Thursday, August 26, 2021

खट्याळ वारा

खट्याळ वारा छेडूनी गेला

अंग अंग हे शहारले,

सजनाच्या त्या आठवणीने

लाजेने मी मोहरले

✒ K. Satish



Tuesday, August 17, 2021

मन निर्मळ तू कर स्वतःचे

      ' जीवन '... प्रत्येकाला जीवनात अंधारमय क्षणांना तोंड द्यावे लागते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अशा क्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज करावे लागते. या अंधारमय क्षणांवर मात करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याकरिता सतत प्रयत्नांचे प्रकाशमय दिवे तेवत ठेवण्याची आवश्यकता असते.

     परंतु , बहुतांशी लोक हे दुसर्‍याच्या जीवनातील अंधार पाहून खुश होत असतात. किंबहुना हा अंधार अजून गडद कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. पण दुसर्‍याच्या जीवनातील अंधाराचा आनंद घेण्याच्या आणि तो अजून काळाकुट्ट करण्याच्या नादात असे लोक आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी लागणारे पुरेसे प्रयत्न करण्यास विसरूनच जातात. व दुसर्‍याचे आयुष्य अंधारमय बनवण्याच्या नादात स्वतःच कधी अंधाराच्या गर्द छायेत स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला ढकलून देण्यास कारणीभूत ठरतात हे त्यांना कळतच नाही.

अंधार दुसर्‍याच्या जीवनातला
पाहूनी होतो आनंद का ?,
कपट मनामध्ये ठेवून असा रे
आयुष्यामध्ये जगतो का ?

वृत्ती नाही चांगली ही तर
घातक ठरेल तुलाच रे,
मन तू निर्मळ कर स्वतःचे
दिशा नवी जीवनाला दे

✒ K. Satish





Thursday, August 12, 2021

लपवू शके सूर्यास न कोणी

   सूर्याला आणि त्याच्या प्रकाशाला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही त्याला झाकू शकत नाही. फार फार तर तुम्ही तुमचे डोळे बंद केल्यास अथवा डोळ्यासमोर हात धरल्यास तो काही काळापुरता तुमच्यासाठी झाकला जाईल.

   परंतु , जास्त काळ तुम्ही त्याचा तिरस्कार करून त्याचे महत्त्व कमी करू शकत नाही. उलट अशा कृतीमुळे तुम्ही तुमचेच नुकसान करून बसता.

   सूर्य मात्र स्वतः प्रकाशित राहून इतरांना प्रकाशमय करण्याचे त्याचे कार्य आजतागायत करत आलाय आणि इथून पुढेदेखील करत राहील. अगदी त्याच्या अंतापर्यंत.

आणि सूर्याच्या याच गुणाचा आदर्श घेऊन अखेरच्या श्वासापर्यंत जगणे मला पसंत आहे.

✒  K.Satish



कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...