Pages

Sunday, August 27, 2023

नैसर्गिक आपत्ती आणि मानवी जीवन

मानवप्रजाती पृथ्वीतलावरी
असे अति बलशाली हो,
तरीही त्याला हतबल करीतसे
नैसर्गिक कार्यप्रणाली हो


प्रगतीपथावर गेलो जरी तरी
ठाव न लागे निसर्गाचा,
नैसर्गिक आपत्तीपुढे फुटतो
फुगा मानवी अहंकाराचा

   पृथ्वीच्या उगमापासून सर्व जीवसृष्टीच्या संवर्धन व वाढीमध्ये निसर्गाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती, वारा, पाणी, वायू, सूर्य, तारे, जंगल, समुद्र, टेकड्या, हिमनग, डोंगर, माती, खनिजे इत्यादी सर्व नैसर्गिक घटकांवर मानवाची प्रगती आणि मानवी जीवन अवलंबून आहे.
   स्वतःच्या ज्ञानाबरोबरच या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या सहाय्याने मानवाने आपली उत्तरोत्तर प्रगती केली असून त्याअन्वये पृथ्वीवर मानवासाठी असंख्य सुखसुविधांची निर्मिती केली आहे.
   बुद्धीच्या जोरावर मानवाने अशक्य ते शक्य करून दाखवले असले तरी निसर्गाच्या शक्तीपुढे मानव वेळोवेळी हतबल झालेला दिसून आला आहे आणि या शक्तीला आव्हान देण्याचे सामर्थ्य अजून तरी मानवामध्ये आलेले नाही व इथून पुढेदेखील येणार नाही. कारण या शक्तीने रौद्र रूप धारण केल्यास सर्व मानवजाती व जीवसृष्टी क्षणात नष्ट करण्याची ताकद हिच्यामध्ये आहे.
   'आपत्ती' म्हणजे असे संकट जे तुमचे अतोनात न भरून येणारे नुकसान करणारी दुर्घटना. आणि ही जर नैसर्गिक आपत्ती असेल तर तिच्याद्वारे होणारे नुकसान मानवाला वर्षानुवर्षे मागे ढकलून देते अथवा एखाद्या प्रदेशाचा संपूर्ण नायनाट करून टाकते. मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती संपूर्णपणे लुप्त होणे हे त्याचेच एक मोठे उदाहरण आहे.
   भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक, हिमस्खलन, त्सुनामी, दरड कोसळणे, पूर येणे, वणवा पेटणे ही नैसर्गिक आपत्तीची काही उदाहरणे. त्यातच नैसर्गिक प्रदूषणाने अलीकडील काळात काॅलरा, डेंग्यू, कोरोना, बर्ड फ्ल्यू अशा जैविक आपत्तींचाही समावेश झाला आहे.
   नद्यांना पूर येणे, दरडी कोसळणे तसेच जीवाणू - विषाणूंच्या प्रसारामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देणे अथवा त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करणे त्यातल्यात्यात मानवाला सोपे जाते किंवा यापासून होणारे नुकसान त्यामानाने आपल्या आवाक्यातील असू शकते. परंतु, भूकंप, त्सुनामी, हिमस्खलन यांच्यासारखी नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात झाली आणि तीदेखील मानवी वस्त्यांच्या जवळ झाली तर त्यामुळे होणारे नुकसान हे वर्षानुवर्षे भरून न येणारे असते. कारण या नैसर्गिक आपत्त्या निसर्गाच्या पोटात होणाऱ्या अतितीव्र हालचालींमुळे घडून येत असतात. ज्याचा पूर्णपणे अंदाज बांधणे मानवालाही आजतागायत शक्य झाले नाही.
   आत्तापर्यंत या नैसर्गिक आपत्त्यांनी असंख्य घरे उद्ध्वस्त केली आहेत, अनेक जीव मृत्यूमुखी पाडले आहेत. जे लोक या नैसर्गिक आपत्तीचे बळी पडले आहेत त्यांचे जीवन अजूनही अस्थिरच आहे.
   अलीकडेच रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी हे संपूर्ण गावच दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून गेले. तेथील गावाचे अस्तित्व क्षणार्धात नष्ट होऊन गेले. जे कोणी ग्रामस्थ अथवा एखाद्याचे नातेवाईक त्यावेळी गावात हजर नसल्यामुळे वाचले, त्यांचा या घटनेनंतरचा आक्रोश मन सुन्न करून टाकणारा आहे.
   अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा अंदाज बांधणे व या आपत्तींना रोखणे जरी मानव जातीच्या आवाक्याबाहेरील असले तरी या आपत्तींपासून मानवजातीचे आणि इतर साधनसामग्रीचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे हे मानवाच्या हातात नक्कीच आहे. तसेच अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या लोकांचे सर्व आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे त्या लोकांचे योग्य पुनर्वसन करणे हेदेखील अत्यंत महत्वाचे आहे.
   बाकी जंगलतोड, डोंगरावरील अतिक्रमण, आधुनिकतेच्या नावावर होणारे अतिप्रदूषण आणि त्यामुळे वाढत चाललेले पृथ्वीचे तापमान ही तर नैसर्गिक आपत्तींना अतिरिक्त बळ मिळवून देणारी मानवाने केलेली घोड चूकच म्हणावी लागेल.
   मानवाने वेळीच आपल्या चुकीच्या कृतींना आळा न घातल्यास निसर्गाच्या रौद्ररूपापुढे हतबल होऊन मानवप्रजाती नष्ट होण्यास क्षणाचाही विलंब लागणार नाही.
   त्यामुळे सरतेशेवटी सर्व मानवजातीला एवढेच सांगणे की,

जागा हो माणसा वेळ संपत आहे
निसर्गाची घडी झपाट्याने बिघडत आहे,
लखलखत्या दुनियेतून बाहेर पड जरा
निसर्गाला टिकवण्याचा आग्रह आता धरा...!!!

✒ K. Satish