Showing posts with label इतर बातम्या ( Other News ). Show all posts
Showing posts with label इतर बातम्या ( Other News ). Show all posts

Monday, May 8, 2023

महाराष्ट्र शाहीर

मराठी चित्रपट
महाराष्ट्र शाहीर ✒🎙🎼
( शाहीर साबळेंचा जीवनपट ) 

   खूपच छान...बऱ्याच दिवसांनी चित्रपटगृहात चांगल्या कलाकृतीचे दर्शन घडले. सहकुटुंब पहावा असा चित्रपट...नव्या पिढीला प्रेरणादायी व सामाजिक भान शिकवणारा चित्रपट...
   कलेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याची लोककलावंतांची धडपड सुरू असते, परंतु हे सर्व करताना त्याला वैयक्तिक जीवनात किती तडजोडी कराव्या लागतात, किती अडचणींना सामोरे जावे लागते त्याचे उत्तम चित्र रेखाटले आहे. सर्वांनी नक्कीच पहावा असा चित्रपट...आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्यांनी तर पहायलाच हवा व आपल्या मुलांनादेखील अवश्य दाखवायला हवा. हा चित्रपट अतिरंजित चित्रपटांसारखा तुमच्या हृदयाचे ठोके बिघडवणार नाही, उलट हृदय संवेदनशील बनवून तुमच्यात नवी ऊर्जा नक्कीच भरेन...
   सर्व स्तरावर प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा उत्तम चित्रपट....👍🏻👌🏻


मला अभिमान आहे माझी जन्मभूमी महाराष्ट्र असल्याचा
मला अभिमान आहे मराठी माझी मातृभाषा असल्याचा
@ के. सतीश ( कवी, गीतकार ) पुणे 
✒ K. Satish





Monday, November 15, 2021

महाराष्ट्राची लोककला दुबईच्या धरतीवर

   सर्व रसिकजनांस कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात आपल्या शब्दांची व आवाजाची जादू ओतणारे, 'मस्का' चित्रपटातील 'बया' या गाण्याचे पार्श्वगायक,  'डॅडी', 'बाॅईज २'  या चित्रपटांचे गायक, दोस्तीगीरी चित्रपटाचे गीतकार, 'चौर्य' चित्रपटाचे कोरियोग्राफर तसेच लोककलेचे गाढे अभ्यासक व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची लोककला १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयोजित केलेल्या 'दि वर्ल्ड एक्स्पो २०२०' या महोत्सवात झळकणार आहे.

   त्यातही अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे यात आमचे बंधू व आमच्या लोकगीतांना श्रवणीय करण्यासाठी ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे असे 'बालगंधर्व परिवार पुरस्कार' विजेते, महाराष्ट्रातील उत्कृष्ट ढोलकीवादक श्री. नितीन प्रधान हे आपल्या वादनकलेचे योगदान देणार आहेत.

   या महोत्सवात आपली कला सादर करून आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन सातासमुद्रापार असलेल्या रसिकजनांना घडवून देण्यासाठी सज्ज झालेल्या या सर्व गुणी कलावंतांस मनःपूर्वक शुभेच्छा...!!! 💐

✒ K. Satish



Friday, July 10, 2020

ज्येष्ठ हिंदी शीघ्र कवी व मिमिक्री कलाकार मनमोहन जालेपोलेलु उर्फ मनमोहन बेवडा यांचे दुःखद निधन

अतिशय दुःखद घटना

काव्यपरिवारातील हिंदी शीघ्र कवी आणि अनेक स्टेजशोज् मध्ये आपल्या मिमिक्री आणि गायनाने प्रेक्षकांची मने जिंकणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व कवी मनमोहन जालेपोलेलु उर्फ मनमोहन बेवडा यांचे काल दि. ८ जुलै रोजी दुखःद निधन झाले. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणारे मनमोहन हे अनेक सुप्रसिद्ध गायकांचे ( विशेषतः किशोर कुमार, मोहम्मद रफी, आर. डी. बर्मन, मन्ना डे, कुंदनलाल सेहगल ) आवाज अगदी हुबेहुब काढत असत. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर यांनीदेखील स्वतः पत्र पाठवून त्यांच्या कलेचे कौतुक केले होते.
त्यांचे टोपण नाव ' बेवडा ' असले तरी त्यांना कुठलेही व्यसन नव्हते. कलाक्षेत्रात कार्यरत असताना ते आपले सामाजिक कर्तव्यदेखील अगदी निष्ठेने पार पाडत होते. याच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी पोलिस मित्र म्हणून त्यांची भूमिका चोख बजावली होती. कोरोनाच्या संकटात ते दररोज दोन तास पोलिस मित्र म्हणून कार्यरत असत.
आपल्या मिश्कील आणि हजरजबाबीपणामुळे ते कोणालाही क्षणात आपलेसे करून घेत. त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती त्यांना नेहमी आठवणीत ठेवत असे. त्यामुळेच ज्यांच्या ज्यांच्याशी त्यांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपर्क आला होता त्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. आणि सर्वांचे मन अगदी हेलावून गेले आहे. प्रत्येकाच्या नजरेसमोर त्यांची प्रतिमा झळकत असेल याची मला खात्री आहे.
अशा या हरहुन्नरी कलाकाराला मात्र आयुष्यातील इतर जबाबदार्‍या पार पाडताना पात्रता असतानाही कला क्षेत्रातील मोठे नाव बनता आले नाही. तरीदेखील त्यांनी आपले काव्यप्रेम अगदी निष्ठेने जपले होते. मला आठवतेय की, फेब्रुवारी २०२० मध्ये आमचे ओझर येथील महाकाव्यसंमेलन पार पडल्यावर त्यांनी माझ्याजवळ एक म्युझिकल शोची निर्मिती करण्याविषयी विनंती केली होती. त्यांना त्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांची कला रसिकांपर्यंत पुर्वीच्याच जोशात सादर करायची होती. वेळेच्या कमतरतेमुळे सध्या शक्य होत नसले तरी भविष्यात नक्की आपण यावर काम करू असे मी त्यांना आश्वासन दिले होते. दुर्दैवाने त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
त्यांनी कधीही कुणाचे मन दुखावले नाही आणि कधी कुणाचे वाईटही चिंतले नाही. आपल्या हसतमुख स्वभावाने ते सर्वांचे मन जिंकून घेत. काव्यमैफिलीत थोडं वातावरण गंभीर झाल्यास अथवा मैफिलीत संथपणा आल्यास मनमोहनजी त्यांच्या मिमिक्रीने आणि गायनाने मैफील पुन्हा आल्हाददायक वातावरणात नेऊन ठेवत.
त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतील असे हे व्यक्तिमत्त्व होते. अशा या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी सर्व काव्यपरिवार व रसिकजनांकडून कृतज्ञता व्यक्त करतो.


'काव्यमळ्यातील पुष्प हरपले
सुगंध मागे ठेवून गेले,
हसतमुख या कलावंताला
काळाने आपलेसे केले

देह त्यागला असला तरीही
स्मृती अजूनही जिवंत आहेत,
आठवणींच्या असंख्य लाटा
सार्‍यांच्या मनामध्ये उसळत आहेत

काव्यमळ्याला फुलवत ठेवूनी
असंख्य पुष्प फुलवायची आहे,
हरपून गेलेल्या पुष्पाला
हीच खरी श्रद्धांजली आहे '

शोकाकुल
के. सतीश, सर्व काव्यपरिवार व रसिकजन

                              ✒ K. Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...