एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्चे...निदर्शने...फाशीची मागणी...राजकीय द्वंद्व....आणि अखेर काही दिवसांनी या सर्वांवर पडदा पडतो व सर्व शांत होतं, जोपर्यंत दुसरी एखादी अत्याचाराची हृदयद्रावक घटना उघडकीस येत नाही तोवर.
अशा घटनांनी खरंच काळीज पिळवटून जाते. परंतु, नीट विचार केलाय का की, या घटना का घडतात व कोण करतं ते. कदाचित आज अशा घटनांवर हळहळ व्यक्त करणारा किंवा आंदोलन करणाराच एखाद दिवशी व्यसनाच्या धुंदीत अथवा अश्लील साहित्याच्या आहारी गेल्याने वासनांध होऊन स्वतःदेखील अशा घटनेस कारणीभूत ठरू शकतो.
हे सर्व आंदोलन, मोर्चा किंवा एखाद्या केसमध्ये शिक्षा करून थांबणार नाही. यासाठी सर्वांना आपले विचार शुद्ध करणे आवश्यक आहे आणि शुद्ध विचारांप्रमाणेच आपले आचरण ठेवणे गरजेचे आहे. सर्व तरुणांनी, आबालवृद्धांनी महापुरूषांचे पौरूषत्व समजून घेणे गरजेचे आहे. हे पौरूषत्व स्त्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात नसून दुर्बल व पीडितांचे रक्षण करण्यात असते.
आज प्रत्येकाने चांगले साहित्य वाचले, अश्लील साहित्य...अश्लील सिनेमे...अश्लील वेबसिरीज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवले, कोणतीही स्त्री समोर आल्यास तिच्याविषयीची आपली दृष्टी साफ ठेवली तरच अशा घटनांना आळा घालता येईल.
यासाठी प्रत्येक पुरूषाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. कारण ज्याच्याकडून हा घृणास्पद अपराध घडतो त्यालाही आई, बहीण बहीण, बायको, मुलगी यापैकी कोणतेतरी नातेसंबंध असतातच ना ? आज एखाद्या दुसर्या स्त्रीसोबत त्याच्याहातून जे घाणेरडे पाप घडेल तेच पाप कदाचित दुसरा नीच वृत्तीचा व्यक्ती त्याच्याही कुटुंबियांसमवेत करू शकतो याचा विचार करण्याची वैचारिक पातळी प्रत्येकामध्ये यायला हवीय.
प्रत्येकाने स्वतःला सुमार्गावर नेण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले तरच अशा घटना घडण्याला आळा बसेल. अन्यथा कितीही आंदोलने, उद्रेक, चिडचिड केली तरीही काही दिवसांनी पुन्हा दुसरी घटना घडल्याशिवाय राहणार नाही आणि तीदेखील लोकांसमोर उघड होईलच असे नाही.
त्यामुळे अशा घटनांनी ज्या ज्या पुरूषांच्या हृदयाला तीव्र वेदना होत असतील त्या सर्वांनी स्वतःचे आचरण व विचार शुद्ध करून स्वतःला व्यभिचारापासून अलिप्त ठेवण्यासाठी सक्षम बनवल्यास खर्या अर्थाने समाज सुधारण्यास मदत होईल. नाहीतर स्वतःचे विचार अशुद्ध ठेवून इतर घटनांमध्ये भावनांचा उद्रेक दाखवणे हा दुटप्पीपणाच ठरेल...नाही का ?
पहा पटतंय का ?
✒ K. Satish
No comments:
Post a Comment