Wednesday, July 29, 2020

शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास महत्त्वाचा

                    https://youtu.be/Ry0lLeNnAj0
नमस्कार, मुलांना घडवणे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणे नव्हे. बालपणी मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी, चांगल्या वाईटामध्ये फरक ओळखण्यासाठी, आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर येणार्‍या अडचणींना तोंड देण्यासाठी... योग्य मार्गदर्शन करण्याचे, योग्य रितीने मुलांना शिक्षित करण्याचे काम उत्तम गुरूवर्यांकडून वर्षानुवर्षे होत आलेले आहे.
     पूर्वी शिक्षणासोबतच शरीराला सुदृढ बनविणे, बलशाली बनविणे यालाही खूप महत्त्व दिले जायचे. परंतु , आता शिक्षण म्हणजे नुसता पैशाचा बाजार झालाय. शिक्षणाच्या नावावर पालकांचे आर्थिक शोषण करून माडीवर माडी चढवीत मोठमोठ्या इमारती उभारल्या जातात. त्यात मेंढरं कोंबल्यासारखी मुले कोंबली जातात. आणि आधुनिकतेचे थोडे प्रदर्शन करून शाळांची प्रसिद्धी वाढविली जाते. आणि या सर्व गडबडीत एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत असताना आपण क्रीडांगणासाठी किती जागा ठेवली, याची जाणीव शाळा प्रशासनालाही नसते. आणि पालकांकडूनही गांभीर्याने या गोष्टीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मुलांची शारिरीक वाढ होण्यासाठी योग्य मार्गदर्शन तर सोडाच पण तसे वातावरणही मिळत नाहीये.
     पालकही सतत मुलांना मार्कांच्या शर्यतीत ढकलत असतात. त्या पुस्तकांच्या ओझ्यांनी तर मुलांच्या पाठीचा कणा आत्मविश्वासाने किती वर्षे ताठ राहील याची शंकाच येते.
     आपल्याला देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल, महासत्तेकडे वाटचाल करावयाची असेल तर आपल्याला या नव्या पिढीचीच आवश्यकता आहे. आणि आपण त्यांना जर का नुसते पुस्तकी किडे बनवले तर ते कधीच शक्य होणार नाही. शारिरीक विकास योग्यप्रकारे झाल्यास मानसिक विकासालादेखील बळ मिळते. शरीर दुबळे झाल्यास मनाला थकवा यायलादेखील वेळ लागत नाही.
     आजची परिस्थिती अशी झाली आहे की, मुलांना त्यांचे पालक नवनवीन इलेक्ट्रॉनिक गेझेट्समध्ये अडकवून ठेवण्यात पुढे आहेत. पैसा आहे म्हणून कोणत्याही अपेक्षा पूर्ण कराव्यात किंवा आधुनिकतेच्या नावाखाली मुलांना ठराविक चौकटीत अडकवून ठेवण्यासाठी पालकांनी कारणीभूत ठरणे हे त्यांच्यासाठी घातक आहेच. परंतु , देशाच्या प्रगतीलादेखील मारक आहे.
     लोकसंख्या जशी वाढत आहे, नवीन जन्मदर देखील ज्याप्रमाणे वाढत आहे, त्याच्याप्रमाणानुसार मुलांना खेळण्यास क्रीडांगणासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. परंतु , दुर्दैवाने पैशाच्या लोभापायी कोणीही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
     सुदृढ शरीर ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीला किती चांगल्याप्रकारे जतन करून ठेवता येईल याचा विचार सर्वांनी करायला हवा.
     शिक्षण हे आयुष्यात गरजेचे आहे, पैसादेखील आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे. परंतु सुदृढ आणि बलवान शरीर हे या दोन्हीपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. सुदृढ आणि बलवान शरीर असेल तर शिक्षण आणि पैसा थोडे कमी प्रमाणात असेल तरीही चालू शकते. परंतु , थकलेले, कमजोर शरीर असेल तर या दोन्ही गोष्टी कितीही जास्त प्रमाणात असल्या तरीही त्या कमीच पडू लागतात. किंबहुना त्या बर्‍याचदा असून नसल्यासारख्याच वाटतात.
म्हणून मुलांना शालेय शिक्षणाच्या बंधनातून थोड्या प्रमाणात शिथिलता देऊन त्यांना मैदानी खेळ, अंगमेहनतीचे खेळ खेळूद्यात. त्यांच्या इतर कलागुणांना जोपासण्यास त्यांना मदत करा. त्यांच्याबरोबर स्वतःही खेळ खेळा, गप्पा मारा.
     नाहीतर बुद्धीने हुशार परंतु , शरीराने दुर्बल पिढी तयार झाल्यास आपला देश महासत्ता तर सोडाच परंतु , आपल्याला मिळालेले स्वातंत्र्यदेखील चिरकाल टिकवून ठेवण्यास आपण असमर्थ ठरू.
बघा विचार करून....
चला तर आपण सर्वच जण आत्तापासूनच यासाठी प्रयत्न करूयात...
धन्यवाद...!!!

                                                      ✒ K. Satish


भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटासाहेब यांना विनम्र अभिवादन

भारतातील महान उद्योगपती भारतरत्न श्री. जे. आर. डी. टाटासाहेब...
ज्यांनी भारतातील उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करून भारताला जगाच्या नकाशावर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची शपथ घेऊन ती पूर्णत्वास नेली. परंतु यातून मिळणार्‍या उत्पन्नावर फक्त स्वतःचा मालकी हक्क न दाखवता स्वतः फक्त विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळणे पसंत केले.
आणि भारतातील जनतेला सक्षम बनविण्याकरिता उत्पादनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये पदार्पण केले.

असे भारतीय विमान वाहतूकीचे जनक आणि अणुऊर्जेच्या विकासाकडे प्रकर्षाने लक्ष देणारे महान उद्योगमहर्षी
जे. आर. डी.
जहांगीर रतनजी दादाभाई टाटासाहेब
 यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!!

                                                ✒ K. Satish

Monday, July 27, 2020

योग यशाचा

ना थांबे ही वेळ कधीही
कटू समयही जाईल टळूनी,
झुंजावे संकटाशी हिमतीने
योग यशाचा येईल जुळूनी

K. Satish



Friday, July 24, 2020

वेळ


     वेळेला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. वेळ चांगलीही नसते आणि वाईटही नसते, वेळ ही वेळ असते. माणसाच्या मनाप्रमाणे घडल्यास वेळेला चांगलं म्हटलं जातं आणि मनाविरुद्ध घडल्यास वेळेला वाईट म्हटलं जातं. परंतु , खरं म्हणजे वेळ ही तिचे मार्गक्रमण प्रामाणिकपणे करीत असते.

     ज्यावेळी घटना आपल्या मनाविरुद्ध घडत असतात त्यावेळी मनुष्याने जिद्दीने, चिकाटीने व आत्मविश्वासाने परिस्थितीनुरूप योग्य निर्णय घेऊन धैर्याने परिस्थितीला सामोरे जायला हवे. व अशा परिस्थितीतून योग्य बोध घेऊन अनुभवसंपन्नता वाढवायला हवी.

     त्याउलट ज्यावेळी घटना आपल्या मनाप्रमाणे घडत असतात त्यावेळी हुरळून न जाता शांतपणे जीवनाचा आनंद घ्यायला हवा. व जे चांगले घडत आहे त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायला हवा.

     म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे असणारे महत्त्व समजून जीवनाचा खरा अर्थ सर्वांना समजेल.


घटना घडती चांगल्या तेव्हा
वेळेला सन्मान मिळे,
घटना घडती वाईट तेव्हा
दोष तिला देती सगळे

वेळ ही असते वेळच आणिक
प्रत्येक क्षण असे मोलाचा,
महत्त्व कळले जर या क्षणांचे
समजेल अर्थ खरा जीवनाचा
✒ K.Satish

Monday, July 20, 2020

महापुरुषांचा पगडा


     महापुरुषांचे कार्य सदैव थोर आणि महानच राहिले आहे. आणि सर्वांनी त्यांच्या कार्यातून आणि शिकवणीतून नेहमी जनकल्याणाचा आणि मानवहिताचाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे.
     परंतु या सर्व महापुरुषांच्या कार्याचा उदात्त हेतू एकसारखाच ( मानवतावादी ) असला तरी सर्वांच्या धोरणांमध्ये, कार्यशैलीमध्ये आणि वैशिष्ट्यांमध्ये भिन्नता होती.
     मी स्वतः तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, संत गाडगेबाबा या महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आयुष्यात मार्गक्रमण करतो आहे. या महापुरुषांचे कार्य इतके मोठे आहे की, त्या मार्गावर काही प्रमाणात जरी आपल्याला वाटचाल करता आली तरी समाजातील बहुसंख्य समस्या दूर होतील.
     आता बहुतेकांच्या मनात प्रश्न उद्भवला असेल की, यातील काहींचा मार्ग शांततेचा, काहींचा बंड पुकारण्याचा, काहींचा शत्रूलाही क्षमा करण्याचा संदेश तर काहींची गुन्हेगाराला शासन करण्याची न्यायप्रणाली. मग जर या सर्व महापुरूषांचा आदर्श घेऊन वाटचाल करावयाची झाल्यास ते कसे शक्य होईल ?
     प्रश्न बरोबर आहे. परंतु सर्वप्रथम इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे या सर्वांचे विचार हे मानवतावादी व जनकल्याणाचे होते. आणि मी स्वतःही या सर्व महापुरुषांच्या धोरणांचे आयुष्यात प्रत्येक क्षणी काटेकोरपणे पालन करू शकत नाही. कारण सध्याच्या काळात आपल्याला प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि त्यामुळेच या सर्व महापुरुषांच्या विचारांचा माझ्यावर पगडा असल्यामुळे मला या सर्वांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वाचा आणि भिन्न कार्यशैलीचा उपयोग मानवहिताच्या समस्या सोडवताना अगदी चांगल्याप्रकारे करता येतो.
     काही समस्या तथागतांच्या शांततेच्या मार्गाने सुटतात. त्यावेळी त्यांचा आदर्श कामी येतो. जनकल्याणासाठी कधीकधी छत्रपतींच्या गनिमीकाव्याचे तंत्र, योग्य युद्धनीती आणि सर्वसामान्यांना घेऊनही योग्य रणनीती आखून शत्रूला नामोहरम करण्याच्या तंत्राचा उपयोग होतो. छत्रपती संभाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवल्यास निस्वार्थीपणे समाजासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते. परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतः अन्याय, हालअपेष्ठा सोसूनही हार न मानता इतर पीडित, शोषित, तळागाळातील लोकांच्या हक्कासाठी संपूर्ण जीवन अर्पण करण्याच्या त्याग भावनेमुळे आणि ज्या देशात एकेकाळी अपमानाचे जीवन जगायला लागले त्याच देशाच्या हितासाठी आणि देशप्रेमाखातर त्या देशाची राज्यघटना लिहिण्याचे उदात्त कार्य पाहून आयुष्यात शेवटपर्यंत हार न मानण्याची प्रेरणा मिळते. नेताजींमुळे हुकूमशाहीला सडेतोड उत्तर देण्याची जिद्द निर्माण होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य पाहून समाजसेवा आणि समाजातील सर्व वर्गातील माणसे ही समान असून सर्वांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्याची स्फूर्ती निर्माण होते. छत्रपती शाहू महाराजांनी तर सर्वांसमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहे. शासन चालवताना वेळप्रसंगी प्रस्थापितांचा रोष पत्करूनदेखील दीनदुबळ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारे व तात्पुरती मदत करण्यापेक्षा मूळ समस्येवर पूर्णपणे तोडगा काढून त्यावर उपाययोजना करणार्‍या छत्रपती शाहूमहाराजांचे विचार खूप काही सांगून जातात. संत गाडगेबाबांनी तर अंधश्रद्धा निर्मूलन व स्वच्छता या अतिशय महत्वाच्या मुद्यांना हात घातलाय. कारण कोणताही लढा द्यायचा असेल, प्रगतीपथावर वाटचाल करायची असेल तर शरीर स्वास्थ्य सांभाळणे स्वच्छतेशिवाय शक्य नाही आणि अंधश्रद्धेत गुरफटून गेल्यास तुम्ही स्वतःचा वेळ व पैशांचा तर अपव्यय करताच परंतु वैयक्तिक स्वास्थ्य व समाजस्वास्थ्यही बिघडवण्याचे काम करता.
     तात्पर्य हेच की, सर्व महापुरुषांचे कार्य महान परंतु सद्यस्थितीत निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या महापुरूषांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शैलीचा आपल्याला उपयोग होतो. इथे प्रकर्षाने माझ्यावर ज्या महापुरूषांचा पगडा आहे त्यांचाच उल्लेख केला असला तरी इतरही प्रत्येक महापुरूषांचे कार्य आणि त्याग मोठा आहे. आणि प्रत्येकांचे विचार व कार्यप्रणाली आपल्याला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरते.
त्यामुळे या सर्व महापुरूषांचा वारसा जपूया आणि या पृथ्वीतलावर मानवतेचे नंदनवन फुलवूया.
धन्यवाद...!!!

                                                         K. Satish
 


Sunday, July 19, 2020

प्रेमाची विनंती मित्रांसाठी


     कोरोनाच्या आपत्तीमुळे आपणा सर्वांवर लाॅकडाऊनची वेळ आली.
परंतु, या लाॅकडाऊनमुळे प्रत्येक माणसामध्ये आणि समाजामध्ये काही सकारात्मक बदलही घडत आहेत. तुमच्या जीवनातही असे अनेक सकारात्मक बदल घडले असतील.
     तुमचा एक चांगला मित्र म्हणून मलाही तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल पहायला निश्चित आवडेल.
परंतु , मला अपेक्षित असलेला सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा गोष्टींचे सेवन करत असाल तर ते कायमचे सोडून द्यावे.
     तुमच्यातील हा बदल पाहून मला मनापासून आनंद होईल.
कारण या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छाशक्ती निर्माण होणारी परिस्थिती आणि संधी वेळोवेळी येत नाही. त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही हा चांगला बदल आत्मसात करावा. ही माझी तुमचा एक चांगला मित्र म्हणून तीव्र इच्छा आहे.
     एक मित्र म्हणून माझ्या भावना पटल्या तर ही गोष्ट नक्की सत्यात उतरवा. कदाचित काहींना माझा रागही येऊ शकेल. हरकत नाही...तुम्ही थोड्या क्षणांकरिता माझ्यावर रागावलात तरी चालेल. परंतु माझी ही प्रेमाची विनंती दुर्लक्षित करू नका व या गोष्टींना पुन्हा जवळ करू नका.

तुमचाच मित्र,
सतीश

                                                                 ✒ K. Satish


Thursday, July 16, 2020

वेळेचा सदुपयोग

स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी इतका वेळ द्या की, 
इतरांची कुचेष्टा करण्यासाठी व इतरांवर टीका करण्यासाठी तुमच्याकडे वेळच उरणार नाही...!!!

                                                    ✒ K. Satish

Wednesday, July 15, 2020

पैसा झाला मोठा

पैसा झाला मोठा
शिक्षण झाले खोटे,
निश्चित लागतील भोगावे
सर्वांनाच याचे तोटे

✒ K.Satish






Tuesday, July 14, 2020

बनावट मिडिया

     सध्या आपल्या मिडियाने पत्रकारिता या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची अगदी खिल्ली उडवून त्याला नेस्तनाबूत करण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.
     हे चॅनल्स बी ग्रेड चित्रपटांसारखे, अश्लील विनोदांसारखे, आणि क्रीम लावून गोर्‍या बनवणाऱ्या बनावट जाहिरातींसारखे भासतात.
     हे चॅनल पाहणे म्हणजे आरोग्यास धोका निर्माण करणे होय. आणि यांना तुम्ही मनोरंजन म्हणून जरी पाहायला गेलात तरीही त्यामुळे तुमचा अनमोल वेळ वाया जाऊन तुमच्या हृदयावरील ताण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता जास्त असते.
     त्यामुळे सध्या यांच्यापासून जेवढे दूर रहाल तेवढे उत्तम...!!!

✒ K. Satish







Saturday, July 11, 2020

हक्कांची लढाई

     आपल्या अधिकारांविषयी निर्भीडपणे मते मांडण्याविषयी बर्‍याच लोकांशी वाद-संवाद होतात. त्यातील बहुतांशी लोकांच्या मनातील प्रस्थापित आणि धनदांडग्यांविषयीची भीती पाहून त्यांची कीव तर येतेच. परंतु, खरंच आपल्या देशातील लोकशाहीचा अर्थ खर्‍या अर्थाने लोकांना कळलाय का ? हा प्रश्न मनाला पडतो.

     आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींवर बिनदिक्कतपणे हुकूमत गाजवणारे हे लोक. परंतु, जेव्हा त्यांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांची जाणीव करून दिली जाते, त्यावेळी प्रस्थापित आणि धनदांडग्यांच्या प्रभावाला घाबरून ( आपण काय करू शकतो ? , हे असे होणारच , आपण हे बदलू शकत नाही , हे लोक आपल्याला संपवून टाकतील , आपलं आपण बघा , आपल्याला काय करायचीय दुनियादारी ? ) अशा ह्यांच्या प्रतिक्रिया ऐकून एक संतापाची लाट मनामध्ये येते. स्वतःचा आत्मविश्वास गमावलेल्या आत्मकेंद्रित लोकांसाठी लोकशाही निर्माण झाली आहे काय ?

     ह्या प्रवृत्तीच्या सर्व लोकांना मला एवढेच विचारावेसे वाटते की , जर आपल्या सीमेवर शत्रूचा हल्ला झाला आणि सीमेवर आपले दहा हजार सैनिक लढण्यास सज्ज असतील आणि शत्रूचे सैन्यबळ मात्र पन्नास हजार आणि तेही अद्ययावत शस्त्रांनी सज्ज.....मग जर का आपल्या सैनिकांनी असा विचार केला की , आपण तर संख्येने एवढे कमी आणि शत्रू अतिशय ताकदवान.....ह्यांच्यासमोर आपला निभाव कसा लागणार ?.....त्यापेक्षा जीव वाचवून पळा.....आपल्या घरी  जाऊन आपलं आयुष्य निवांत जगा.....कशाला ही दुनियादारी ?

                         तर मग तुमचं-आमचं काय होईल ?

     जरा विचार करा , हे सैनिक जर त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता फक्त आपल्या देशाच्या आणि देशबांधवांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान करण्यास हसतमुखाने तयार असतील तर आपण आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी लढताना भीती का बाळगावी ?

     विचार करा आणि आपल्या हक्क आणि अधिकारांची पायमल्ली होत असेल तर समोर कितीही मोठी ताकद असली तरी एकजुटीने निधड्या छातीने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यास सज्ज रहा.....!!!

धन्यवाद........!!!

                                                   ✒ K. Satish


       


Friday, July 10, 2020

ज्येष्ठ हिंदी शीघ्र कवी व मिमिक्री कलाकार मनमोहन जालेपोलेलु उर्फ मनमोहन बेवडा यांचे दुःखद निधन

अतिशय दुःखद घटना

काव्यपरिवारातील हिंदी शीघ्र कवी आणि अनेक स्टेजशोज् मध्ये आपल्या मिमिक्री आणि गायनाने प्रेक्षकांची मने जिंकणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व कवी मनमोहन जालेपोलेलु उर्फ मनमोहन बेवडा यांचे काल दि. ८ जुलै रोजी दुखःद निधन झाले. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणारे मनमोहन हे अनेक सुप्रसिद्ध गायकांचे ( विशेषतः किशोर कुमार, मोहम्मद रफी, आर. डी. बर्मन, मन्ना डे, कुंदनलाल सेहगल ) आवाज अगदी हुबेहुब काढत असत. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर यांनीदेखील स्वतः पत्र पाठवून त्यांच्या कलेचे कौतुक केले होते.
त्यांचे टोपण नाव ' बेवडा ' असले तरी त्यांना कुठलेही व्यसन नव्हते. कलाक्षेत्रात कार्यरत असताना ते आपले सामाजिक कर्तव्यदेखील अगदी निष्ठेने पार पाडत होते. याच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी पोलिस मित्र म्हणून त्यांची भूमिका चोख बजावली होती. कोरोनाच्या संकटात ते दररोज दोन तास पोलिस मित्र म्हणून कार्यरत असत.
आपल्या मिश्कील आणि हजरजबाबीपणामुळे ते कोणालाही क्षणात आपलेसे करून घेत. त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती त्यांना नेहमी आठवणीत ठेवत असे. त्यामुळेच ज्यांच्या ज्यांच्याशी त्यांचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपर्क आला होता त्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. आणि सर्वांचे मन अगदी हेलावून गेले आहे. प्रत्येकाच्या नजरेसमोर त्यांची प्रतिमा झळकत असेल याची मला खात्री आहे.
अशा या हरहुन्नरी कलाकाराला मात्र आयुष्यातील इतर जबाबदार्‍या पार पाडताना पात्रता असतानाही कला क्षेत्रातील मोठे नाव बनता आले नाही. तरीदेखील त्यांनी आपले काव्यप्रेम अगदी निष्ठेने जपले होते. मला आठवतेय की, फेब्रुवारी २०२० मध्ये आमचे ओझर येथील महाकाव्यसंमेलन पार पडल्यावर त्यांनी माझ्याजवळ एक म्युझिकल शोची निर्मिती करण्याविषयी विनंती केली होती. त्यांना त्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांची कला रसिकांपर्यंत पुर्वीच्याच जोशात सादर करायची होती. वेळेच्या कमतरतेमुळे सध्या शक्य होत नसले तरी भविष्यात नक्की आपण यावर काम करू असे मी त्यांना आश्वासन दिले होते. दुर्दैवाने त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
त्यांनी कधीही कुणाचे मन दुखावले नाही आणि कधी कुणाचे वाईटही चिंतले नाही. आपल्या हसतमुख स्वभावाने ते सर्वांचे मन जिंकून घेत. काव्यमैफिलीत थोडं वातावरण गंभीर झाल्यास अथवा मैफिलीत संथपणा आल्यास मनमोहनजी त्यांच्या मिमिक्रीने आणि गायनाने मैफील पुन्हा आल्हाददायक वातावरणात नेऊन ठेवत.
त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतील असे हे व्यक्तिमत्त्व होते. अशा या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी सर्व काव्यपरिवार व रसिकजनांकडून कृतज्ञता व्यक्त करतो.


'काव्यमळ्यातील पुष्प हरपले
सुगंध मागे ठेवून गेले,
हसतमुख या कलावंताला
काळाने आपलेसे केले

देह त्यागला असला तरीही
स्मृती अजूनही जिवंत आहेत,
आठवणींच्या असंख्य लाटा
सार्‍यांच्या मनामध्ये उसळत आहेत

काव्यमळ्याला फुलवत ठेवूनी
असंख्य पुष्प फुलवायची आहे,
हरपून गेलेल्या पुष्पाला
हीच खरी श्रद्धांजली आहे '

शोकाकुल
के. सतीश, सर्व काव्यपरिवार व रसिकजन

                              ✒ K. Satish



Wednesday, July 8, 2020

अन्यायाशी लढा

कितीही करा तुम्ही घाव मजवरी

झेलण्यास मी तयार आहे,

अन्यायाशी अविरत लढण्याची

अदम्य जिद्द या मनात आहे

 ✒ K. Satish


Tuesday, July 7, 2020

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की,
जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल


 कर्तृत्व असे असावे की,
जे लोकांना दिसावे
व त्यांनीच त्याची चर्चा करावी

✒ K. Satish




Monday, July 6, 2020

चांगुलपणा

चांगुलपणाचा गुण चांगलाच...

तो मनाचा मोठेपणादेखील असतो.

पण आपल्या चांगुलपणाचा

सतत गैरफायदा घेतला जात असेल

तर तोच चांगुलपणा

आपला मूर्खपणा ठरू शकतो.


                                            K. Satish


वैचारिक गुलामगिरी

उच्च शिक्षण घेतल्यावरदेखील कोणाच्यातरी दबावाला अथवा एखाद्या आमिषाला बळी
पडून वैचारिक गुलामगिरी स्वीकारणे म्हणजे आपण घेतलेल्या शिक्षणाचा आणि
आपल्या स्वाभिमानाचा अपमान करणे होय.

                                                       K. Satish
      



Sunday, July 5, 2020

गुरूजनांचे आभार 🙏

अनेक गुरूजन मला मिळाले
आयुष्याच्या वळणावर,
लहान असो की मोठे असो
आहेत मानाच्या स्थानावर

जोवर आहे आयुष्य आपुले
प्रत्येकाने शिकत रहावे,
मिळवलेल्या ज्ञानामधूनी
इतरांना ज्ञान वाटत जावे

                                ✒ K. Satish

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...