Friday, August 23, 2024

बदल घडावा...पण सुरूवात कोठून ?

   एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्चे...निदर्शने...फाशीची मागणी...राजकीय द्वंद्व....आणि अखेर काही दिवसांनी या सर्वांवर पडदा पडतो व सर्व शांत होतं, जोपर्यंत दुसरी एखादी अत्याचाराची हृदयद्रावक घटना उघडकीस येत नाही तोवर.
   अशा घटनांनी खरंच काळीज पिळवटून जाते. परंतु, नीट विचार केलाय का की, या घटना का घडतात व कोण करतं ते. कदाचित आज अशा घटनांवर हळहळ व्यक्त करणारा किंवा आंदोलन करणाराच एखाद दिवशी व्यसनाच्या धुंदीत अथवा अश्लील साहित्याच्या आहारी गेल्याने वासनांध होऊन स्वतःदेखील अशा घटनेस कारणीभूत ठरू शकतो.
   हे सर्व आंदोलन, मोर्चा किंवा एखाद्या केसमध्ये शिक्षा करून थांबणार नाही. यासाठी सर्वांना आपले विचार शुद्ध करणे आवश्यक आहे आणि शुद्ध विचारांप्रमाणेच आपले आचरण ठेवणे गरजेचे आहे. सर्व तरुणांनी, आबालवृद्धांनी महापुरूषांचे पौरूषत्व समजून घेणे गरजेचे आहे. हे पौरूषत्व स्त्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात नसून दुर्बल व पीडितांचे रक्षण करण्यात असते.
   आज प्रत्येकाने चांगले साहित्य वाचले, अश्लील साहित्य...अश्लील सिनेमे...अश्लील वेबसिरीज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवले, कोणतीही स्त्री समोर आल्यास तिच्याविषयीची आपली दृष्टी साफ ठेवली तरच अशा घटनांना आळा घालता येईल.
   यासाठी प्रत्येक पुरूषाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. कारण ज्याच्याकडून हा घृणास्पद अपराध घडतो त्यालाही आई, बहीण बहीण, बायको, मुलगी यापैकी कोणतेतरी नातेसंबंध असतातच ना ? आज एखाद्या दुसर्‍या स्त्रीसोबत त्याच्याहातून जे घाणेरडे पाप घडेल तेच पाप कदाचित दुसरा नीच वृत्तीचा व्यक्ती त्याच्याही कुटुंबियांसमवेत करू शकतो याचा विचार करण्याची वैचारिक पातळी प्रत्येकामध्ये यायला हवीय.
   प्रत्येकाने स्वतःला सुमार्गावर नेण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले तरच अशा घटना घडण्याला आळा बसेल. अन्यथा कितीही आंदोलने, उद्रेक, चिडचिड केली तरीही काही दिवसांनी पुन्हा दुसरी घटना घडल्याशिवाय राहणार नाही आणि तीदेखील लोकांसमोर उघड होईलच असे नाही.
   त्यामुळे अशा घटनांनी ज्या ज्या पुरूषांच्या हृदयाला तीव्र वेदना होत असतील त्या सर्वांनी स्वतःचे आचरण व विचार शुद्ध करून स्वतःला व्यभिचारापासून अलिप्त ठेवण्यासाठी सक्षम बनवल्यास खर्‍या अर्थाने समाज सुधारण्यास मदत होईल. नाहीतर स्वतःचे विचार अशुद्ध ठेवून इतर घटनांमध्ये भावनांचा उद्रेक दाखवणे हा दुटप्पीपणाच ठरेल...नाही का ?
   पहा पटतंय का ?
✒ K. Satish





Tuesday, April 23, 2024

सत्यवचन

    कर्तृत्वशून्य, अकार्यक्षम नेत्याला त्याच्या चुकीच्या कार्यपद्धतीविषयी आरसा दाखवणार्‍या प्रामाणिक सर्वसामान्य व्यक्तींची आपल्या चमच्यांकरवी वैयक्तिक पातळीवर खोटी बदनामी करून त्या व्यक्तींची जनसामान्यातील प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचणारा नेता व त्याचे चमचे हे षंढांहूनही खालच्या पातळीवर गणना केली जाण्यास पात्र ठरतात.
   कारण प्रामाणिकपणे लढण्यासाठी त्यांच्याकडे नैतिक मूल्यांचा ठेवा तर नसतोच परंतु वैचारिक पातळीवर सामना करण्याची धमकदेखील नसते.
   हे लोक पृथ्वीतलावरील मानवतेला पोखरणाऱ्या कीडेप्रमाणे असतात. एक दिवस सामान्य जनतेला यांचे खरे रूप कळल्याशिवाय रहात नाही.
✒ K. Satish



Saturday, April 6, 2024

नाकर्त्या नेत्यांचे कसब

   नाकर्त्या नेत्यांची एक खासियत असते. ते जनतेचे भले करण्याऐवजी पद्धतशीरपणे उघड उघड जनतेचे नुकसान करूनदेखील पुन्हा हे नुकसान जनतेतीलच काही लोकांच्या चुकीमुळे कसे झाले आहे, हे पटवून देणाऱ्या वावड्या त्यांच्या स्वाभिमान विकलेल्या हस्तकांमार्फत समाजात अशाप्रकारे पसरवतात की, लोक या नेत्यांच्या चुकीच्या कृतीविरूद्ध आवाज उठवण्याऐवजी आपल्याच लोकांशी वाद घालत बसतात व या नेत्यांचे बिंग फोडणाऱ्या काही जागरूक लोकांवरच या नुकसानीचे खापर फोडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. आणि मग चमचे मंडळींना काही अल्पशा आमिषाचा तुकडा टाकून हे नाकर्ते नेते आपण केलेल्या भ्रष्ट कारस्थानाच्या मलईचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्ततेचा ढेकर देतानाच त्यांच्या चमच्यांसहित सर्व जनतेच्या अज्ञानी मूर्खपणाची मजा घेत नवीन कारस्थानासाठी प्रस्थान करतात.


   जनता नकळतपणे आपल्याच पुढील नुकसानाकरिता या नेत्यांना अदृश्यपणे बळ देत असते. कारण, जनतेतील जागरूक लोकांच्या कडवट वृत्तीपेक्षा या नेत्यांची आणि त्यांच्या चमच्यांची कपटी मधुर वाणी जनतेला भ्रमित करीत असते.
✒ K. Satish




Saturday, September 23, 2023

गणरायाला पत्र

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

   हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी कोटी वंदन...!!!
   तुझ्या उत्सवाची सर्वजण वर्षभर वाट पहात असतात. आणि एकदा का तो दिवस आला की, सर्वजण आनंदोत्सवात अगदी आकंठ डुंबून जातात. आणि मग दहा दिवस तुझी मनोभावे पूजाअर्चा करून झाल्यावर, आनंदोत्सव साजरा करून झाल्यावर तुझे विसर्जन करून तुला निरोप दिला जातो.
   हे सर्व पाहिल्यावर माझ्या मनात दरवर्षी अनेक प्रश्नांचे काहूर माजते. आणि म्हणूनच तुला पत्र लिहिण्याचा हा अट्टाहास...
   हे विघ्नहर्त्या, हा आनंदोत्सव, ही तुझी भव्य आरास, दररोज निरनिराळ्या प्रसादांचे नैवेद्य हे खरंच तुझ्यासाठी असतील का ? मला नक्की माहीत आहे या सर्व बडेजावाची तुला कधीच आवश्यकता नव्हती, किंबहुना अजूनही नाही आणि भविष्यातही नसणार. अरे तू तर स्वतः इतरांना ज्ञान, सुख-समृद्धी, स्वास्थ, स्थैर्य व संपन्नता देणारी देवता. तुला या सर्वांची खरंच आसही नाही आणि आवश्यकताही नाही, हे माझ्या मनाला पक्के माहीत आहे. परंतु, आजकाल मनुष्य इतका स्वार्थी झाला आहे की, तो स्वतःचा बडेजाव दाखवण्यासाठी, एकमेकातील चढाओढीत स्वतःला श्रेष्ठ ठरविण्यासाठी, व स्वतःच्या अहंकारासाठी तुझ्या नावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाचा या दहा दिवसात मोठ्या चतुराईने वापर करून घेतोय. तुझा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी नक्की काय करायला हवे यातच मनुष्याची खरी गल्लत झाली आहे.
   आज तुझ्या उत्सवात दमदाटी करून पैसे मागितले जातात, तुझ्या नावाने गोळा केलेल्या पैशांतून आर्थिक गैरव्यवहार केले जातात, त्यातूनच सर्रास मद्याच्या मेजवान्या करताना अनेकांना तुझी भीती न वाटावी इतका मनुष्य निगरगट्ट झाला आहे. तुझ्या आगमनानंतर तुझी प्रतिष्ठापना केल्यावर या दहा दिवसात तुला तुझ्या नयनांनी काय काय पहावे लागते, काय काय सहन करावे लागते हे मी जाणतो. तुझ्यासारख्या आराध्य देवतेसमोर अश्लील हावभाव करणारी उत्साही मंडळी, गर्दीचा फायदा घेऊन स्त्रियांना घाणेरडा स्पर्श करणारे नराधम, कर्कश्श आवाजात वाजणारी गाणी आणि असे बरेच काही.
   मला माहितेय हे सर्व तुला असह्य होत असणार. व हे सर्व थांबवून सर्वांना शासन करणे हे तुझ्यासाठी एका क्षणात शक्य आहे. परंतु ही पृथ्वी ज्या सुंदर उद्देशाने निर्माण केली गेली होती त्यातील सर्वात बुद्धिमान व या पृथ्वीला आपल्या बुद्धिकौशल्याने आणखी सुंदर बनवण्याची क्षमता असलेला हा मनुष्य म्हणजे विश्वनिर्मात्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि सध्या हे कलियुग या टप्प्यावर येऊन ठेपले आहे की, जर तू अशा दुष्टांचा नाश करण्याचा विचार केलास तर या पृथ्वीतलावरून मनुष्यप्रजाती लुप्त होण्याच्या वाटेवर जाईल. म्हणूनच तुदेखील संयम बाळगून असणार. कारण मोठ्या परिश्रमाने काही मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून विश्वनिर्मात्याने निर्माण केलेल्या या धरेला टिकवून ठेवून आणखी सुंदर बनवण्याची जबाबदारी तुझ्याच खांद्यावर आहे.
   परंतु हे गजानना, आता मनुष्यातील अवगुणांनी अतिशय उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्याचे सर्व सद्गुण आता तोकडे पडत चालले आहेत. मी नक्कीच असे म्हणणार नाही की, या पृथ्वीतलावर सर्वच मनुष्यांमध्ये अवगुण ठासून भरलेले आहेत. कारण काही लोकांमध्ये गुणांच्या तुलनेत अवगुण नगण्य प्रमाणात सापडतील. परंतु अशा सद्गुणी लोकांची संख्या खरंच खूप तोकडी आहे, किंबहुना त्यांचे अस्तित्व देखील जाणवू शकत नाही इतकी ही संख्या कमी आहे.
   काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर, द्वेष, अहंकार या अवगुणांनी आता मनुष्यावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. कधी गुंडांच्या रूपात, कधी बलात्काऱ्यांच्या रूपात, कधी सावकारांच्या रूपात, तर कधी राजनेत्यांच्या रूपात हे विकार उफाळून येऊन दुर्बल घटकांचे शोषण करत आहेत. या पृथ्वीला विद्रूप करण्याचे पातक करत आहेत.
   माणसाला सुंदर स्वादिष्ट, पोषक असे अन्न खाण्याची सुविधा तू निर्माण केली होती. परंतु ते विसरून आता त्याला पैसे खाण्याची चटक लागली आहे. आणि यातून तो तृप्त न होता त्याची ही पैशाची भूक वाढतच चालली आहे. व ती भागवण्यासाठी तो खून, दरोडे, घोटाळे, चोऱ्या, भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, दुर्बल घटकांची पिळवणूक, इतकेच काय तर आपल्या मातृभूमीचा सौदा करण्याचे पातकदेखील त्याच्या हातून घडत आहे. तू सर्व मानवजातीला एक समान लेखून या पृथ्वीतलावर स्थान दिले, परंतु राजनेत्यांनी व काही धर्मांधांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या या लेकरांमध्ये जातीधर्माच्या भिंती निर्माण केल्या, एकजुटीने राहणाऱ्या समाजाला तुकड्या तुकड्यांमध्ये विभागून टाकले. व स्वतःच्या स्वार्थापोटी हे जातीधर्माचे विष पेरतच चालले आहेत. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढवतच चालले आहेत. त्यामुळे अनेक निष्पापांचे नाहक बळी जात आहेत.
   हे विनायका, आता अति होतंय. आता तू या सर्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या दुष्टांचा नायनाट केल्यास पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती तुला आहे हे मी जाणतो, परंतु यांचा समूळ नायनाट करणे योग्य वाटत नसेल तरी यांच्या अवगुणांना नष्ट करण्यासाठी तुला तुझी लीला दाखवणे आता जरुरीचे झाले आहे.
   वादळ, पूर, भूकंप तसेच अलीकडेच हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरससारख्या आपत्त्यांमुळे काही काळापुरता माणसाचा अहंकार लुप्त होऊन जातो. अशावेळी माझ्या मनात विचार येतो, बाप्पा मनुष्याला वठणीवर आणण्यासाठीची ही तुझीच तर लीला नाही ना ?
   परंतु अशा संकटाचा आघात होताच भानावर येऊन जीवनाचा खरा अर्थ कळल्याचा दावा करणारा मनुष्य हे संकट निवळताच पुन्हा दुपटीने स्वार्थी बनून कुकर्म करू लागतो ही मोठी शोकांतिका आहे.
   अर्थात, मनुष्याला भानावर आणण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची झळ देणाराही तूच आणि नंतर त्यातून सावरणाराही तूच. परंतु, मनुष्य तुझ्या या लीला समजून न घेता अवगुणांचे ओझे पुढे घेऊन जातच आहे.
   बाप्पा दरवर्षीप्रमाणे हे दहा दिवस तु या मनुष्यांच्या गर्दीत सामील झाला आहेस. येथे तुला एक क्षण तुझी आरती करून भावनिक आनंद देणारे भक्तगण दिसतील तर इतर संपूर्ण काळ अनैतिक कामात दंग असणाऱ्या, दारू पिऊन धिंगाणा करणार्‍या, भांडण मारामाऱ्या करणाऱ्या, गाण्यांवर अश्लील हावभाव करणार्‍या दुष्ट मानवी प्रवृत्तीचा अनुभव येईल.
   तुला असह्य होत असले तरी तू हे दहा दिवस या उत्सवाचा भाग होतोस हेच या मनुष्यप्राण्याचे भाग्य.
   विसर्जनापूर्वी तुला एकच साकडे घालतो की, तु निर्माण केलेल्या या सुंदर कलाकृतीला म्हणजेच पृथ्वीतलावरील या मनुष्यप्राण्याला त्याच्यातील सर्व अवगुणांना नष्ट करण्याची ताकद तू प्रदान करावीस. व त्या अनुषंगाने होणारी या विश्वाची अधोगती रोखावीस. तसेच ज्याप्रमाणे तु तुझ्या सर्व लेकरांना एकसमान बनवून या पृथ्वीतलावर पाठवलेस त्याचप्रमाणे या सर्व मानवांच्या मनामध्ये एकात्मतेची व मानवतेची भावना जागृत करावीस, पृथ्वीतलावरचे नैसर्गिक चक्र सुरळित चालून आमच्या शेतकरी बांधवांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवावेस, आमच्या सर्व भ्रष्टाचारी राजनेत्यांना, जबाबदार अधिकाऱ्यांना, अपराध्यांकडून लाच घेऊन निरपराधांना शासन करणार्‍या भ्रष्ट पोलिस यंत्रणेला त्यांची समाजाप्रती असलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याची सद्बुद्धी द्यावीस, व सरतेशेवटी सर्व मनुष्यांना मृत्यू हे जीवनातील अटळ सत्य आहे त्यामुळे जोवर या पृथ्वीतलावर तुमचा वावर आहे तोवर या धरेला तुमच्या बौद्धिक कौशल्याने अतिसुंदर बनवण्याचा प्रयत्न करणे हे तुमचे परमकर्तव्य आहे याची प्रखर जाणीव करून द्यावीस ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो.
   तुला पत्र लिहिल्यावर डोक्यावरचे ओझे बरेच कमी होऊन आता हलके वाटत आहे. सर्वांसाठी तुझे आगमन सुखावणारे व विसर्जन दुखावणारे असले तरी मी मात्र तसे मानत नाही. कारण तु एका मार्गदर्शकाच्या रूपाने, गुरूच्या रूपाने सदैव माझ्या मनात असतोस. या दहा दिवसांपुरतेच तुझे आदरातिथ्य करण्याचा दिखावा करण्याऐवजी मी तुझी चांगली शिकवण आत्मसात करून, तुझ्यातील सद्गुणांना अंगी भिनवून एक आदर्श मनुष्य बनण्याला महत्त्व देईल.
   पुन्हा एकदा तुला माझ्या अंतःकरणापासून वंदन बाप्पा...

दुष्टांमधली दुष्ट प्रवृत्ती
संपवून टाक तू बाप्पा आता,
भरकटलेल्या या लेकरांना
मार्ग दाव जाता जाता
✒ K. Satish







Sunday, August 27, 2023

नैसर्गिक आपत्ती आणि मानवी जीवन

मानवप्रजाती पृथ्वीतलावरी
असे अति बलशाली हो,
तरीही त्याला हतबल करीतसे
नैसर्गिक कार्यप्रणाली हो


प्रगतीपथावर गेलो जरी तरी
ठाव न लागे निसर्गाचा,
नैसर्गिक आपत्तीपुढे फुटतो
फुगा मानवी अहंकाराचा

   पृथ्वीच्या उगमापासून सर्व जीवसृष्टीच्या संवर्धन व वाढीमध्ये निसर्गाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती, वारा, पाणी, वायू, सूर्य, तारे, जंगल, समुद्र, टेकड्या, हिमनग, डोंगर, माती, खनिजे इत्यादी सर्व नैसर्गिक घटकांवर मानवाची प्रगती आणि मानवी जीवन अवलंबून आहे.
   स्वतःच्या ज्ञानाबरोबरच या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या सहाय्याने मानवाने आपली उत्तरोत्तर प्रगती केली असून त्याअन्वये पृथ्वीवर मानवासाठी असंख्य सुखसुविधांची निर्मिती केली आहे.
   बुद्धीच्या जोरावर मानवाने अशक्य ते शक्य करून दाखवले असले तरी निसर्गाच्या शक्तीपुढे मानव वेळोवेळी हतबल झालेला दिसून आला आहे आणि या शक्तीला आव्हान देण्याचे सामर्थ्य अजून तरी मानवामध्ये आलेले नाही व इथून पुढेदेखील येणार नाही. कारण या शक्तीने रौद्र रूप धारण केल्यास सर्व मानवजाती व जीवसृष्टी क्षणात नष्ट करण्याची ताकद हिच्यामध्ये आहे.
   'आपत्ती' म्हणजे असे संकट जे तुमचे अतोनात न भरून येणारे नुकसान करणारी दुर्घटना. आणि ही जर नैसर्गिक आपत्ती असेल तर तिच्याद्वारे होणारे नुकसान मानवाला वर्षानुवर्षे मागे ढकलून देते अथवा एखाद्या प्रदेशाचा संपूर्ण नायनाट करून टाकते. मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती संपूर्णपणे लुप्त होणे हे त्याचेच एक मोठे उदाहरण आहे.
   भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक, हिमस्खलन, त्सुनामी, दरड कोसळणे, पूर येणे, वणवा पेटणे ही नैसर्गिक आपत्तीची काही उदाहरणे. त्यातच नैसर्गिक प्रदूषणाने अलीकडील काळात काॅलरा, डेंग्यू, कोरोना, बर्ड फ्ल्यू अशा जैविक आपत्तींचाही समावेश झाला आहे.
   नद्यांना पूर येणे, दरडी कोसळणे तसेच जीवाणू - विषाणूंच्या प्रसारामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देणे अथवा त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करणे त्यातल्यात्यात मानवाला सोपे जाते किंवा यापासून होणारे नुकसान त्यामानाने आपल्या आवाक्यातील असू शकते. परंतु, भूकंप, त्सुनामी, हिमस्खलन यांच्यासारखी नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात झाली आणि तीदेखील मानवी वस्त्यांच्या जवळ झाली तर त्यामुळे होणारे नुकसान हे वर्षानुवर्षे भरून न येणारे असते. कारण या नैसर्गिक आपत्त्या निसर्गाच्या पोटात होणाऱ्या अतितीव्र हालचालींमुळे घडून येत असतात. ज्याचा पूर्णपणे अंदाज बांधणे मानवालाही आजतागायत शक्य झाले नाही.
   आत्तापर्यंत या नैसर्गिक आपत्त्यांनी असंख्य घरे उद्ध्वस्त केली आहेत, अनेक जीव मृत्यूमुखी पाडले आहेत. जे लोक या नैसर्गिक आपत्तीचे बळी पडले आहेत त्यांचे जीवन अजूनही अस्थिरच आहे.
   अलीकडेच रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी हे संपूर्ण गावच दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून गेले. तेथील गावाचे अस्तित्व क्षणार्धात नष्ट होऊन गेले. जे कोणी ग्रामस्थ अथवा एखाद्याचे नातेवाईक त्यावेळी गावात हजर नसल्यामुळे वाचले, त्यांचा या घटनेनंतरचा आक्रोश मन सुन्न करून टाकणारा आहे.
   अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा अंदाज बांधणे व या आपत्तींना रोखणे जरी मानव जातीच्या आवाक्याबाहेरील असले तरी या आपत्तींपासून मानवजातीचे आणि इतर साधनसामग्रीचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे हे मानवाच्या हातात नक्कीच आहे. तसेच अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या लोकांचे सर्व आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे त्या लोकांचे योग्य पुनर्वसन करणे हेदेखील अत्यंत महत्वाचे आहे.
   बाकी जंगलतोड, डोंगरावरील अतिक्रमण, आधुनिकतेच्या नावावर होणारे अतिप्रदूषण आणि त्यामुळे वाढत चाललेले पृथ्वीचे तापमान ही तर नैसर्गिक आपत्तींना अतिरिक्त बळ मिळवून देणारी मानवाने केलेली घोड चूकच म्हणावी लागेल.
   मानवाने वेळीच आपल्या चुकीच्या कृतींना आळा न घातल्यास निसर्गाच्या रौद्ररूपापुढे हतबल होऊन मानवप्रजाती नष्ट होण्यास क्षणाचाही विलंब लागणार नाही.
   त्यामुळे सरतेशेवटी सर्व मानवजातीला एवढेच सांगणे की,

जागा हो माणसा वेळ संपत आहे
निसर्गाची घडी झपाट्याने बिघडत आहे,
लखलखत्या दुनियेतून बाहेर पड जरा
निसर्गाला टिकवण्याचा आग्रह आता धरा...!!!

✒ K. Satish



Wednesday, July 5, 2023

लोकशाही नक्की कुणाची ?

लोकशाहीमध्ये लोकांना

किंमत उरली नाही कवडीची,

आपली सुंदर लोकशाही आता

उरली आहे फक्त नेत्यांची

✒ K. Satish




Monday, June 5, 2023

पर्यावरण

नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करा जपून

तेव्हाच सगळी जीवसृष्टी राहील बघा टिकून,

जरूर करा प्रगती पण संपवू नका सृष्टी

भावी पिढीसाठी थोडी ठेवा दूरदृष्टी

✒ K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...