा कुणाच्या हक्कांसाठी ?

   आत्ताच्या काळात क्रांतिकारी विचाराच्या व्यक्तीने मानसिक व वैचारिकरित्या मृत पावलेल्या स्वयंकेंद्रित लोकांचे प्रतिनिधित्व करून अन्यायाविरूद्ध लढणे म्हणजे आपल्या क्रांतीकारी विचारांचा, स्वाभिमानी बाण्याचा व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीचा स्वतःच्याच हाताने खून केल्यासारखे आहे.

   कारण सध्याच्या काळात लोकांना आपल्या महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या महान कार्याची प्रकर्षाने आठवण येते. अगदी अभिमानाने ते त्यांच्या कार्याचे गोडवे गात असतात. हे महापुरूष, क्रांतिकारक पुन्हा जन्माला यावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते. परंतु या महान व्यक्तींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान पाहता त्यांचा जन्म आपल्या घरात न होता इतरांच्या घरात व्हावा व पुन्हा त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन इतरांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय घरबसल्या मिळवून द्यावेत अशी काहीशी सर्वांची मानसिकता झाली आहे.

   त्यामुळेच मी हा प्रश्न मांडत आहे.....लढा कुणाच्या हक्कांसाठी ?

   मानसिक व वैचारिकरित्या पूर्णपणे मृतावस्थेत जाऊन आपल्यामध्ये असलेल्या थोड्या का होईना स्वाभिमानी वृत्तीला पूर्णपणे तिलांजली देण्याअगोदर माझ्या या प्रश्नाचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा.

    खरंच, लढा कुणाच्या हक्कांसाठी ?

कारण क्रांतिकारक व महापुरूष पुन्हा पुन्हा जन्माला येणार नाहीत. त्यामुळे स्वतःच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी, न्यायासाठी प्रत्येकामध्ये लढण्याची वृत्ती आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कारण इतर कोणीतरी स्वतःच्या सुखांचा त्याग करून, स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला घरबसल्या आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढा उभारून न्याय मिळवून देण्याची प्रतिक्षा करत राहिलात तर तुम्ही आत्ता अनुभवत असलेली स्वतःची स्वयंकेंद्रित आरामदायी जीवनशैली संपुष्टात येऊन तुम्ही कधी पूर्णपणे गुलामगिरीत ढकलले जाताल हे तुम्हाला पूर्णपणे गुलाम होईपर्यंत कळणारदेखील नाही.

        नीट विचार करा.....
✒ K. Satish










Tuesday, August 17, 2021

मन निर्मळ तू कर स्वतःचे

      ' जीवन '... प्रत्येकाला जीवनात अंधारमय क्षणांना तोंड द्यावे लागते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अशा क्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज करावे लागते. या अंधारमय क्षणांवर मात करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याकरिता सतत प्रयत्नांचे प्रकाशमय दिवे तेवत ठेवण्याची आवश्यकता असते.

     परंतु , बहुतांशी लोक हे दुसर्‍याच्या जीवनातील अंधार पाहून खुश होत असतात. किंबहुना हा अंधार अजून गडद कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. पण दुसर्‍याच्या जीवनातील अंधाराचा आनंद घेण्याच्या आणि तो अजून काळाकुट्ट करण्याच्या नादात असे लोक आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी लागणारे पुरेसे प्रयत्न करण्यास विसरूनच जातात. व दुसर्‍याचे आयुष्य अंधारमय बनवण्याच्या नादात स्वतःच कधी अंधाराच्या गर्द छायेत स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला ढकलून देण्यास कारणीभूत ठरतात हे त्यांना कळतच नाही.

अंधार दुसर्‍याच्या जीवनातला
पाहूनी होतो आनंद का ?,
कपट मनामध्ये ठेवून असा रे
आयुष्यामध्ये जगतो का ?

वृत्ती नाही चांगली ही तर
घातक ठरेल तुलाच रे,
मन तू निर्मळ कर स्वतःचे
दिशा नवी जीवनाला दे

✒ K. Satish





Friday, July 23, 2021

शतशः नमन

पैशाच्या बाजारात न भरकटता आपल्या शिष्यांच्या ज्ञानाची घागर तुडुंब भरण्याचे आपले परमकर्तव्य अगदी मनापासून पार पाडणाऱ्या सर्व आदरणीय गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त शतशः नमन...!!!

✒ K. Satish



Thursday, July 1, 2021

हसत खेळत जगण्याची कला

भविष्याची चिंता करीत वर्तमान आयुष्याचा आस्वाद न घेणे हे मूर्खपणाचे लक्षण आहेच..

परंतु ,

वर्तमान परिस्थितीमध्ये मौजमजा आणि ऐशआरामात विलीन होऊन भविष्याचा अजिबात विचार न करणे हा देखील खूप मोठा मूर्खपणाच आहे.

म्हणून.......

भविष्याचे उत्तमप्रकारे नियोजन करता करता  वर्तमान आयुष्यातील आनंदाचा आस्वाद घेत हसत खेळत जगण्याची कला आत्मसात करा.

✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...