Saturday, March 12, 2022

अडचणींच्या डोंगरावरती वसले शिखर यशाचे

     आयुष्यात पुढे पुढे जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पुढे जाऊन जर काही चांगले घडणार असेल तर अगोदर अनेक वाईट घटना आपल्या आयुष्यात घडत जातात.
     पूर्वी हे घडत असताना खूप त्रास व्हायचा. वाटायचे आपण तर काही चुकीची कृती करीत नाही, तरी आपल्यावर असे आघात का होत असावेत ?....त्यामुळे मन सतत नकारात्मक चक्रात गुरफटले जायचे.
     परंतु, जीवनातील सर्व चढउतारांनी, घडत गेलेल्या घटनाक्रमांनी आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर वाईट घटनांकडे पुढील आयुष्यात चालून येणाऱ्या सुखाची नांदी म्हणून पाहायला शिकवले. त्यामुळे वाईट घटना घडल्यास त्याचे दुःख हे लगेच विरून जाते व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक न राहून सकारात्मक होतो.
     ही मानसिकता लगेच तयार होणे अशक्य आहे. पण असंख्य आघात झेलल्यानंतर जेव्हा त्यातून चांगल्या घटना घडण्याची अनुभूती यायला लागते, तेव्हा आपसूक आपली विचारसरणी सकारात्मक बनू लागते.
     परंतु, अनेकांमध्ये ही प्रगल्भता येण्याआधीच त्यांच्याकडून आत्महत्येचे पाऊल उचलले जाते, अथवा सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची मानसिकता अधिक मोठ्या प्रमाणात विकसित होते.
     आणि याच मानसिकतेमुळे त्यांना या वाईट घटनाचक्राच्या दाट धुक्यांच्या थोडे पुढे सुखद यशाची सोनेरी किरणे पंख पसरून त्यांच्यासाठी उभी असल्याची आणि त्रासाची ही मालिका संपून सुखाचे क्षण उपभोगण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ते पोहोचले असल्याची जाणीवच होत नाही.
     त्यामुळे ज्यांना आपल्या आयुष्यात अजूनही अशा घटनाक्रमांना सामोरे जावे लागले नसेल त्यांनी ( मुख्यत्वेकरून तरूण पिढीने ) येणाऱ्या प्रत्येक वाईट प्रसंगाला, त्रासाला कंटाळून न जाता पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी नक्कीच चांगले घडणार आहे, एखादा चांगला बदल घडून एखादी सुवर्णसंधी आपली वाट पाहत असावी म्हणूनच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही आपली कठोर परीक्षा तर नाही ना ? हा विचार केल्यास घडणाऱ्या कोणत्याही वाईट घटनांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर जास्त काळ राहणार नाही. आणि नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवणारी व्यक्ती सहसा अपयश पदरात पाडून घेत नाही. आणि काही कारणास्तव अपयश आलेच तरीही त्यातून यशाच्या नवीन मार्गाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. व अशा व्यक्तीसाठी यशाचे मार्ग हे आपसूकच खुले होतात.

✒ K. Satish



1 comment:

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...