Saturday, August 15, 2020

उपेक्षित पोशिंदा

     कोरोना या विषाणूची महाभयंकर साथ आली आणि तिने काही काळातच संपूर्ण जगाच्या धकाधकीच्या जीवनाला लाॅकडाऊनचे कुलूप लावून स्तब्ध करून टाकले.
     क्षणाक्षणाला पैसा कमावण्यासाठी, उचित ध्येय गाठण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरू होती. आणि इथून पुढील काळात या अशा धकाधकीच्या जीवनाशिवाय शांततेने जीवन जगता येऊ शकेल ही कल्पनाच कालबाह्य होत चालली होती. परंतु, शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न उद्भवल्यावर सर्वांना नाईलाजाने थांबावेच लागले. कारण हा देह असेल आणि त्यात प्राण असेल तरच या धावपळीला, प्रगतीला, ऐशआरामाच्या वस्तूंना आणि आजकाल सर्वांत जास्त महत्व प्राप्त झालेल्या पैशाला अर्थ आहे. म्हणून मग सगळेजण उद्याची चिंता सोडून स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी किंबहुना पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यप्राण्यांचे जीवन वाचवण्यासाठी घरात बंदिस्त होऊन जगू लागले.
     या अनपेक्षित बंधनाचा उपयोग प्रत्येकजण स्वतःच्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या कलागुणांना वाव देणे, वाचन - लिखाण, बैठे खेळ खेळणे, निरनिराळ्या पाककृती शिकणे, एखादी सुप्त आवड जोपासण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही तिला चालना देणे...अशा निरनिराळ्या मार्गातून करू लागला.
     हे सर्व करताना थोडा फार त्रास सर्वांना सहन करावा लागला. आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. भविष्याचे प्रश्नचिन्ह कित्येकांच्या पुढे उभे राहिले परंंतु तरीही कोणाचे जगणे थांबले नाही. कारण दोन वेळचे, नाहीतर किमान एका वेळेचे जेवण तरी सर्वांना मिळत होते. बाकी व्यवहार थांबले तरी जगण्यासाठी या शरीराला अन्न मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जग थांबले तरी सर्वांना जगवण्यासाठी लागणारे अन्नधान्य, भाजीपाला पिकविणारा शेतकरी हा या मानवजातीला त्यांच्या आयुष्यातील या विलक्षण संकटातदेखील हा मानवी देह टिकवून ठेवण्यासाठी लागणार्‍या अन्नाची सोय करण्यासाठी राबत होता.
     खरंच या संकटाने निसर्ग, शेती आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या या पृथ्वीतलावरील उपयुक्ततेची, आवश्यकतेची सर्वांनाच प्रकर्षाने जाणीव करून दिली आहे. या प्रगतीच्या युगात आपण अनेक अत्याधुनिक उपकरणे, आलिशान गाडी, मोठा बंगला, ऐशआरामातील जीवनशैली यांच्या मोहात पडून वाहवत गेलो होतो. परंतु या दोन अडीच महिन्यात सर्व मानवजातीला या ऐशआरामाच्या जीवनाचा उपभोग घेणे तर दूरच... पण त्याची आठवणदेखील झाली नाही. परंतु पोटाला अन्न मात्र प्रत्येकाला हवे होते. कारण या सर्व आभासी दुनियेतील सुखांचा उपभोग घेण्यासाठी हा देह आणि त्यामध्ये प्राण असणे आवश्यक आहे. आणि हा देह जगवण्यासाठी अन्न आणि पाण्याने त्याचे पोषण करणे जरुरीचे आहे. त्यामुळे पुरेसे अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध असल्याने वेगवान आयुष्याला ब्रेक लागूनही मानवजातीला ब्रेक लागला नाही.
     या परिस्थितीतून एक प्रश्न समोर उभा राहतो की, भरपूर संपत्ती असणार्‍या, उच्च आलिशान जीवनशैली जगणार्‍या (अर्थात हाय-फाय लाईफस्टाईल जगणार्‍या ), असंख्य लोकांच्या लवाजम्यात अनेक अंगरक्षक सोबत घेऊन फिरणार्‍या लोकांना मान देण्याची, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची या जगात प्रथाच पडली होती. परंतु, मानवासाठी सर्वात अत्यावश्यक असलेले अन्नधान्य व भाजीपाल्याची सोय करणार्‍या शेतकरी राजाला मात्र त्याच्या या महान कार्याबद्दल कधी एवढा मानसन्मान दिला गेला नाही.
     आतातरी सध्याच्या परिस्थितीतून सर्वांनी बोध घ्यावा. नुसते शेतीप्रधान देश म्हणून चालणार नाही, तर शेती ही प्रथमस्थानी नजरेसमोर ठेवून शासनानेदेखील पुढील आराखडा तयार करायला हवा. देशाची प्रगती करताना प्रथम शेतीला वैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहे. शेतकरी राजाला फक्त नावापुरते राजा म्हणून चालणार नाही, तर त्याच्या कार्याची योग्य दखल घेऊन त्याला यथोचित मानसन्मान दिला गेला पाहिजे.
     मला निश्चित खात्री वाटते की, मानवाने कितीही प्रगती केली तरी भविष्यकाळात जो देश शेतीला प्राधान्य देऊन प्रथम क्रमांकाचा व्यवसाय बनवेल, जास्तीत जास्त तरूणपिढीला शेती करण्यासाठी प्रेरित करेल किंबहुना तरूणपिढी शेतीकडेच आकर्षित होईल अशी अभूतपूर्व क्रांती या व्यवसायात घडवून आणेल. त्या देशासमोर सर्व मानवजातीला नतमस्तक व्हावेच लागेल.

सर्व शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करून 
सर्व मानवजातीतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो...!!!

✒ K. Satish

 

2 comments:

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...