नमस्कार,
आजकाल शिक्षणाची स्पर्धा इतकी वाढली आहे, की सध्याची पिढी ही अभ्यास एके अभ्यास व मार्कांची शर्यत यांच्यातच गुरफटून गेली आहे. आणि अतिमहत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन पालकच नकळत मुलांना या शर्यतीत ढकलत असतात.
आणि मग बहुतांशी मुलांना सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाची जपणूक करायचे फक्त धडेच दिले जातात. परंतु प्राधान्याने या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पाडून त्यांच्या कृतीत उतरवायला पालक कमी पडतात.
भविष्यात ही गोष्ट मानवी जीवनासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. कारण युवा पिढीमधील धडाडी आणि कोणतेही काम तडीस न्यावयाचा जोश इतर सर्व पिढ्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे युवा पिढीस योग्य मार्गदर्शन करून योग्य समाजोपयोगी कृती त्यांच्याकडून घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे.
श्रीयश आणि त्याचा मित्रपरिवार यांचे हे दहावीचे वर्ष, आणि तेही ICSE बोर्डाचे. तरीही तो व त्याचा मित्रपरिवार नित्याने दररोज पुण्यातील विविध भागात सायकलिंग करीत असतात. कधी सिंहगड, तर कधी हनुमान टेकडी, कधी पर्वती तर कधी बाणेर हिल्स.
अशाच गप्पा मारता मारता पावसाळा नजीक आल्यामुळे टेकडीवर वृक्षारोपण करण्याच्या विषयावर शिक्कामोर्तब झाले. मग या सर्व मित्रमंडळींनी पुण्यात सायकलवर जाऊन विविध प्रकारची अकरा रोपे वृक्षारोपणासाठी आणली. ( ताम्हण, करंज, टेंभुर्णी, धावडा, कांचन, करमळ, रोहितक, मुचकुंद, जांभुळ, चिंच ).
रोपे आणायला गेलेले हे चौघेच...श्रीयश, अनुज, प्रतिक आणि रोहित. आणि वृक्षारोपण करतेवेळी देखील रोहितला वैयक्तिक कारणास्तव जाणे शक्य न झाल्यामुळे वृक्षारोपण करायची जबाबदारी उरलेल्या तिघांवर येऊन ठेपली. तरीही नियोजित वेळापत्रकानुसार आज श्रीयश, अनुज व प्रतीक यांनी वृक्षारोपणाची जबाबदारी पार पाडली. इतरही पर्यावरणप्रेमी तिथे वृक्षारोपण करून जात असताना त्यांची या तिघांशी गाठ पडली व त्यांनीही यांचे कौतुक करून यांना प्रोत्साहन देऊन यांचा उत्साह वाढवला.
सध्या आपला अभ्यास सांभाळून अशा स्तुत्य समाजोपयोगी कामांमध्ये योगदान देण्याचे महत्वपूर्ण पाऊल या चौघांनी टाकले असले तरी भविष्यात त्यांचा इतर मित्रपरिवारदेखील अशा कामांमध्ये त्यांना जोडला जाईल. अर्थातच त्यात सर्वात मोठी जबाबदारी पालकांची आहे. पालकांनी सतत शालेय अभ्यासाचा रेटा मुलांच्या मागे न लावता मुलांना इतर समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमांमध्ये आपले योगदान देण्यासाठी प्रेरित करायला हवे.
निसर्गाची आणि देशाची विस्कळीत झालेली घडी सुरळीत करण्याचे सामर्थ्य जर कोणात असेल तर ती म्हणजे आपली युवा पिढी.
चला तर मग या युवा पिढीला योग्य मार्ग दाखवून त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि नव्या उमेदीचा उपयोग करून आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदी बनवूया...
धन्यवाद.....!!! 🙏🏻
✒ K. Satish
Nice work
ReplyDelete