Pages

Sunday, February 28, 2021

गरज राजकीय प्लास्टिक सर्जरीची

     आपल्या देशात आजतागायत चालत आलेल्या राजकारणाविषयी माझं मत काही चांगलं नाहीच. त्यामुळे मी राजकारणाचा सतत तिरस्कारच करत आलोय.

     परंतु काळाच्या ओघात हे कळून चुकलंय की, राजकारणाचा तिरस्कार करून दुर्लक्षित करणारी ही बाब नाहीये. कारण राजकारणाशिवाय देश चालूच शकत नाही. देशातील समस्यांचे, जनतेच्या अडीअडचणींचे निराकरण करणे शक्य होणार नाही. आणि म्हणूनच माझे असे मत झाले आहे की, इथून पुढे जर का देशातील जनतेला सुखी ठेवून, सर्व देशात शांतता, बंधुभाव आणि समतेचे राज्य प्रस्थापित करून आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर राजकीय क्षेत्रात चांगल्या विचारांनी प्रेरित झालेल्या... तोडा, फोडा आणि राज्य करा या  जुन्या राजकीय पद्धतीला फाटा देणार्‍या सुविचारी तरूण तरुणींनी सहभाग घ्यायला हवा.आणि अशा असंख्य तरूण- तरुणींची एक मोठी फळी तयार होणे गरजेचे आहे.

     फक्त दुर्दैवाने हे नमूद करावेसे वाटते की, चांगल्या विचारांच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळावावयाचे असेल तर सध्याच्या प्रस्थापितांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे सुदृढ बलवान शरीर आणि पैसा यांची साथ असणे आवश्यक झाले आहे. कारण सत्ता, पैसा आणि ताकद यांच्या प्रभावाखाली दबून देशातील जनता स्वाभिमानाने जगणेच विसरून गेली आहे. व त्याचबरोबर राजकीय भक्तीला उधाण येऊन जनतेला या गोष्टीचा विसर पडलाय की, आपला भारत देश म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राष्ट्र आहे. आणि राजकीय पुढारी हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन देशाचा कारभार चालवणारे आणि त्याअनुषंगाने जनतेच्या सामाजिक आणि मूलभूत समस्या सोडवून त्यांना चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे एक जनसेवक आहेत.

     आणि म्हणूनच या सर्व जनतेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करावयाचे असेल तर आत्ताच वर सांगितल्याप्रमाणे बदल घडायला सुरूवात होणे आवश्यक आहे.

     आणि हे अवघड आहे परंतु अशक्य मुळीच नाही.

     वेळ आणि परिस्थितीनुसार अशक्यदेखील शक्य होते.

     आत्ता जर सुरूवात झाली तर कदाचित आत्ताच्या पिढीला त्याचे पाहिजे तसे परिणाम पहावयास मिळणार नाहीत. परंतु, पुढील पिढीस मात्र नक्कीच खर्‍या अर्थाने आपण जनतेच्या राज्यात, खर्‍या लोकशाहीसंपन्न देशात राहत असल्याची अनुभूती येईल.....!!!


धन्यवाद...!!!

✒ K. Satish



No comments:

Post a Comment