वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी कोटी वंदन...!!!
तुझ्या उत्सवाची सर्वजण वर्षभर वाट पहात असतात. आणि एकदा का तो दिवस आला की, सर्वजण आनंदोत्सवात अगदी आकंठ डुंबून जातात. आणि मग दहा दिवस तुझी मनोभावे पूजाअर्चा करून झाल्यावर, आनंदोत्सव साजरा करून झाल्यावर तुझे विसर्जन करून तुला निरोप दिला जातो.
हे सर्व पाहिल्यावर माझ्या मनात दरवर्षी अनेक प्रश्नांचे काहूर माजते. आणि म्हणूनच तुला पत्र लिहिण्याचा हा अट्टाहास...
हे विघ्नहर्त्या, हा आनंदोत्सव, ही तुझी भव्य आरास, दररोज निरनिराळ्या प्रसादांचे नैवेद्य हे खरंच तुझ्यासाठी असतील का ? मला नक्की माहीत आहे या सर्व बडेजावाची तुला कधीच आवश्यकता नव्हती, किंबहुना अजूनही नाही आणि भविष्यातही नसणार. अरे तू तर स्वतः इतरांना ज्ञान, सुख-समृद्धी, स्वास्थ, स्थैर्य व संपन्नता देणारी देवता. तुला या सर्वांची खरंच आसही नाही आणि आवश्यकताही नाही, हे माझ्या मनाला पक्के माहीत आहे. परंतु, आजकाल मनुष्य इतका स्वार्थी झाला आहे की, तो स्वतःचा बडेजाव दाखवण्यासाठी, एकमेकातील चढाओढीत स्वतःला श्रेष्ठ ठरविण्यासाठी, व स्वतःच्या अहंकारासाठी तुझ्या नावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाचा या दहा दिवसात मोठ्या चतुराईने वापर करून घेतोय. तुझा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी नक्की काय करायला हवे यातच मनुष्याची खरी गल्लत झाली आहे.
आज तुझ्या उत्सवात दमदाटी करून पैसे मागितले जातात, तुझ्या नावाने गोळा केलेल्या पैशांतून आर्थिक गैरव्यवहार केले जातात, त्यातूनच सर्रास मद्याच्या मेजवान्या करताना अनेकांना तुझी भीती न वाटावी इतका मनुष्य निगरगट्ट झाला आहे. तुझ्या आगमनानंतर तुझी प्रतिष्ठापना केल्यावर या दहा दिवसात तुला तुझ्या नयनांनी काय काय पहावे लागते, काय काय सहन करावे लागते हे मी जाणतो. तुझ्यासारख्या आराध्य देवतेसमोर अश्लील हावभाव करणारी उत्साही मंडळी, गर्दीचा फायदा घेऊन स्त्रियांना घाणेरडा स्पर्श करणारे नराधम, कर्कश्श आवाजात वाजणारी गाणी आणि असे बरेच काही.
मला माहितेय हे सर्व तुला असह्य होत असणार. व हे सर्व थांबवून सर्वांना शासन करणे हे तुझ्यासाठी एका क्षणात शक्य आहे. परंतु ही पृथ्वी ज्या सुंदर उद्देशाने निर्माण केली गेली होती त्यातील सर्वात बुद्धिमान व या पृथ्वीला आपल्या बुद्धिकौशल्याने आणखी सुंदर बनवण्याची क्षमता असलेला हा मनुष्य म्हणजे विश्वनिर्मात्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि सध्या हे कलियुग या टप्प्यावर येऊन ठेपले आहे की, जर तू अशा दुष्टांचा नाश करण्याचा विचार केलास तर या पृथ्वीतलावरून मनुष्यप्रजाती लुप्त होण्याच्या वाटेवर जाईल. म्हणूनच तुदेखील संयम बाळगून असणार. कारण मोठ्या परिश्रमाने काही मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून विश्वनिर्मात्याने निर्माण केलेल्या या धरेला टिकवून ठेवून आणखी सुंदर बनवण्याची जबाबदारी तुझ्याच खांद्यावर आहे.
परंतु हे गजानना, आता मनुष्यातील अवगुणांनी अतिशय उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्याचे सर्व सद्गुण आता तोकडे पडत चालले आहेत. मी नक्कीच असे म्हणणार नाही की, या पृथ्वीतलावर सर्वच मनुष्यांमध्ये अवगुण ठासून भरलेले आहेत. कारण काही लोकांमध्ये गुणांच्या तुलनेत अवगुण नगण्य प्रमाणात सापडतील. परंतु अशा सद्गुणी लोकांची संख्या खरंच खूप तोकडी आहे, किंबहुना त्यांचे अस्तित्व देखील जाणवू शकत नाही इतकी ही संख्या कमी आहे.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर, द्वेष, अहंकार या अवगुणांनी आता मनुष्यावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. कधी गुंडांच्या रूपात, कधी बलात्काऱ्यांच्या रूपात, कधी सावकारांच्या रूपात, तर कधी राजनेत्यांच्या रूपात हे विकार उफाळून येऊन दुर्बल घटकांचे शोषण करत आहेत. या पृथ्वीला विद्रूप करण्याचे पातक करत आहेत.
माणसाला सुंदर स्वादिष्ट, पोषक असे अन्न खाण्याची सुविधा तू निर्माण केली होती. परंतु ते विसरून आता त्याला पैसे खाण्याची चटक लागली आहे. आणि यातून तो तृप्त न होता त्याची ही पैशाची भूक वाढतच चालली आहे. व ती भागवण्यासाठी तो खून, दरोडे, घोटाळे, चोऱ्या, भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, दुर्बल घटकांची पिळवणूक, इतकेच काय तर आपल्या मातृभूमीचा सौदा करण्याचे पातकदेखील त्याच्या हातून घडत आहे. तू सर्व मानवजातीला एक समान लेखून या पृथ्वीतलावर स्थान दिले, परंतु राजनेत्यांनी व काही धर्मांधांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या या लेकरांमध्ये जातीधर्माच्या भिंती निर्माण केल्या, एकजुटीने राहणाऱ्या समाजाला तुकड्या तुकड्यांमध्ये विभागून टाकले. व स्वतःच्या स्वार्थापोटी हे जातीधर्माचे विष पेरतच चालले आहेत. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढवतच चालले आहेत. त्यामुळे अनेक निष्पापांचे नाहक बळी जात आहेत.
हे विनायका, आता अति होतंय. आता तू या सर्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या दुष्टांचा नायनाट केल्यास पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती तुला आहे हे मी जाणतो, परंतु यांचा समूळ नायनाट करणे योग्य वाटत नसेल तरी यांच्या अवगुणांना नष्ट करण्यासाठी तुला तुझी लीला दाखवणे आता जरुरीचे झाले आहे.
वादळ, पूर, भूकंप तसेच अलीकडेच हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरससारख्या आपत्त्यांमुळे काही काळापुरता माणसाचा अहंकार लुप्त होऊन जातो. अशावेळी माझ्या मनात विचार येतो, बाप्पा मनुष्याला वठणीवर आणण्यासाठीची ही तुझीच तर लीला नाही ना ?
परंतु अशा संकटाचा आघात होताच भानावर येऊन जीवनाचा खरा अर्थ कळल्याचा दावा करणारा मनुष्य हे संकट निवळताच पुन्हा दुपटीने स्वार्थी बनून कुकर्म करू लागतो ही मोठी शोकांतिका आहे.
अर्थात, मनुष्याला भानावर आणण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची झळ देणाराही तूच आणि नंतर त्यातून सावरणाराही तूच. परंतु, मनुष्य तुझ्या या लीला समजून न घेता अवगुणांचे ओझे पुढे घेऊन जातच आहे.
बाप्पा दरवर्षीप्रमाणे हे दहा दिवस तु या मनुष्यांच्या गर्दीत सामील झाला आहेस. येथे तुला एक क्षण तुझी आरती करून भावनिक आनंद देणारे भक्तगण दिसतील तर इतर संपूर्ण काळ अनैतिक कामात दंग असणाऱ्या, दारू पिऊन धिंगाणा करणार्या, भांडण मारामाऱ्या करणाऱ्या, गाण्यांवर अश्लील हावभाव करणार्या दुष्ट मानवी प्रवृत्तीचा अनुभव येईल.
तुला असह्य होत असले तरी तू हे दहा दिवस या उत्सवाचा भाग होतोस हेच या मनुष्यप्राण्याचे भाग्य.
विसर्जनापूर्वी तुला एकच साकडे घालतो की, तु निर्माण केलेल्या या सुंदर कलाकृतीला म्हणजेच पृथ्वीतलावरील या मनुष्यप्राण्याला त्याच्यातील सर्व अवगुणांना नष्ट करण्याची ताकद तू प्रदान करावीस. व त्या अनुषंगाने होणारी या विश्वाची अधोगती रोखावीस. तसेच ज्याप्रमाणे तु तुझ्या सर्व लेकरांना एकसमान बनवून या पृथ्वीतलावर पाठवलेस त्याचप्रमाणे या सर्व मानवांच्या मनामध्ये एकात्मतेची व मानवतेची भावना जागृत करावीस, पृथ्वीतलावरचे नैसर्गिक चक्र सुरळित चालून आमच्या शेतकरी बांधवांच्या चेहर्यावर हास्य फुलवावेस, आमच्या सर्व भ्रष्टाचारी राजनेत्यांना, जबाबदार अधिकाऱ्यांना, अपराध्यांकडून लाच घेऊन निरपराधांना शासन करणार्या भ्रष्ट पोलिस यंत्रणेला त्यांची समाजाप्रती असलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याची सद्बुद्धी द्यावीस, व सरतेशेवटी सर्व मनुष्यांना मृत्यू हे जीवनातील अटळ सत्य आहे त्यामुळे जोवर या पृथ्वीतलावर तुमचा वावर आहे तोवर या धरेला तुमच्या बौद्धिक कौशल्याने अतिसुंदर बनवण्याचा प्रयत्न करणे हे तुमचे परमकर्तव्य आहे याची प्रखर जाणीव करून द्यावीस ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो.
तुला पत्र लिहिल्यावर डोक्यावरचे ओझे बरेच कमी होऊन आता हलके वाटत आहे. सर्वांसाठी तुझे आगमन सुखावणारे व विसर्जन दुखावणारे असले तरी मी मात्र तसे मानत नाही. कारण तु एका मार्गदर्शकाच्या रूपाने, गुरूच्या रूपाने सदैव माझ्या मनात असतोस. या दहा दिवसांपुरतेच तुझे आदरातिथ्य करण्याचा दिखावा करण्याऐवजी मी तुझी चांगली शिकवण आत्मसात करून, तुझ्यातील सद्गुणांना अंगी भिनवून एक आदर्श मनुष्य बनण्याला महत्त्व देईल.
पुन्हा एकदा तुला माझ्या अंतःकरणापासून वंदन बाप्पा...
दुष्टांमधली दुष्ट प्रवृत्ती
खूप सुंदर आपण गणरायाशी हितगुज साधला पत्राच्या माध्यमातून, शब्दांची निवड उत्तम, आणि खूप भन्नाट अनुभव आला हे पत्र वाचून. खूप साऱ्या शुभेच्या 🌼💐🥳
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...!!! 🙏🏻
Delete