महापुरुषांचे कार्य सदैव थोर आणि महानच राहिले आहे. आणि सर्वांनी त्यांच्या कार्यातून आणि शिकवणीतून नेहमी जनकल्याणाचा आणि मानवहिताचाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे.
परंतु या सर्व महापुरुषांच्या कार्याचा उदात्त हेतू एकसारखाच ( मानवतावादी ) असला तरी सर्वांच्या धोरणांमध्ये, कार्यशैलीमध्ये आणि वैशिष्ट्यांमध्ये भिन्नता होती.
मी स्वतः तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, संत गाडगेबाबा या महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आयुष्यात मार्गक्रमण करतो आहे. या महापुरुषांचे कार्य इतके मोठे आहे की, त्या मार्गावर काही प्रमाणात जरी आपल्याला वाटचाल करता आली तरी समाजातील बहुसंख्य समस्या दूर होतील.
आता बहुतेकांच्या मनात प्रश्न उद्भवला असेल की, यातील काहींचा मार्ग शांततेचा, काहींचा बंड पुकारण्याचा, काहींचा शत्रूलाही क्षमा करण्याचा संदेश तर काहींची गुन्हेगाराला शासन करण्याची न्यायप्रणाली. मग जर या सर्व महापुरूषांचा आदर्श घेऊन वाटचाल करावयाची झाल्यास ते कसे शक्य होईल ?
प्रश्न बरोबर आहे. परंतु सर्वप्रथम इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे या सर्वांचे विचार हे मानवतावादी व जनकल्याणाचे होते. आणि मी स्वतःही या सर्व महापुरुषांच्या धोरणांचे आयुष्यात प्रत्येक क्षणी काटेकोरपणे पालन करू शकत नाही. कारण सध्याच्या काळात आपल्याला प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि त्यामुळेच या सर्व महापुरुषांच्या विचारांचा माझ्यावर पगडा असल्यामुळे मला या सर्वांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वाचा आणि भिन्न कार्यशैलीचा उपयोग मानवहिताच्या समस्या सोडवताना अगदी चांगल्याप्रकारे करता येतो.
काही समस्या तथागतांच्या शांततेच्या मार्गाने सुटतात. त्यावेळी त्यांचा आदर्श कामी येतो. जनकल्याणासाठी कधीकधी छत्रपतींच्या गनिमीकाव्याचे तंत्र, योग्य युद्धनीती आणि सर्वसामान्यांना घेऊनही योग्य रणनीती आखून शत्रूला नामोहरम करण्याच्या तंत्राचा उपयोग होतो. छत्रपती संभाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवल्यास निस्वार्थीपणे समाजासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते. परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतः अन्याय, हालअपेष्ठा सोसूनही हार न मानता इतर पीडित, शोषित, तळागाळातील लोकांच्या हक्कासाठी संपूर्ण जीवन अर्पण करण्याच्या त्याग भावनेमुळे आणि ज्या देशात एकेकाळी अपमानाचे जीवन जगायला लागले त्याच देशाच्या हितासाठी आणि देशप्रेमाखातर त्या देशाची राज्यघटना लिहिण्याचे उदात्त कार्य पाहून आयुष्यात शेवटपर्यंत हार न मानण्याची प्रेरणा मिळते. नेताजींमुळे हुकूमशाहीला सडेतोड उत्तर देण्याची जिद्द निर्माण होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य पाहून समाजसेवा आणि समाजातील सर्व वर्गातील माणसे ही समान असून सर्वांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्याची स्फूर्ती निर्माण होते. छत्रपती शाहू महाराजांनी तर सर्वांसमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहे. शासन चालवताना वेळप्रसंगी प्रस्थापितांचा रोष पत्करूनदेखील दीनदुबळ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारे व तात्पुरती मदत करण्यापेक्षा मूळ समस्येवर पूर्णपणे तोडगा काढून त्यावर उपाययोजना करणार्या छत्रपती शाहूमहाराजांचे विचार खूप काही सांगून जातात. संत गाडगेबाबांनी तर अंधश्रद्धा निर्मूलन व स्वच्छता या अतिशय महत्वाच्या मुद्यांना हात घातलाय. कारण कोणताही लढा द्यायचा असेल, प्रगतीपथावर वाटचाल करायची असेल तर शरीर स्वास्थ्य सांभाळणे स्वच्छतेशिवाय शक्य नाही आणि अंधश्रद्धेत गुरफटून गेल्यास तुम्ही स्वतःचा वेळ व पैशांचा तर अपव्यय करताच परंतु वैयक्तिक स्वास्थ्य व समाजस्वास्थ्यही बिघडवण्याचे काम करता.
तात्पर्य हेच की, सर्व महापुरुषांचे कार्य महान परंतु सद्यस्थितीत निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या महापुरूषांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शैलीचा आपल्याला उपयोग होतो. इथे प्रकर्षाने माझ्यावर ज्या महापुरूषांचा पगडा आहे त्यांचाच उल्लेख केला असला तरी इतरही प्रत्येक महापुरूषांचे कार्य आणि त्याग मोठा आहे. आणि प्रत्येकांचे विचार व कार्यप्रणाली आपल्याला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरते.
त्यामुळे या सर्व महापुरूषांचा वारसा जपूया आणि या पृथ्वीतलावर मानवतेचे नंदनवन फुलवूया.
धन्यवाद...!!!
✒ K. Satish
Surekh
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻
Deleteप्रभावी लेखन
ReplyDeleteप्रभावी लेखन
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻
DeleteVery nice satish
ReplyDeleteसतिशभाऊ खूपच सुंदर💐💐💐💐💐
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻
Delete