आजकाल सोशल मिडीया हे माध्यम म्हणजे नवीन पिढीसाठी खरेतर एक वरदान आहे. परंतु या वरदानाला अतिउत्साही, काही अंशी अहंकारी आणि सामाजिक भान नसणारी मंडळी शापामध्ये परिवर्तित करीत आहेत.
आजच्या या अतिजलद व धकाधकीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य होत नाहीये. तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येकाला व्यक्त होता येत आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास या माध्यमाद्वारेच त्वरीत मदत पुरवणे शक्य होत आहे. या प्रगतीमुळेच वर्षानुवर्षे दूर असलेल्या मित्रमंडळींची पुन्हा गाठभेट होणे शक्य झाले आहे.
आपला व्यवसाय वाढवणे, चांगल्या विचारांचा प्रसार करणे, सामाजिक एकात्मतेला जोपासण्यात सुद्धा हिचा महत्वाचा वाटा आहे.
पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा या माध्यमांचा योग्य आणि चांगल्या मानसिकतेतून उपयोग केला जाईल.
परंतु दुर्दैवाने काही अपप्रवृत्तींमुळे म्हणा अथवा प्रत्येक गोष्ट ही थट्टेवारी नेऊन त्याची मजा बघणार्या व्यक्तींमुळे म्हणा, सोशल मिडीयाचा सध्या सर्रास गैरवापर होताना दिसत आहे. काही लोक तर आपल्या अहंकारी वृत्तीमुळे एकाच पोस्टचा वापर सोयिस्कररित्या आपल्याला आवडणार्या महापुरूषांच्या, संतांच्या, नेत्याच्या नावाने तसेच आपल्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या नावाने करताना दिसतात. आणि इतर मंडळीही पूर्णपणे न वाचता अशा पोस्ट व्हायरल करतात. आत्ताच्याच परिस्थितीतील कोरोना व्हायरसविषयी बघितले तर एका चुकीच्या पोस्टने पोल्ट्री व्यवसाय हा काहीही कारण नसताना नेस्तनाबूत होताना दिसला. कित्येक संसार उद्ध्वस्त होताना दिसले.
हे समाजातील घटक नव्हते का ? अशा चुकीच्या बातम्या पूर्ण गांभीर्याने विचार न करता पुढे पाठवणे हे कुठेतरी आपण सामाजिक भान विसरल्याचे लक्षण नाही का ?
आजच्या अशा बिकट प्रसंगी सूज्ञ म्हणवणार्या लोकांनी भीती पसरवण्याऐवजी सर्वांमध्ये हिम्मत निर्माण करून सर्वांना धीर द्यायला हवा.
आपण लहानपणी नेहमी एक गोष्ट ऐकत आलोय. ' भीतीचे विष '....जर एखाद्या माणसाला मुंगी चावली आणि त्याच्या समोरून जर साप गेला तर तो माणूस भीतीनेच मरतो. प्रत्यक्षात त्याला साप चावलेला नसतो. आणि दुसरीकडे एखाद्याला एखादा बिनविषारी साप चावून गेलेला असतो. परंतु त्याचे सापाकडे लक्ष न जाता तो मुंगी चावली असेल असे समजून थोडे चोळून आपल्या कामाला लागतो. त्याला काहीच होत नाही.
सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कुठल्याही आजारापेक्षा त्या आजाराच्या भीतीची तीव्रता जास्त असते. त्यामुळे सूज्ञ समाजाने, सामाजिक जबाबदारी असणार्या प्रसारमाध्यमांनी आणि सोशल मिडीयावर कार्यरत असणार्या सर्व नागरिकांनी भीती पसरवणे व भीती बाळगणे सोडून या आजाराची लक्षणे असणार्या रूग्णांना धीर देण्याची, सावधानता व निगा राखण्याविषयी प्रबोधन करण्याची व संकटाला निर्भीडपणे तोंड देण्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्याची गरज आहे, असे मला वाटते. आणि हे तुम्हा आम्हा, सार्यांचे परमकर्तव्य आहे. कारण
' सृष्टी आहे तर जीवन आहे.
जीवन आहे तर मनुष्य आहे.
आणि मानवजातीला वाचवण्याची ताकदही मनुष्यात आहे.
व तिला संपवण्याचे अस्त्रही त्याच्याच हातात आहे. '
धन्यवाद...!!!
✒ K. Satish
अप्रतिम
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...!!! 🙏🏻
ReplyDelete