काही नाती ही तुमच्या जन्माबरोबर तुमच्याशी आपसूक जोडली जातात. मग त्या व्यक्ती कशाही असल्या तरी त्यांचे संबंध तुमच्याशी जोडले जातातच.ती म्हणजे रक्ताची नाती. ही नाती निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे नसतो व अशा रक्ताच्या नात्यांविषयी समाजात असा गोड गैरसमज आहे की, ही नाती तुम्हाला कोणत्याही संकटात, बिकट परिस्थितीत साथ देतात, तुम्हाला एकटे पडू देत नाहीत, तुमच्या आनंदात आनंदी होतात व तुमच्या दुःखात त्यांनादेखील वेदना होतात.
परंतु काळाच्या ओघात तुम्ही जसजसे पुढे मार्गक्रमण करत जाता त्यावेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचा समाजातील अनेक घटकांशी संपर्क येतो व त्या अनुषंगाने तुमचे अनेक मित्र, हितचिंतक, तसेच अनेक शत्रूदेखील तयार होतात. ही तुमची नवी नाती असतात जी तुम्ही स्वतः निवडलेली अथवा तुमच्या स्वभावामुळे किंवा कार्यशैलीमुळे तुमच्याशी जोडली गेलेली असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्याचा जोडीदारदेखील नियती तुमच्यावर लादत नाही त्याचीदेखील निवड करण्याची मुभा तुम्हाला असते.
आपल्या समाजात रक्ताच्या नात्यांना खूप महत्त्व दिले जाते. व ही नाती कधीच तुटू शकत नाहीत असा शब्दप्रयोग नेहमी वापरला जातो. परंतु अनेकदा अशा लादलेल्या नात्यांमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. कारण सध्याच्या काळात अपवादाने का होईना आपल्याला स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणारा बापही पाहायला मिळतो, पैशासाठी मुलीला देहविक्रय करायला लावणारे मातापितादेखील पाहायला मिळतात, व्यभिचारापायी स्वतःच्या मुलाचा बळी घेणारी क्रूर मातादेखील पाहायला मिळते, संपत्तीतील हिश्श्यासाठी स्वतःच्याच भावंडांचा जीव घेणारे भाऊ-बहीणदेखील पाहायला मिळतात, तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता स्वतःचे अर्थकारण शून्य करून बसलेल्या व सरतेशेवटी जगण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून देणारी मुलंही पाहायला मिळतात.
मग प्रश्न असा पडतो की, खरंच अशा क्रूरतेमध्ये बरबटलेल्या रक्ताच्या नात्यांना इतके अनन्यसाधारण महत्त्व देऊन त्यात घुसमट होत जगणे योग्य आहे का ?, यांना खरी नाती म्हणावीत का ?
माझ्यामते या विश्वामध्ये ज्या व्यक्तींना...प्राणिमात्रांना तुमच्या आनंदात आनंद वाटतो व तुमच्या दुःखात त्यांनादेखील मनापासून दुःख होते असे सर्वजण मग ते तुमच्या रक्ताचे असोत अथवा रक्ताचे नसोत...ते सर्व तुमचे खरे नातेवाईक समजावे. व याउलट ज्यांना तुम्हाला आनंदात पाहून वेदना होतात व तुमच्या दुःखात जे आनंदी होतात किंबहुना तुम्हाला दुःखी करण्यासाठी जे सतत कार्यरत असतात अशा सर्वांना मग ते रक्ताचे असोत अथवा नसोत, त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर करून आपल्या सुंदर आयुष्याची आनंददायी वाटचाल सुरू ठेवावी. शेवटी या जगात आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी हे जग सोडून जायचे आहेच. मग काही चुकीच्या लादलेल्या नात्यांमुळे तुम्ही तुमचे आयुष्य का वाया घालवावे.
आनंदाने जगा व इतरांनाही जगण्याचा आनंद घेऊ द्या... 🙏🏻
आनंदात तुमच्या ज्याला वाटे आनंद
अन् तुमच्या दुःखामध्ये हळहळे ज्याचे मन
ज्याच्यासंगे द्विगुणित होई तुमचा आनंदी क्षण
तेच तुमचे खरे नाते अन् तेच तुमचे धन
✒ K. Satish