Pages

Thursday, December 31, 2020

नववर्षाभिनंदन म्हणजे काय ?

गतवर्षात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घ्यावा...


त्यातील वाईट, कष्टदायी, वेदनादायी घटनांमधून पुढील आयुष्य सुखकर करण्यासाठी योग्य तो बोध घ्यावा व त्या कटू आठवणींना उराशी न बाळगता कायमची तिलांजली द्यावी.


मागील कालखंडात बर्‍याच चांगल्या वाईट व्यक्तींशी संबंध आला असेल, त्यातील स्वार्थी मतलबी हितशत्रूंना ओळखून आपल्या पुढील आयुष्यात स्थान देऊ नये...

परंतु, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणार्‍या, तुम्हाला सतत प्रोत्साहन देणार्‍या आणि तुमच्या वाईट प्रसंगातही तुमच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या तुमच्या हितचिंतकांना कधीही गमावू नये...


या पृथ्वीतलावर आपल्याला जो मानवजन्म मिळाला आहे ती आपल्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. तिच्या अनुषंगाने आयुष्यात येणार्‍या प्रत्येक वळणावर असे काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा मनी बाळगावी की, ' मरावे परी किर्तीरूपी उरावे ' ही म्हण आपल्याला तंतोतंत लागू होईल.


आयुष्य हे खूप सुंदर आहे... चला त्याला नव्या उमेदीने अतिसुंदर बनवण्याचा संकल्प करूया.

नवीन वर्षात आपल्या देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी हिरीरीने काहीतरी अद्वितीय करून दाखविण्याची ऊर्जा तुम्हाला प्राप्त व्हावी हीच माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांकडून व माझ्या सर्व हितचिंतक मित्रांकडून आपणा सर्वांना मनःपूर्वक सदिच्छा....!!!!

    धन्यवाद...!!! 🙏🏻

✒ K. Satish





Wednesday, December 30, 2020

कौशल्य

छोट्या समस्यांनादेखील

जबाबदारीने हाताळणे आवश्यक असते,

कारण थोडी जरी चूक झाली तर मग

परिस्थिती अधिकच अवघड होऊन बसते

✒ K. Satish



Monday, December 28, 2020

मानाचा मुजरा

अपयशाच्या काळोखातूनी घेतली उंच भरारी

पादाक्रांत केली यशाची शिखरे सारी


टाटा परिवारामध्ये आहे त्यांना मानाचे स्थान

या परिवाराचा प्रत्येक सदस्य गातो त्यांचे गुणगान


मान देती कर्मचार्‍यांना ते मानत नाहीत गुलाम

म्हणूनच सारी दुनिया करते झुकूनी त्यांना सलाम


टाटा समूहाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एक अनमोल रत्न....

यशाच्या शिखरावर असतानाही त्याचा थोडादेखील अहंकार न बाळगता सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून देशसेवा व माणुसकी जपणारे सर्व भारतीयांचे लाडके आदरणीय श्री. रतन टाटा साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व टाटा मोटर्स परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा...!!!

✒ K.Satish



Sunday, December 27, 2020

लोभसवाणे हास्य

हातात तुझिया हात हा माझा

तुझ्यात माझा जीव गुंतला,

लोभसवाणे हास्य पाहूनी

स्वर्गसुखाचा अनुभव आला

✒ K. Satish



Thursday, December 24, 2020

कार्याची उंची

कार्याची उंची इतकी वाढवा की,

विरोध का करावा

हा प्रश्न प्रत्येकास पडेल

✒ K. Satish





Wednesday, December 23, 2020

खरेदी

मूलतः बायकांना असते

खरेदीची हौस लय भारी,

अन् खरेदी रंगात आल्यावर संपू शकते

नवर्‍याची पगार सारी

✒ K. Satish





Tuesday, December 22, 2020

बालपण

जीवन झाले धकाधकीचे

शांत झोप मज येईना,

छोटी छोटी मुले पाहूनी

वाटे बालपण यावे पुन्हा

✒ K. Satish



Monday, December 21, 2020

तुटेपर्यंत ताणू नये

           रबराच्या ताणाची मर्यादा ही ठरलेली असते. त्या मर्यादेत त्याचा वापर करून घेतल्यास  तो अधिक काळ निरंतर आपल्या उपयोगी पडू शकतो. परंतु , त्याच्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण दिल्यास त्याच्या मर्यादेचा अंत होऊन तो तुटून पुन्हा कधीच तुमच्या कामी येत नाही आणि तुटताना त्याच्या फटक्याचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो.

           त्याचप्रमाणे, एखाद्या हुकूमशहाने आपल्या गुलामांवर वर्चस्व ठेवण्याकरिता त्यांना किती त्रास द्यावा अथवा त्यांच्यावर किती प्रमाणात अन्याय करावा ह्याची मर्यादा त्याने ठरवायला हवी. एका मर्यादेपर्यंत गुलामालाही गुलामीची जाणीव होत नाही किंवा तो त्या गुलामीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत नाही.

            परंतु , हुकूमशहाने अतिमाज केल्यास आणि त्यांच्या सहनशक्तीपलीकडे अत्याचार करून त्यांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या छळास कंटाळून त्यांना बंड करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही आणि मग अशा विद्रोहाला सामोरे जाण्याची ताकद कितीही मोठ्या हुकूमशहात उरत नाही.

            त्यामुळे पैसा आणि सत्तेचा माज करून लोकांना गुलाम बनविण्यापेक्षा, ह्याच पैसा आणि सत्तेचा वापर जनतेच्या उद्धारासाठी केल्यास जनता स्वतःहून हसतमुखाने तुमची अनुयायी बनण्यास तयार होईल.

            ह्या पृथ्वीतलावर असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे आणि प्रत्येकाची जीवनशैली निरनिराळी आहे. त्यातल्या त्यात मनुष्यप्राणी हा सर्वात निराळा आहे. त्यामुळे माणसाला माणसाप्रमाणे वागणूक देणे हे प्रत्येक मनुष्यप्राण्याचे परमकर्तव्य आहे. आणि हे कोणीही विसरता कामा नये.

                               माज सोडून सत्कार्य करा,

                              ताकद तुमची लावून पणाला 

                               गोरगरिबांचा उद्धार करा....!!!


                                                                      धन्यवाद........!!!

✒K. Satish



Sunday, December 20, 2020

थोर समाजसुधारक - संत गाडगेबाबा

पैशाची चणचण असेल तर जेवणाची भांडी विका.

दागदागिने खरेदी करू नका. तुटक्या फुटक्या घरात रहा. पण मुलांना शिक्षण अवश्य द्या.


शिक्षणाविषयी अतिशय मार्मिक टिप्पणी करणारे,

शिक्षणाला अतिशय महत्त्व देणारे, शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून सांगणारे,

मानवतावादी विचारांचा प्रसार करून अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला चढवणारे,

स्वच्छतेचे महत्त्व लोकांना आपल्या कृतीद्वारे पटवून सांगणारे अखंड भारतातील महान संत - थोर समाजसुधारक

' संत गाडगेबाबा '

यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish



काव्यमैफिल

मैफिल काव्यांची ही सजली

पाऊस शब्दांचा हा पडला,

भावनांच्या असंख्य गारांनी

आसमंत हा भरूनी गेला

✒ K. Satish







Friday, December 18, 2020

खात्री यशाची

जग हे चालते सर्वांवर

मग मीपणाचा हव्यास का,

सोबत घेऊनी सर्वांना

मिळेल यश नक्कीच पहा

✒ K. Satish





Tuesday, December 15, 2020

अर्धांगिनी

सुखदुःखाच्या क्षणी तिचीच साथ होती मजला

झाले अवघड कितीही जगणे हिंमत तीच देते मजला

अपयशाच्या काळोखातही साथ तिचीच मोलाची

यशाचा माझ्या रंगमहालही तिच्यामुळेच सजला...!!!

✒ K. Satish



Monday, December 14, 2020

अशीही शिक्षा

माझे वाईट करणार्‍यांचे, वाईट चिंतनार्‍यांचे आणि माझ्याशी दगाबाजी करणार्‍यांचे

मी वाईटही केले नाही आणि चांगलेही केले नाही.

फक्त त्यांना माझ्यापासून दूर ठेवले.

तेच त्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरले.

✒ K. Satish



Sunday, December 13, 2020

वेळ

तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करण्यासाठी कोणीतरी अविरतपणे विचार करीत असतो. स्वतःच्या प्रगतीपेक्षा त्याला तुमच्या अधोगतीमध्ये जास्त स्वारस्य असते. अशा व्यक्तींचे मनसुबे फोल ठरवायचे असतील तर तुम्हालाही अडचणींचे पाढे वाचत बसण्यापेक्षा उचित ध्येय गाठण्यासाठी अविरत कष्ट करण्याच्या मानसिकतेला बळ दिले पाहिजे. प्रत्येक क्षणाला अनमोल समजून त्याचा योग्य वापर करून घेतला पाहिजे.


ज्याला वेळेची किंमत कळली

त्याला आयुष्याची किंमत कळली,

या मानवी जन्माची किंमत कळली...

✒ K. Satish



Saturday, December 12, 2020

भेळ तिथं खेळ

 ' भेळ तिथं खेळ ' हा शब्दप्रयोग अनेकदा ऐकिवात येतो.

स्वार्थी, मतलबी, अप्पलपोट्या व्यक्तींसाठी याचा वापर केला जातो. चमचेगिरी अन् लोचटपणामध्ये या लोकांचा हातखंडा असतो. ज्या झाडाला बहर येईल त्यावर बसून गोड फळे चाखायची हेच यांचे उद्दिष्ट...

दुसरे एखादे अति बहरलेले झाड दृष्टीक्षेपात आल्यास हे लगेच सध्याच्या झाडाला सोडून त्या बहरलेल्या नव्या झाडावर जाऊन तेथील मधुर फळांचा आस्वाद घेण्यासाठी तत्पर असतात. आणि हे महाभाग एवढ्यावरच न थांबता जुन्या झाडाच्या घेतलेल्या मनमुराद आस्वादाची जाणीव न ठेवता, दुसर्‍या झाडावर बसून त्या जुन्या झाडाचीच निंदानालस्ती करून त्याचे अवगुण सांगू लागतात.

त्यामुळे नवीन बहर येणार्‍या झाडांनी अशा ' भेळ तिथं खेळ ' या उक्तीप्रमाणे वागणार्‍या स्वार्थी चमच्यांना वेळीच ओळखावे. अन्यथा काही दिवसांनी तुमच्यापेक्षा अधिक बहारदार झाड यांच्या दृष्टीक्षेपात आल्यास हे तुम्हाला सोडण्यात क्षणाचाही विलंब न करता त्या नवीन बहारदार झाडाचे गुणगान गायचा आणि तुमच्या अवगुणाचा पाढा वाचायचा नवा अध्याय सुरू करतील.

आणि अशा चमच्यांच्या गर्दीत तुम्ही खर्‍या हितचिंतकांना आणि समर्थकांना गमावून बसाल.


' भेळ तिथं खेळ '

स्वार्थी लोकांचा बसत नाही

कोणा एकाशी मेळ

✒ K. Satish





Tuesday, December 8, 2020

शेतकरी

आई मानून धरतीला

शेतात राबतो वर्षभरी,

तरीही होतो पुरता हतबल

या मातीतला शेतकरी

✒ K. Satish



Monday, December 7, 2020

माणसं ओळखण्याची कला

चांगल्या माणसांच्या रागावण्याचा राग मानायचा नसतो...

कारण,

त्यामागे आपला मार्ग चुकू नये हाच उद्देश असतो.


गोड बोलून घात करणार्‍या स्वार्थी लोकांपेक्षा....

तोंडावर रागावणारे परंतु मनातून आपले हित पाहणारे हितचिंतक बरे


माणसं ओळखणे ही देखील एक कला आहे.

आणि ज्याला ती जमली तो नकळत होणाऱ्या मानसिक त्रासापासून स्वतःला दूर ठेवू शकतो.

✒ K. Satish



Saturday, December 5, 2020

आभाळं फाटले, धरणी दुभंगली

आभाळं फाटले, धरणी दुभंगली

जेव्हा मावळला तो सूर्य

काळरात्र ही जागली


विश्ववंदनीय

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,

परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस

विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish